जगाचा निरोप घेताना उमेश यांनी दिले तिघांना जीवदान

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

दोघांच्या डोळ्यांत प्रकाश पेरणी करीत जगाचा निरोप घेतला. यात मोटघरे यांची पत्नी सिसिली आणि मुलगा मास्टर एश यांनी समाजासमोर अवयवदानाचा नवा आदर्श घालून दिला.

नागपूर ः मंगळवार (ता. 10) सकाळी उमेश मोटघरे यांच्या मेंदूमध्ये अचानक रक्तस्त्रात झाला. नातेवाइकांनी त्वरित लकडगंज येथील न्यू इरा रुग्णालयात हलवले. येथील डॉक्‍टरांनी त्यांचा जीव वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, ब्रेन हॅमरेजमुळे त्यांच्या मेंदूपेशी मृत पावत असल्याचे निदान केले. मेंदूतील रक्तस्त्राव थांबत नसल्याने ते हे जग पाहू शकणार नसल्याचे डॉक्‍टरांनी सांगताच, कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

अनंताच्या प्रवासाला निघालेल्या मोटघरे यांच्या कुटुंबीयांनी काळजावर दगड ठेवत अवयवदानाचा निर्णय घेतला. मृत्यूला कवटाळतानाही त्यांनी यकृतासह दोन्ही किडनी दानातून तिघांना जीवनदान दिले. तर दोघांच्या डोळ्यांत प्रकाश पेरणी करीत जगाचा निरोप घेतला. यात मोटघरे यांची पत्नी सिसिली आणि मुलगा मास्टर एश यांनी समाजासमोर अवयवदानाचा नवा आदर्श घालून दिला.

जरीपटका भागातील व्ही.एच.बी. कॉलनी येथील रहिवासी उमेश हरिश्‍चंद्र मोटघरे प्रादेशिक मनोरुग्णालयात प्रशासकीय अधिकारी होते. ऑगस्ट 2019 मध्ये ते सेवानिवृत्त झाले. अवघ्या तीन महिन्यांनंतर नियतीने त्यांच्यावर घाव घातला. ब्रेन हॅमरेज झाले. न्यू इरात अतिदक्षता विभागात उपचार दिले. परंतु, उपचाराला दाद मिळत नसल्याने मेंदूमृत्यू तपासणी केली.

रुग्णालयाचे संचालक तसेच हृदयरोगतज्ज्ञ डॉ. आनंद संचेती आणि डॉ. नीलेश अग्रवाल यांनी मोटघरे यांच्या अवयवदानासंदर्भात समुपदेशन केले. मोटघरे यांची पत्नी आणि मुलांसह नातेवाइकांनी अवयवदानाची लेखी परवानगी दिली. ही सूचना विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी आणि सचिव डॉ. संजय कोलते यांना देण्यात आली. प्रतीक्षा यादी तपासत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली.

प्रतीक्षा यादीनुसार न्यू इरा रुग्णालयात एक जण यकृताच्या, दुसरा रुग्ण मूत्रपिंडाच्या तर तिसरा रुग्ण ऑरेंजसिटी रुग्णालयात किडनीच्या प्रतीक्षेत असल्याचे आढळले. यकृत प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. राहुल सक्‍सेना, डॉ. साहिल बंसल, डॉ. सुशांत गुल्हाने, मूत्रपिंड प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. शिवनारायण आचार्य, डॉ. अमित देशपांडे, डॉ. रवी देशमुख, डॉ. रोहित गुप्ता, स्पायनल सर्जन डॉ. नीलेश अग्रवाल, डॉ. निधीश मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली यकृत आणि किडनी प्रत्यारोपण यशस्वी झाले.

खामला येथील ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये दुसरी किडनी प्रत्यारोपित करण्यात आली. नेत्रदानही करण्यात आले. अवयवदान करणाऱ्या मोटघरे कुटुंबाचे यावेळी डॉ. संचेती यांनी आभार मानले.

22 एप्रिल 2018 रोजी नागपुरात पहिले यकृत प्रत्यारोपण

उपराजधानीत 22 एप्रिल 2018 रोजी पहिले यकृत प्रत्यारोपण न्यू इरात झाले होते. दरम्यान, विभागीय अवयवदान समितीच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी, तत्कालीन सचिव डॉ. रवी वानखेडे आणि सध्याचे सचिव डॉ. संजय कोलते यांच्या प्रयत्नातून अवयवदानाच्या चळवळीला गती मिळाली. दोन वर्षांत 152 मेंदूमृत लोकांचे अवयवदानातून 43 यकृत प्रत्यारोपण उपराजधानीत झाले. यातील 26 यकृतांचे प्रत्यारोपण हे न्यू इरात झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vidarbh nagpur organ donation