दोघेही युवक नदीत वाळू उपसण्यासाठी गेले होते अन् अचानक झाले बेपत्ता... 

योगेश वरभे 
Monday, 7 September 2020

तुषार रवींद्र लाभाडे (वय २५) व मंगेश सोनवणे (वय २४) अशी बेपत्ता असलेल्या युवकांच नावे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. ही घटना रविवारी (ता. सहा) सकाळच्या सुमारास कानगावजवळील चानकी, भगवा येथे यशोदा नदी पात्रात घडली.

अल्लीपूर (जि. वर्धा) : नित्याप्रमाणे नदीत वाळू उपसण्यासाठी गेलेले दोन युवक अचानक बेपत्ता झाल्याने परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे. वाळू उपसताना नदीला अचानक पाणी वाढल्याने हे दोघे वाहून गेल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्‍त करण्यात येत आहे. या दोन्ही युवकांचा नदीपात्रात शोध सुरू असल्याची माहिती तहसीलदारांनी दिली. 

तुषार रवींद्र लाभाडे (वय २५) व मंगेश सोनवणे (वय २४) अशी बेपत्ता असलेल्या युवकांच नावे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. ही घटना रविवारी (ता. सहा) सकाळच्या सुमारास कानगावजवळील चानकी, भगवा येथे यशोदा नदी पात्रात घडली. दुपारपर्यंत त्यांचा शोध सुरू होता. त्यांच्या शोधाकरिता हिंगणघाट येथील चमूला पाचारण करण्यात आल्याची माहिती पोलिस आणि महसूल विभागाकडून देण्यात आली आहे. 

तुषार लाभाडे व मंगेश सोनवणे हे दोघेही नदी पात्रात वाळू काढण्यासाठी गेले होते. त्याच वेळी अचानक नदीचे पाणी वाढल्याने किंवा नदीतील खोल खड्ड्‌यात ते बुडाले असावे, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. घटनेची माहिती कानगावचे सरपंच सतीश ठाकरे यांनी अल्लीपूर पोलिसांना दिली. माहिती मिळताच अल्लीपूर येथील पोलिस निरीक्षक योगेश कामाले, जमादार चव्हाण, पोलिस शिपाई महेंद्र गायकवाड यांनी घटनास्थळ गाठून दोन्ही युवकांचा शोध सुरू केला. परंतु, त्यांचा दुपारपर्यंत शोध लागला नाही. 

अवश्य वाचा - अविश्वसनीय! विदर्भातील या गावात चक्क डायनासोर द्यायचे अंडी: काही वर्षांपूर्वी सापडले होते अवशेष 
 

माहिती मिळताच हिंगणघाट येथील नायब तहसीलदार विजय पवार, समशेर पठाण हे घटनास्थळी दाखल झाले. गावातील काही लोकांना सोबत घेऊन त्या युवकांचा नदी पात्रात शोध घेणे सुरू केले. मात्र, अद्यापपर्यत त्या दोन युवकांचा कुठलाच पत्ता मिळाला नसल्याची माहिती नायब तहसीलदार विजय पवार यांनी दिली. 
 
अधिक माहितीसाठी - .. तर विदर्भात महापूर आलाच नसता.. महापुराला जबाबदार कोण? ऐतिहासिक विसर्ग करण्याची खरंच गरज होती का? 
 

नेहमीच होतो येथे वाळूचा उपसा 

यशोदा नदीवर ज्या ठिकाणी हा प्रकार घडला, त्या ठिकाणी नेहमीच वाळूचा अवैध उपसा होतो. याची माहिती खनिकर्म विभागासह इतर सर्वच विभागांना देण्यात आली. मात्र, त्यांच्याकडून येथे कारवाईच्या नावावर थातूरमातूर चौकशी करण्यात येते. त्यामुळे येथे हे प्रकार सुरूच आहेत. यावर आळा घालण्याची मागणी करण्यात येत आहे.

संपादन ः राजेंद्र मारोटकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two youth Disappeared into the river during diging sand