esakal | बहुऔषधी गुणधर्मामुळे या हळदीला मिळतोय अधिक भाव
sakal

बोलून बातमी शोधा

  Vaigaon Turmeric is getting more prices

कृषी विभागातर्फे वायगाव हळदीची लागवड वाढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वायगाव व खैरगावमध्ये हळद लागवडीसंदर्भात महिलांच्या शेतीशाळा सुरू असून, कृषी सहायक मनोज गायधने हळद उत्पादनासाठी प्रयत्न करीत आहेत.

बहुऔषधी गुणधर्मामुळे या हळदीला मिळतोय अधिक भाव

sakal_logo
By
प्रफुल्ल कुडे

समुद्रपूर (जि. वर्धा) : तालुक्‍यातील आरोग्यवर्धक वायगाव हळदीला भौगोलिक मानांकन मिळाल्यानंतर सोन्याचे दिवस आले आहेत. वायगाव व परिसरातील जे शेतकरी पिढ्यान्‌पिढ्या वायगाव जातीच्या हळदीची लागवड करीत आहेत, त्यांना भौगोलिक मानांकन व औषधी गुणधर्मामुळे बाजारात इतर हळदीच्या तुलनेत अधिक भाव मिळत आहे. वायगावची हळद महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात लोकांच्या पसंतीस उतरत आहे.

कृषी विभागातर्फे वायगाव हळदीची लागवड वाढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वायगाव व खैरगावमध्ये हळद लागवडीसंदर्भात महिलांच्या शेतीशाळा सुरू असून, कृषी सहायक मनोज गायधने हळद उत्पादनासाठी प्रयत्न करीत आहेत. परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत नैसर्गिक सेंद्रिय शेतीचा विकास करण्यासाठी मंडळ कृषी अधिकारी विनया बनसोडे, गट तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री. चांदेवार प्रयत्न करीत आहेत.

आजपर्यंत वायगाव फक्त बाबा फरीद गिरडवाले यांचा दर्गा व लसनपूरच्या गोशाळेसाठी प्रसिद्ध होते, पण भौगोलिक मानांकन मिळाल्यानंतर वायगाव व परिसरातील गावे कुरकुमीन आणि औषधी गुणधर्म असणाऱ्या हळदीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ओळखली जात आहे. मुगल काळापासून येथील माळी समाज स्थानिक वायगाव जातीच्या हळदीची लागवड करीत आहे. आज वायगाव व परिसरातील 13 गावांमध्ये मोठ्या प्रमाणात सर्वच शेतकरी स्थानिक वायगाव हळदीची लागवड करीत आहेत.

या हळदीचे वैशिष्ट्य म्हणजे, ही हळद इतर हळदीच्या तुलनेने रंगाने गडद पिवळी असून तिची चवही वेगळी आहे. ही हळद सूज, वेदना, कृमी नष्ट करणारी, त्वचा विकारांचा नाश करणारी, जखम निर्जंतुकीकरण करून भरून काढणारी, रुची वाढवणारी, तापाचा नाश करणारी, अशी विविध गुणांनी समृद्ध आहे. कर्करोग, मेंदूविकार, वात विकार, सर्दी, ताप, खोकला त्वचाविकार इत्यादीसाठी ही उपयुक्त आहे.

हळदीचा अर्क कर्करोगाच्या पेशी मारण्यासाठी उपयुक्त असतो, असे नवीन संशोधनात दिसून आले आहे. अलीकडे संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार हळदीतील कुरकुमीन हे संयुग असते ते वेगळे काढून त्याचा वापर कर्करोगग्रस्त पेशी मारण्यासाठी करता येतो. आतापर्यंत कर्क्‍युमिन हे गुणकारी असल्याचे माहीत असूनही त्याचा वापर परिणामकारक पद्धतीने करता येत नव्हता, असे इलिनोईस विद्यापीठाचे प्रा. दीपरंजन पाल यांनी सांगितले. उटाह विद्यापीठातील संशोधकांसह काहींनी प्लॅटिनमच्या मदतीने कुरकुमीनची विद्राव्यता वाढवली व त्याचा वापर केला असता ते द्रावण मेलानोमा व स्तनाचा कर्करोग यांसह इतर कर्करोगांवर शंभरपट प्रभावी दिसून आले.

1924 ते 2018 पर्यंत कुरकुमीन वर जगभरातून 12 हजार 595 शोधनिबंध प्रसिद्ध झाले. यातील 37 टक्‍के शोधनिबंध हे कुरकुमीनचा कर्करोगावरील उपचारात कसा वापर करता येईल यावर आहेत. यावरून कुरकुमीनचे पर्यायाने हळदीचे आरोग्याच्या दृष्टीने असणारे महत्त्व आपल्या लक्षात येईल. वायगाव हळदीचे जावळी, भेंडी व बामणी असे तीन प्रकार आढळून येतात. इतर हळदीमध्ये कुरकुमीनचे प्रमाण वजनानुसार 2-4 टक्‍के असून वायगाव हळदीत 5.50 ते 8 टक्‍के आहे. वायगाव हळदीचे लागवड क्षेत्र वाढावे यासाठी कृषी सहायक आणि हळद लागवड अभ्यासक मनोज गायधने प्रयत्न करीत आहेत.
 

आंतरराष्ट्रीयस्तरावर नेण्याचा मानस


समुद्रपूर तालुक्‍यातील सेंद्रिय शेती करणाऱ्या, शेतकऱ्याचा पहिला गट स्थापन करणाऱ्या व नैसर्गिक पद्धतीने हळद पिकविणाऱ्या वायगावच्या महिला शेतकरी शोभा गायधने, तरुण शेतकरी विवेक घुमडे, विठ्ठल कारवटकर, माणिक झिबड, प्रमोद झिबड यांच्यासह अनेक शेतकरी वायगाव हळदीला आंतरराष्ट्रीयस्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी तसेच मागणी वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. भौगोलिक मानांकनाचा आर्थिक फायदा घेण्यासाठी वायगाव हळदीचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी भौगोलिक उपदर्शन पंजीकृत बौद्धिक संपदा अधिकार (आयपीआय) चेन्नई या संस्थेकडून प्रमाणपत्र व रजिस्ट्रेशन करणे आवश्‍यक आहे.
 

6500 टन हळदीचे उत्पादन


2019 मध्ये 6500 टन हळदीचे उत्पादन वायगाव व परिसरातील शेतकऱ्यांनी घेतले. हळदीचे उत्पादन प्रतिवर्ष 12 टक्‍क्‍यांनी वाढविण्याचा मानस शेतकरी व कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केला.

loading image
go to top