आरटीओच्या साईटवर टँकरचा क्रमांक निघाला दुचाकीचा

जीवन सोनटक्के 
रविवार, 12 नोव्हेंबर 2017

टँकरचा क्रमांक आम्ही आरटीओच्या संकेतस्थळावर तपासला असता तो दुचाकीचा आला आहे. परिणामी, आम्ही एक पथक कर्नाटकला पाठविले आहे. तेथून मिळालेल्या माहितीनंतरच आम्ही पुढील कारवाई करणार आहोत. पोलिस कोठडीत असलेल्या दोघांकडून आम्हाला विशेष माहिती मिळालेली नाही

अकोला - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई पथकाने मूर्तिजापूरजवळ पकडलेल्या स्पिरीटने भरलेल्या टँकरचा क्रमांक आरटीओच्या ऑनलाइन साईटवर दुचाकीचा मिळत आहे.

परिणामी, अबकारी विभागाचे एक पथक कर्नाटक येथे टँकरचा खरा क्रमांक आणि त्याच्या मालकाचा शोध घेण्यासाठी गेलेले आहे. मालकाचा शोध आणि त्याला ताब्यात घेतल्यानंतरच या स्पिरीट चोरीचे लागेबांधे समोर येणार आहेत.

मुंबईचे भरारी पथक आणि अकोला अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मूर्तिजापूरजवळील धाब्यावर उभ्या असलेल्या टँकर क्र. केए - ०१ - बी - ६२८१ च्या चालकांना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केली. तसेच त्या टँकरचीही तपासणी केली असता टँकरच्या एका रकान्यामध्ये गोडे तेल असल्याचे मिळून आले. तर उर्वरित दोन रकान्यामध्ये स्पिरीट भरलेले असल्याचे अधिकाऱ्यांना दिसले. त्यांनी टँकरचा चालक पिन्नर पेरूमल तेलवम व सत्तार अब्दुल रहीम या दोघांना ताब्यात घेतले. तब्बल ११ हजार लिटर स्पिरीट किंमत १३ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल अबकारी विभागाने जप्त केला. दरम्यान, सध्या पोलिस कोठडीत असलेल्या दोन्ही चालकांना मराठी किंवा हिंदी बोलता येत नसल्याने तामीळ भाषेत बोलणाऱ्या व्यक्तीच्या सहाय्याने त्यांची चौकशी सुरू आहे. या चौकशीमध्ये या दोघांनाही रायपूरजवळील एका गावाजवळ हा टँकर चालविण्यासाठी देण्यात आला होता. त्यावेळी त्यांना ५० हजार रुपयेही देण्यात आले होते. त्यासोबतच हा टँकर मुंबईला जाणाऱ्या राष्ट्रीय मार्गानेच नेण्याचे त्यांना सांगितले असल्याचे समोर आले आहे. परंतु, हा टँकर त्यांच्या ताब्यात कोणी दिला व कोणाचा त्यांना फोन आला, यासंदर्भात त्यांच्याकडून कुठलीच माहिती अबकारी विभागाला मिळालेली नाही. दरम्यान, अबकारी विभागाने या टँकरचा क्रमांक आरटीओच्या ऑनलाइन संकेतस्थळावर शोधला. हा क्रमांक एका दुचाकीचा असल्याचे त्यातून समोर आले. त्यामुळे या टँकरचा नेमका कोणता क्रमांक आहे, त्याचे खरे मालक कोण आहेत, याचा तपास करण्यासाठी एक पथक कर्नाटक येथे गेले आहे. या पथकाने टँकरचा चेसीस क्रमांक, मॉडेल क्रमांकासह आदी संपूर्ण माहिती गोळा करून ते घेऊन गेले आहेत. जोपर्यंत या टँकरच्या मालकाचा शोध लागत नाही, तोपर्यंत अवैधरित्या वाहतूक होणाऱ्या स्पिरीट चोरीचे प्रकरण समोर येणार नाही.

टँकरचा क्रमांक आम्ही आरटीओच्या संकेतस्थळावर तपासला असता तो दुचाकीचा आला आहे. परिणामी, आम्ही एक पथक कर्नाटकला पाठविले आहे. तेथून मिळालेल्या माहितीनंतरच आम्ही पुढील कारवाई करणार आहोत. पोलिस कोठडीत असलेल्या दोघांकडून आम्हाला विशेष माहिती मिळालेली नाही.
-राजेश कावरे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, अकोला

Web Title: vidarbha news: spirit tanker