अनफिट' बसमुळे नागपूरकरांचा जीव धोक्‍यात

अनफिट' बसमुळे नागपूरकरांचा जीव धोक्‍यात

नागपूर : शहरातील रस्त्यांवर महापालिका परिवहन विभागाच्या "अनफिट' बसेस धावत असून नागपूरकरांचा जीव धोक्‍यात आला आहे. महापालिकेच्या परिवहन विभागाच्या आकडेवारीनुसार या महिन्यात 941 वेळा अचानक बस बंद पडली किंवा "ब्रेक फेल' झाले. त्यामुळे शहरातील रस्त्यांवरून धावणाऱ्या बसेसच्या देखभाल, दुरुस्तीबाबत परिवहन विभागाची उदासीनता चव्हाट्यावर आली असून, नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचे चित्र बुधवारी झालेल्या अपघातातून स्पष्ट झाले. अडीच वर्षांत 21 हजार 622 ठिकाणी अचानक बंद पडल्याने प्रवाशांना मनस्तापही सहन करावा लागला.
बुधवारी प्रतापनगर ते बर्डीकडे जाणाऱ्या महापालिका परिवहन विभागाच्या बसने जयश्री मेश्राम या तरुणीच्या दुचाकीला धडक दिली. या बसचे "ब्रेक फेल' झाल्याचे पुढे आले. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर धावणाऱ्या महापालिका परिवहन विभागाच्या बसच्या दुर्दशेचा मुद्दा पुन्ह ऐरणीवर आला आहे. शहरातील महापालिकेने शहर बससेवेसाठी ट्रॅव्हल टाइम्स कार रेंटल, आर. के. सिटी ऑपरेटशन आणि हंसा सिटी बस या तीन ऑपरेटरची नियुक्ती केली आहे. या तिन्ही ऑपरेटरकडेच "आपली बस'च्या देखभाल दुरुस्तीचीही जबाबदारी आहे. परंतु, त्याकडे ऑपरेटरचे दुर्लक्ष होत असल्याने दररोज अचानक बस बंद पडणे, "ब्रेक फेल'सारख्या घटना होत आहेत. या महिन्यात महापालिका परिवहन विभागाकडील नोंदीनुसार 941 ठिकाणी विविध कारणाने रस्त्यांवरच बस बंद पडली. अर्थात, दररोज वेगवेगळ्या मार्गावर 31 ठिकाणी बस अचानक बंद पडत आहे किंवा ब्रेक फेल होत आहेत. 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर, या सहा महिन्यांत 4 हजार 854 ठिकाणी बस अचानक बंद पडल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. जुनमध्ये 709, जुलैमध्ये 861 आणि ऑगस्टमध्ये 910 ठिकाणी विविध रस्त्यांवर बस अचानक बंद पडल्या. त्यामुळे तिकिटासाठी पैसे खर्च करूनही नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. यात काही अपघातांमुळेही बस बंद पडल्या.
शहरात दररोज दीड लाख प्रवासी "आपली बस'ने प्रवास करतात. परंतु, देखभाल, दुरुस्तीअभावी त्यांच्या सुखद व वेळेवर घरापर्यंत पोहोचण्याची प्रवासाची कुठलीही खात्री नसल्याचेच गेल्या दोन वर्षातील आकडेवारीने अधोरेखित केले. देखभाल, दुरुस्तीसोबत शहरातील रस्त्यांची दुर्दशाही नागरिकांच्या प्रवासात अडथळे निर्माण करीत असल्याचे सूत्राने नमूद केले. शहरात 380 बसेस दररोज धावत आहेत. यातील दोनशे बस दहा वर्षे जुन्या आहेत. या बसमुळे प्रदूषण वाढत असून आतील आसनेही बसण्यास योग्य नाहीत. याशिवाय बसच्या खिडक्‍यांच्या तुटलेल्या काचानेही देखभाल, दुरुस्तीचे पितळ उघडे पाडले आहे.

बस बंद पडल्याच्या घटना
2019-20 (सप्टेंबरपर्यंत) 4 हजार 854
2018-19 7 हजार 508
2017-18 9 हजार 260

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com