यवतमाळ : पैसे वसुलीसाठी बळाचा वापर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

यवतमाळ : अवैध सावकाराकडून टक्केवारीने पैसे घेतल्यानंतर वसुलीसाठी बळाचा वापर करण्यात येत आहे. आठवडी बाजार परिसरातील चिंधी बाजार येथे अंत्यसंस्कारादरम्यान दाम्पत्याला चार दिवसांपूर्वी मारहाण करण्यात आल्याची चर्चा आहे.

यवतमाळ : अवैध सावकाराकडून टक्केवारीने पैसे घेतल्यानंतर वसुलीसाठी बळाचा वापर करण्यात येत आहे. आठवडी बाजार परिसरातील चिंधी बाजार येथे अंत्यसंस्कारादरम्यान दाम्पत्याला चार दिवसांपूर्वी मारहाण करण्यात आल्याची चर्चा आहे.
भोसा रोडवरील एक व्यक्ती व महिला पहेलवानाकडून पैसे घेऊन शहरात अवैध सावकारी करीत आहेत. त्या दोघांनी पंधरा वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाह केला आहे. टक्केवारीच्या पैशांतून त्यांनी कोट्यवधीची माया गोळा केली आहे. गरजूंना हेरून मनमानी पद्घतीने व्याज आकारणी केली जात आहे. चिंधी बाजार परिसरातील एका दाम्पत्याने 20 टक्के दराने पैसे घेतले. ही रक्कम अवैध सावकाराला वेळेवर मिळाली नाही. महिला व पुरुष पैसे वसुलीसाठी गेले, त्यावेळी नातेवाइकाचा मृत्यू झाला होता. अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना शिवीगाळ करीत दाम्पत्याला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी तक्रार देण्यासाठी त्यांनी अवधूतवाडी पोलिसांत धाव घेतली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून संशयितांची विचारपूस करण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र, अवैध सावकाराविरुद्घ कोणताही गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही. यासंदर्भात ठाणेदार आनंद वागतकर यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, प्रतिसाद मिळाला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Use of force to recover money