1962 मध्ये विदर्भवाद्यांना मिळाल्या होत्या अकरा जागा

File photo
File photo

नागपूर : सन 1956 मध्ये विदर्भाचा आठ जिल्ह्यांचा प्रदेश मध्य प्रांतातून काढून द्विभाषिक मुंबई राज्याला जोडण्यात आला. पुढे 1960 मध्ये द्वैभाषिक राज्याचे विघटन करण्यात येऊन विदर्भासह संपूर्ण मराठी प्रदेशाचे नवे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. उर्वरित भाग जोडून गुजरात राज्याची निर्मिती झाली.
सन 1956 मध्ये जेव्हा विदर्भाचा द्वैभाषिक राज्यात समावेश करण्यात आला तेव्हापासून विदर्भातील जनतेची वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी होऊ लागली. पुढे द्वैभाषिक मुंबई राज्याचे विघटन झाल्यानंतर परत एकदा स्वतंत्र राज्यासाठी नव्या उमेदीने विदर्भाचे आंदोलन तीव्र झाले. कोणत्याही परिस्थितीत विदर्भाचे स्वतंत्र राज्य झालेच पाहिजे या मताची मंडळी विदर्भातील जवळपास सगळ्याच पक्षांमध्ये थोड्या अधिक प्रमाणात होती. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विदर्भाची जनता या आंदोलनासोबत होती. त्यामुळे कॉंग्रेसवर संपूर्ण निष्ठा असलेला मतदारही विदर्भ राज्याच्या बाजूने झुकला होता. या पार्श्‍वभूमीवर 1962 ची निवडणूक झाली. अर्थातच या निवडणुकीत विदर्भाच्या जनतेने विदर्भवाद्यांना साथ दिली. विदर्भवाद्यांजवळ निवडणूक लढण्यासाठी लागणारी यंत्रणा, साधनसामग्री नव्हती. परंतु, जनतेच्या पाठबळावर वेगवेगळ्या जिल्ह्यांत विदर्भवादी कुठे अपक्ष तर कुठे विदर्भाच्या नावाने निवडणूक लढले. त्यात त्यांना भरपूर यश आले.
या निवडणुकीत संपूर्ण विदर्भात विदर्भवाद्यांचा एक पक्ष असता आणि प्रत्येक ठिकाणी एकच उमेदवार लढला असता तर त्यांना निश्‍चितच मोठ्या प्रमाणावर जागा मिळाल्या असत्या. निवडणुकीसाठी लागणारा समन्वय आणि एकवाक्‍यता होऊ शकली नाही. वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी करणाऱ्या वेगवेगळ्या संघटनांचे प्रतिनिधी वेगवेगळे लढले. शिवाय त्यांच्याजवळ राष्ट्रीय पक्षाप्रमाणे साधने आणि यंत्रणा नव्हती. त्यामुळे लोकांचे पाठबळ असूनही त्यांना मोठ्या प्रमाणावर यश खेचून आणता आले नाही. असे असले तरीही कॉंग्रेसच्या विरोधात विदर्भवाद्यांना ज्या जागा मिळाल्या ते चळवळीसाठी मोठे यश मानण्यात येत होते. 1962 च्या निवडणुकीत विदर्भवाद्यांना एकूण 11 जागा मिळाल्या. आचार्य दांडेकर, धोंडबाजी हेडाऊ, राजे विश्‍वेश्‍वर राव, जांबुवंतराव धोटे अशी विदर्भाचे आंदोलन चालविणारी मंडळी निवडून आली होती.
या निवडणुकीत एकूण 63 मतदारसंघांपैकी 45 जागा कॉंग्रेसला, तीन जागा रिपब्लिकन पक्षाला, दोन जागा प्रजा समाजवादी पक्षाला, एक जागा शेकापला आणि 12 जागा अपक्षांना मिळाल्या. बुलडाणा मतदारसंघातील सातपैकी सहा जागा कॉंग्रेसने जिंकल्या होत्या. अकोला जिल्ह्यातील आठपैकी सात, अमरावती जिल्ह्यातील आठपैकी चार जागा, यवतमाळ जिल्ह्यात आठपैकी सात जागा कॉंग्रेसने जिंकल्या. नागपूर जिल्ह्यातील दहापैकी सात, वर्धा जिल्ह्यातील चारपैकी दोन, भंडारा जिल्ह्यातील नऊपैकी सहा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील नऊपैकी सहा जागा कॉंग्रेसने पटकावल्या. निवडणूक लढलेल्या इतर पक्षात रिपब्लिकन, शेतकरी कामगार आणि प्रजा समाजवादी पक्ष वगळता एकाही पक्षाला यश मिळाले नाही. रिपब्लिकन पक्षाने अमरावती, भंडारा आणि नागपूर जिल्ह्यात प्रत्येकी एक जागा मिळवली. प्रजा समाजवादी पक्षाला दोन जागा मिळाल्या. त्या दोन्ही भंडारा जिल्ह्यातील होत्या तर शेकापला बुलडाणा जिल्ह्यातील एक जागा मिळाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com