भंडाऱ्याची वैन"गंगा' दूषितच

श्रीकांत पनकंटीवार
Sunday, 11 August 2019

भंडारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगा शुद्धीकरणाचा ध्यास घेतला आहे. याच धर्तीवर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या वैनगंगा नदीला प्रदूषणमुक्त करण्याचे आश्‍वासन सरकारकडून मिळाले होते. पाच वर्षांच्या कार्यकाळात नागरिकांना शुद्ध पाणी देण्याची वल्गना करणाऱ्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे भंडारा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना अशुद्ध पाण्याने तहान भागवावी लागत आहे. नागपूर येथील नागनदीच्या दूषित पाण्यामुळे वैनगंगा प्रदूषित झाली आहे. मागील पाच वर्षांत अनेकदा मिळालेले वैनगंगा शुद्धीकरणाचे आश्‍वासन हवेतच विरले.

भंडारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगा शुद्धीकरणाचा ध्यास घेतला आहे. याच धर्तीवर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या वैनगंगा नदीला प्रदूषणमुक्त करण्याचे आश्‍वासन सरकारकडून मिळाले होते. पाच वर्षांच्या कार्यकाळात नागरिकांना शुद्ध पाणी देण्याची वल्गना करणाऱ्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे भंडारा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना अशुद्ध पाण्याने तहान भागवावी लागत आहे. नागपूर येथील नागनदीच्या दूषित पाण्यामुळे वैनगंगा प्रदूषित झाली आहे. मागील पाच वर्षांत अनेकदा मिळालेले वैनगंगा शुद्धीकरणाचे आश्‍वासन हवेतच विरले. अशुद्ध पाण्यामुळे पोटाचे आजार, चर्मरोग, कर्करोग यांसारखे आजार बळावले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
भंडारा विधानसभा क्षेत्रात भंडारा व पवनी तालुक्‍याचा समावेश आहे. नदीकाठावरील 25हून अधिक गावांमध्ये वैनगंगेवर असलेल्या नळ योजनेतून पाणीपुरवठा होतो. गोसे खुर्द प्रकल्पामुळे बारमाही वाहणारी वैनगंगा नदी संथ झाली आहे. गोसे खुर्द धरणाचे बांधकाम करताना या बाबीचा विचार करण्यात आला नाही. नागपूरच्या नागनदीचे पाणी सोडले जात असल्याने वैनगंगा दूषित झाली आहे. नागपूर महानगरपालिका ही वैनगंगेची मुख्य प्रदूषक आहे. नागपुरातील गटारी, मलमूत्र, कारखान्यांतील दूषित पाणी नागनदीद्वारे वैनगंगेत मिसळते. याचा विपरीत परिणाम नदीकाठावर वसलेल्या गावांतील मानवी जीवनावर होत आहे. परिणामी, ही समस्या जटिल झाली आहे. ग्रामीण भागातील नळ योजनांना पाणी शुद्धीकरणाची व्यवस्था नाही. यामुळे वैनगंगेचे दूषित पाणीच नळाला सोडले जात असून, भंडारा शहरातील नागरिकांना तेच पाणी प्यावे लागते. पर्यावरण नियमाप्रमाणे जी संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्था पाणी दूषित करते, त्यांनीच पाणी शुद्ध करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. त्यासाठी निधी खर्च केला पाहिजे. पण, वैनगंगा याबाबत अपवाद ठरली आहे.

शुद्धीकरणाचा प्रकल्प कागदावरच
नागपूर महानगरपालिकेने पाणी शुद्धीकरणाचा प्रकल्प तयार केला. मागील पाच वर्षांपासून प्रकल्प सुरू करून वैनगंगेत शुद्ध पाणी सोडण्याचे आश्‍वासन मिळत आहे. मात्र, आजवर वैनगंगेत शुद्ध पाणी सोडण्यात आले नाही. तर, प्रकल्पच कागदावर असल्याने भंडारा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या नशिबी अशुद्ध पाणीच आहे. गावागावांत जलशुद्धीकरण संयंत्र लावण्याचे आश्‍वासन मिळाले होते. तेही आश्‍वासन हवेतच विरल्याने नागरिकांना अशुद्ध पाण्यानेच तहान भागवावी लागत आहे.

इकॉर्नियाचा वैनगंगेला विळखा
गोसे खुर्द धरणामुळे बारमाही वाहणारी वैनगंगा संथ झाली. पाणी साठून राहत असल्याने मध्यंतरीच्या काळात इकॉर्निया या वनस्पतीने वैनगंगेला विळखा घातला आहे. आधीच रासायनिक द्रव्ययुक्त नागगदीच्या पाण्याने दूषित झालेल्या वैनगंगेच्या समस्येत इकॉर्नियामुळे भर पडली आहे. पाच वर्षांत स्थानिक लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे लक्ष दिले नाही. यामुळे वैनगंगेला प्रदूषणाचे ग्रहण लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vainganga river pollution is at its highest