सरपंचांविरुद्ध अश्‍लील भाषेचा वापर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

खापरखेडा: सिल्लेवाडा बससेवा उद्‌घाटन सोहळ्याचा वाद अधिकच चिघळला आहे. शनिवारी निषेध सभेत ग्रामपंचायत सदस्य अनिल तंबाखे यांनी आक्षेपार्ह व अश्‍लील भाषेचा वापर केल्याची तक्रार सरपंच प्रमिला बागडे यांनी केली आहे. या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी तंबाखे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, डॉ. राजीव पोतदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून आमदार सुनील केदार यांच्यावरही गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

खापरखेडा: सिल्लेवाडा बससेवा उद्‌घाटन सोहळ्याचा वाद अधिकच चिघळला आहे. शनिवारी निषेध सभेत ग्रामपंचायत सदस्य अनिल तंबाखे यांनी आक्षेपार्ह व अश्‍लील भाषेचा वापर केल्याची तक्रार सरपंच प्रमिला बागडे यांनी केली आहे. या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी तंबाखे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, डॉ. राजीव पोतदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून आमदार सुनील केदार यांच्यावरही गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सिल्लेवाडा येथील "झेंडे लावा' आंदोलनासाठी स्थानिक लाल चौकात भाजपने सभा घेतली होती. या सभेत तंबाखे यांनी सरपंचाविरुद्ध अश्‍लील भाषेचा वापर केल्यामुळे विनयभंग व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन खापरखेडा ठाणेदारांना देण्यात आले. महिला सरपंच बागडे या कायद्यानुसार दिलेल्या अधिकारामुळे 2017 मध्ये थेट जनतेतून निवडून आल्या होत्या. गुरुवारी (ता. 12) आमदार केदार बससेवेचे अधिकृत उद्‌घाटन करणार होते. मात्र, तंबाखे यांनी भाजपला श्रेय देण्यासाठी जिल्हाध्यक्ष डॉ. पोतदार यांच्या हस्ते आधीच उद्‌घाटन करून घेतले. या कार्यक्रमात सरपंचांना बोलाविले नसल्याचा आरोप बागडे यांनी केला. यावरून दोन्ही पक्षांत वाद वाढत गेला. याच कार्यक्रमात केदार यांच्या भाषणाची व्हिडिओ क्‍लिप व्हायरल झाली. यानंतर शनिवारी भाजपने "झेंडे लावा' आंदोलन केले. येथे तंबाखे यांच्या अश्‍लील भाषणाची क्‍लिपही व्हायरल झाली आहे.
तंबाखे भाजपमधून निलंबित
महिला सरपंचाबद्दल तंबाखे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची तक्रार दाखल झाली आहे. एखाद्या महिला सरपंचाबद्दल अशा प्रकारचे मानहानी, बदनामी, निंदानालस्ती व अपमान करणारे कोणतेही वक्तव्य किंवा कृत्य भाजप कधीच सहन करीत नाही. त्यामुळे तंबाखे यांना भाजपमधून निलंबित करण्यात येत आहे. यासंदर्भात पूर्ण सत्यता जाणून घेऊन पक्षातर्फे पुढील कार्यवाही करण्यात येईल. यासंदर्भात पोलिस प्रशासनाने कायदेशीर कार्यवाही करावी, असे भाजपचे नागपूर जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी पत्रकातून कळविले आहे.
मी एक दलित महिला सरपंच आहे. सार्वजनिक ठिकाणी तंबाखे यांनी अश्‍लील भाषा बोलून लाजवेल असा माझा अपमान केला आहे.
-प्रमिला बागडे, सरपंच, सिल्लेवाडा
मी काही तसे संभाषण केलेले नाही. माझ्यावर मुद्दाम आरोप लावून मला गोवण्यात येत आहे.
- अनिल तंबाखे, ग्रामपंचायत सदस्य, सिल्लेवाडा.
प्रमिला बागडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अनिल तंबाखेंविरुद्ध विविध कलमांसह ऍट्रॉसिटीचा गुन्हा नोंदविला आहे. डॉ. पोतदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून केदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
- चंद्रकांत मदने, ठाणेदार, खापरखेडा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Use of obscene language against sarpanchs