फेक हेल्पलाइन मेसेज ठरतोय महिला सुरक्षेतील व्हायरस

मनीषा मोहोड ः सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

9969777888 हा जीपीआरएससाठी आणि निर्भया पथक म्हणून 9833312222 हे क्रमांक व्हायरल केले जात आहेत. मात्र या दोन्ही नंबरच्या हेल्पलाइन हेल्पलेस असून, दोन्ही नंबरची सेवा बंद असल्याची कॅसेट पलीकडून वाजविण्यात येते.

नागपूर ः महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. एकीकडे शासन अशा घटना रोखण्यासाठी प्रयत्नशील असताना वाईट प्रवृत्तीच्या व्यक्तींना रोखणे मोठे आव्हान पोलिस प्रशासनासमोर आहे. यातच महिलांना संकटकाळी पोलिसांची मदत मिळावी, यासाठी राज्यातच नव्हेतर देशात सर्वत्र प्रत्येक जिल्ह्यासाठी पोलिसांच्या 100 नंबर व्यतिरिक्त 1091 ही महिला हेल्पलाइन कार्यान्वित आहे. परंतु, खरे हेल्पलाइन नंबर न टाकता खोटे आणि बंद असलेले मोबाईल नंबर सोशल मीडियावर टाकून, जनतेची दिशाभूल करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत.

महिला व बालकांना संकटकाळी मदत व्हावी, यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाच्या वतीने हेल्पलाइन सुरू करण्यात आल्याचे मेसेज सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून फिरत आहेत. यामध्ये 9969777888 हा जीपीआरएससाठी आणि निर्भया पथक म्हणून 9833312222 हे क्रमांक व्हायरल केले जात आहेत. मात्र या दोन्ही नंबरच्या हेल्पलाइन हेल्पलेस असून, दोन्ही नंबरची सेवा बंद असल्याची कॅसेट पलीकडून वाजविण्यात येते. अशा फेक मेसेजमुळे मूळ यंत्रणेला व्हायरसची लागण होत असल्याचे बोलले जात आहे.

केवळ दोनच क्रमांक सुरू

हैदराबादमधील डॉ. प्रियांका या पशुवैद्यक युवतीवर बलात्कार करून तिला जिवंत जाळण्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वीच घडला. यापूर्वीसुद्धा दिल्लीत निर्भया व कोपर्डीत चिमुकलीची हत्या झाली आहे. संपूर्ण देश या घटनेवर आक्रोश करीत आहे. या अतिप्रसंगाच्या घटनेनंतर फेक हेल्पलाइनचे मेसेजचे प्रकार वाढीस लागले असले तरी, नागपूर जिल्ह्यात केवळ पोलिस प्रशासनाचा भरोसा सेलचा 1091 हा हेल्पलाइन नंबर 24 तास मुलींसाठी सुरू आहे तर ज्येष्ठ नागरिकांसाठीचा 2226533 हा हेल्पलाइन नंबर असे केवळ दोन हेल्पलाइन नंबर 24 तास सेवेसाठी कार्यरत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सोशल मीडियावर खोटा आव

काही महिलांना रात्री ऑटो किंवा टॅक्‍सीने एकट्याने प्रवास करावा लागल्यास त्या ऑटो किंवा टॅक्‍सीचा नंबर अमुक एका नंबरवर एसएमएस करा, आपल्या मोबाईल फोनवर एक मॅसेज येईल एक्‍नॉलेजमेंटचा आणि आपल्या मोबाईलद्वारे त्या वाहनावर जीपीआरएसद्वारे नजर ठेवली जाईल. अशा पद्धतीचे एक ना अनेक मेसेज सध्या व्हॉट्‌सऍप, फेसबुकवर फिरत आहेत. या फेक मेसेजमधील सर्व नंबर बंद असून, यामुळे महिला सुरक्षेच्या यंत्रणेलाच व्हायरसची लागण झाल्याचे बोलले जात आहे. हैदराबाद येथील डॉ. प्रियांका यांच्या घटनेनंतर अशा पद्धतीच्या मेसेजचा जणू पूर सोशल मीडियावर आला आहे. महिला सुरक्षेचा आव आणून, आलेला मेसेज फॉरवर्ड करण्यात समाधान मानत सर्वसामान्यही याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

नागपूर पोलिसांचा मदतीचा हात

हैदराबादमधील डॉ. प्रियांका बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणासारख्या निंदनीय घटनेपासून वाचण्यासाठी पोलिसांनी एक पाऊल पुढे असणे गरजेचे आहे. हीच बाब हेरून नागपूरचे पोलिस आयुक्‍त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी एकट्या मुली आणि महिलांसाठी स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. रात्री नऊनंतर कोणत्याही मुलीला किंवा महिलेला घरी जाण्यास वाहन उपलब्ध नसल्यास त्यांनी पोलिसांना फोन करावा. पोलिस खुद्द शासकीय वाहनातून तिला घरी सोडून देतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी 1091 सह 9823300100 हा नंबर सक्रिय करण्यात आला असून, या नंबरवर फोन करून संपर्क केल्यास त्यावेळी कर्तव्यावर असलेले पोलिस अधिकारी किंवा कर्मचारी याची दखल घेतील आणि पोलिस ठाण्याच्या उपलब्ध वाहनात महिला कर्मचारी नेमून सांगितलेल्या पत्त्यावर सोडून देण्याचे काम करतील. या प्रकारचे निर्देश पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी सर्व पोलिस ठाण्यांना दिले आहेत.

पोलिसांच्या भरोसा सेलचा 1091 या हेल्पलाइन क्रमांकावर अत्यंत आपतकालीन कारणासाठी पोलिसांशी मदत मिळविण्याकरिता संपर्क साधणे गरजेचे आहे. या नंबरवर दिवसभरात 10 ते 15 कॉल येतात. परंतु, अनेक नागरिक आपल्या अन्य व्यक्तिगत तक्रारींसाठी या क्रमांकावर संपर्क साधतात. त्यामुळे हा क्रमांक कायम व्यस्त राहत असून, या हेल्पलाइन क्रमांकावर ताण येतो. त्यामुळे गरजू व्यक्तींना वेळीच पोलिसांची मदत मिळत नाही.
- विद्या जाधव, भरोसा सेल, नागपूर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vidarbh nagpur message fake helpline women securuty