Vidhan Sabha 2019 : भाजपचा विजयरथ रोखण्याचे आव्हान

प्रवीण धोपटे
Friday, 23 August 2019

इच्छुकांच्या गर्दीने पेच
वर्धा, हिंगणघाट, देवळी आणि आर्वी अशा चार विधानसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत चारही प्रमुख पक्षांनी स्वतंत्रपणे उमेदवार दिले होते. मात्र, येत्या निवडणुकीत आघाडी आणि युती होण्याची दाट शक्‍यता आहे. अशा स्थितीत प्रत्येक मतदारसंघात उमेदवारी कुणाच्या वाट्याला येणार, यावरून युती-आघाडीत मत-मनभेद होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे राजकीय कुरघोड्यांना उधाण येण्याची शक्‍यता आहे. काही मतदारसंघांमध्ये एकापेक्षा अधिक दावेदार असल्याने पक्षांतर्गत ओढताणही पहायला मिळत आहे.

विधानसभा 2019 : वर्धा जिल्ह्यातील वर्धा, देवळी आणि आर्वी हे तीन मतदारसंघ २००९ मध्ये काँग्रेसकडे, तर हिंगणघाट राष्ट्रवादी काँग्रेसकडे होता. युतीत वर्धा आणि हिंगणघाट शिवसेनेकडे, तर आर्वी आणि देवळी भाजपकडे होते. मात्र, २०१४ च्या निवडणुकीने या समीकरणाची घडी पूर्णतः विस्कटली. वर्धा आणि हिंगणघाट या दोन्हीही मतदारसंघांत मागील निवडणुकीत भाजपचे उमेदवार निवडून आले. पण त्यातील हिंगणघाटसाठी शिवसेना आग्रही राहील. तीच स्थिती वर्धा मतदारसंघाबाबतही राहणार आहे. आघाडीतही राष्ट्रवादी वर्धेची मागणी जोर लावून करेल. त्यामुळे हा जागावाटपाचा पेच कसा सोडवला जाईल, हे आता पाहिले पाहिजे.

काँग्रेसचा बालेकिल्ला अशी एकेकाळी ओळख असलेल्या वर्धा जिल्ह्यात आता भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे. नगरपंचायती, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदेत भाजपचीच सत्ता आहे. लोकसभा निवडणुकीतही भाजपचे रामदास तडस पावणेदोन लाखापेक्षा अधिक मतांनी निवडून आले. मागील विधानसभा निवडणुकीत भाजप-काँग्रेसने जिल्ह्यातील चारपैकी प्रत्येकी दोन मतदारसंघांत विजय मिळवीत फिफ्टी-फिफ्टी यश पदरात पाडून घेतले होते; मात्र, या वेळी काँग्रेसपुढील आव्हाने अधिक वाढली आहेत. 

वर्धा मतदारसंघात आमदार डॉ. पंकज भोयर (भाजप) यांना पक्षातील काही प्रतिस्पर्ध्यांकडून छुपा विरोध आहे; मात्र, ते सलग दुसऱ्यांदा उमेदवारी मिळण्याविषयी आश्‍वस्त आहेत. येथून नगराध्यक्ष अतुल तराळे, माजी खासदार सुरेश वाघमारे हेही भाजपकडून इच्छुक असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मागील दोन निवडणुकांत काँग्रेसचे शेखर शेंडे यांना पराभव स्वीकारावा लागला. या वेळी त्यांच्यासह माजी रणजीपटू पराग सबाने, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय जयस्वाल, माजी नगराध्यक्ष सुनीता इथापे, राजेंद्र शर्मा, सुधीर पांगूळ आदींनी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला आहे. दुसरीकडे, या मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार दोनदा पराभूत झाल्याने ही जागा राष्ट्रवादीला सोडण्यात यावी, अशी मागणी जिल्हा राष्ट्रवादीने पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. राष्ट्रवादीचे प्रा. सुरेश देशमुख २००९ च्या निवडणुकीत अपक्ष निवडून आल्याचा दाखलाही त्यासाठी दिला जातो. युती-आघाडी न झाल्यास शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख राजेश सराफ आणि राष्ट्रवादीकडून सुरेश देशमुख उभे राहतील, हे निश्‍चित आहे.

हिंगणघाट मतदारसंघात आमदार समीर कुणावार यांच्यासाठी युती झाल्यास शिवसेनेने जागा सोडावी, यासाठी भाजप आग्रही राहणार असली तरी या मतदारसंघातून तीनदा निवडून आलेले उपनेते अशोक शिंदे यांची दावेदारी शिवसेना सहजासहजी मान्य करणार नाही. राष्ट्रवादीकडून माजी आमदार राजू तिमांडे, माजी नगराध्यक्ष ॲड. सुधीर कोठारी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रा. दिवाकर गमे इच्छुक आहेत. राजू तिमांडे २००४ ची निवडणूक जिंकले होते. त्यानंतरच्या दोन निवडणुकांत त्यांना अपयश आले. राष्ट्रवादीकडून तिमांडे, कोठारी यांचे नाव आघाडीवर आहेत. आघाडी न झाल्यास काँग्रेसकडून माजी नगराध्यक्ष पंढरी कापसे यांना उमेदवारीची शक्‍यता आहे.                                              

देवळी मतदारसंघातून आमदार रणजित कांबळे (काँग्रेस) सलग चारदा निवडून आलेत. पाचव्यांदा त्यांचा विजयरथ रोखण्याकरिता भाजपकडून लढण्यास इच्छुकांची भाऊगर्दी आहे. यात भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे, माजी खासदार सुरेश वाघमारे, डॉ. शिरीष गोडे यांची नावे आघाडीवर आहेत. मागील निवडणुकीत कांबळे यांनी भाजपचे सुरेश वाघमारे यांचा अवघ्या ९४९ मतांनी पराभव केला होता. त्यामुळे या वेळी गड राखण्याचे मोठे आव्हान कांबळे यांच्यापुढे आहे. 

आर्वी मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत होण्याची शक्‍यता आहे. मात्र, भाजपची उमेदवारी कुणाला मिळते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. माजी आमदार दादाराव केचे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे सल्लागार सुधीर दिवे यांच्यात उमेदवारीसाठी रस्सीखेच आहे. दोघांनीही कार्यक्रमांचा धडाका लावून उमेदवारीसाठी दावेदारी केली आहे.

आमदार अमर काळे (काँग्रेस) हे मागील निवडणुकीत केवळ ३१४३ मतांनी विजयी झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Wardha District BJP Congress NCP Politics