ऊर्ध्व वर्धाचे पाणी महादेव, पांढरी प्रकल्पात नेणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

अमरावती : ऊर्ध्व वर्धा प्रकल्पातील पाणी वरुड तालुक्‍यातील महादेव व पंढरी मध्यम प्रकल्पांत नेले जाईल, असे सांगत वेगवेगळ्या योजनांतर्गत नागरिकांना लाभाच्या कोट्यवधी रुपयांच्या हजारो प्रकरणांना पूर्वसंमती प्रदान करण्यात आलेली आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती कृषिमंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी सोमवारी (ता. 16) पत्रपरिषदेत दिली.

अमरावती : ऊर्ध्व वर्धा प्रकल्पातील पाणी वरुड तालुक्‍यातील महादेव व पंढरी मध्यम प्रकल्पांत नेले जाईल, असे सांगत वेगवेगळ्या योजनांतर्गत नागरिकांना लाभाच्या कोट्यवधी रुपयांच्या हजारो प्रकरणांना पूर्वसंमती प्रदान करण्यात आलेली आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती कृषिमंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी सोमवारी (ता. 16) पत्रपरिषदेत दिली.
ऊर्ध्व वर्धा प्रकल्प शंभर टक्के भरलेला असून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे. मात्र वरुड तालुक्‍यात अद्यापही पाहिजे तसा पाऊस झालेला नाही. प्रकल्पात पाणी नाही. पाणी उपसा सिंचनमार्फत ऊर्ध्व वर्धा धरणाचे पाणी महादेव प्रकल्प व पांढरी प्रकल्पात नेले जाणार आहे. पंढरी मध्यम प्रकल्पाचे काम दारे बसविण्याच्या उंचीपर्यंत पूर्ण झालेले आहे. या प्रकल्पाची क्षमता 62.92 दशलक्ष घनमीटर आहे. सद्य:स्थितीत 24 दशलक्ष घनमीटर पाणी साचविले जाऊ शकते. या प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्याची कामे सुरू आहेत. चांदस येथील पाक नदी प्रकल्पालासुद्धा या योजनेची जोड दिली जाणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
कृृषिमंत्री व पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळाल्यापासून शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात योजनांचा जास्तीतजास्त लाभ पोहोचविण्याचा प्रयत्न केलेला आहे. पोकरा योजनेंतर्गंत 51,174 अर्जांसाठी 202 कोटी, सिंचनासाठी 19,352 अर्जांना 67 कोटी, फलोत्पादनासाठी 4,781 अर्जांसाठी 64 कोटी, यांत्रिकीकरणच्या 3,937 अर्जांना 17 कोटींच्या प्रकरणांना पूर्वसंमती देण्यात आलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यात 1.98 लाख शेतकऱ्यांना 761.30 कोटी रुपये देण्यात आलेत. दुष्काळी गावांतील शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाचे पुनर्गठण करून यावर्षी 76,945 शेतकऱ्यांना 539.58 कोटींचे पीककर्ज वाटप करण्यात आले. सामाजिक न्याय विभागामार्फत ग्रामीण भागात रमाई आवास योजनेंतर्गत 3 हजारांपैकी 1480 प्रकरणांना मान्यता देण्यात आलेली आहे. आता नागरिक व शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून योजनेचा लाभ मिळवून घ्यावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.
पायाभूत सुविधांची उभारणी
कृषिपंपांना जोडणी देण्यासाठी पायाभूत सुविधा पाहिजे त्या प्रमाणात नव्हत्या. आता उपकेंद्र तयार झालेले असून दीड हजार रोहित्र मिळालेले आहे. एचव्हीडीएस (हाय व्होल्टेज डिस्ट्रीब्युशन सिस्टिम) च्या माध्यमातून कृषिपंपांना जोडणी दिली जात असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Upper Wardha water will be taken to Mahadev, a pandhari project