विद्यापीठाला प्रश्‍नपत्रिकेचाच पडला विसर

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 17 October 2019

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांना पाच ऑक्‍टोबरपासून सुरुवात झाली. मात्र, परीक्षेतही परीक्षा विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. विद्यापीठाच्या पदव्युत्तर महिला अध्ययन केंद्राच्या "महिलांचा राजकारण आणि प्रशासनातील सहभाग' या विषयाची प्रश्‍नपत्रिकाच तयार न केल्याने परीक्षा केंद्रावर गेलेल्या विद्यार्थिनीला परीक्षा केंद्रावरून परत जावे लागले. 

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांना पाच ऑक्‍टोबरपासून सुरुवात झाली. मात्र, परीक्षेतही परीक्षा विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. विद्यापीठाच्या पदव्युत्तर महिला अध्ययन केंद्राच्या "महिलांचा राजकारण आणि प्रशासनातील सहभाग' या विषयाची प्रश्‍नपत्रिकाच तयार न केल्याने परीक्षा केंद्रावर गेलेल्या विद्यार्थिनीला परीक्षा केंद्रावरून परत जावे लागले. 
विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या हिवाळी परीक्षांचा पहिला टप्पा सुरू आहेत. या टप्प्यामध्ये उन्हाळी परीक्षेत काही विषयात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर महिला अध्ययन केंद्राच्या चौथ्या सत्राच्या "महिलांचा राजकारण आणि प्रशासनातील सहभाग' या विषयाचा पेपर बुधवारी (ता.16) घेण्यात येणार होता. हा पेपर देण्यासाठी विद्यार्थिनी केंद्रावर पोहोचली. तिला उत्तरपत्रिकाही देण्यात आली. मात्र, काही वेळातच या विषयाची प्रश्‍नपत्रिकाच उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. यावर शिवाजी विज्ञान महाविद्यालयातील परीक्षा केंद्राने विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे संपर्क साधला. त्यात या विषयाची प्रश्‍नपत्रिकाच उपलब्ध नसल्याचे कारण सांगण्यात आले. यासाठी विषयाला फार विद्यार्थी नसल्याने प्रश्‍नपत्रिका तयार करण्यात आली नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. नियमानुसार एकही विद्यार्थी परीक्षेत बसत असला तरी, त्याच्या विषयाची प्रश्‍नपत्रिका तयार करणे अपेक्षित असते. याउलट परीक्षा विभागाकडून असे कारण दिल्याने विद्यार्थिनीला धक्का बसला. त्यामुळे तिचे वर्ष वाया जाण्याची वेळ आली आहे. या प्रकारामुळे विद्यार्थिनीने कुलगुरू डॉ. सि. प. काणे यांचे कार्यालयही गाठले. मात्र, कुलगुरूही अनुपस्थित असल्याने तिने शेवटी परीक्षा भवन गाठून यासंदर्भात तक्रार नोंदविली. 
प्रवेशपत्र दिले कसे? 
विद्यार्थिनीने परीक्षेचा अर्जात संबंधित विषयांची नोंद केली होती. हा अर्ज तपासून विद्यापीठाकडून विद्यार्थिनीला प्रवेशपत्र पाठविले. त्या प्रवेशपत्रात या विषयांचा समावेश होता. त्यामुळे विद्यार्थिनी परीक्षा केंद्रावर पोचली. परीक्षा खोलीत बसून तिला उत्तर पत्रिकाही देण्यात आली. मात्र, ऐन वेळेवर प्रश्‍नपत्रिकाच तयार नसल्याचे समोर आले. या विषयाचा पेपरच घ्यायचा नसेल तर मला प्रवेशपत्र दिले कसे? असा सवाल विद्यार्थिनीने केला आहे. 
विद्यापीठामध्ये विषय शिकवला जात नसल्यामुळे संबंधित विषयाची प्रश्‍नपत्रिका तयार करण्यात आलेली नाही. याबद्दल चौकशी करून या विद्यार्थिनीचा अर्ज कसा काय स्वीकारला याची शहानिशा करण्यात येईल. 
-डॉ. प्रफुल्ल साबळे, संचालक, परीक्षा व मूल्यांकन विभाग 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The University forgotten the question paper