Vidhansabha 2019 : संभाषणाच्या ‘क्‍लिप’ने वाढवली रंगत

सुरेंद्र चापोरकर
शुक्रवार, 3 मे 2019

नेत्यांच्या संभाषणांच्या कथित क्‍लिपने लोकसभेच्या प्रचाराआडून सुरू असलेल्या विधानसभेच्या मोर्चेबांधणीचे स्वरूप आणि व्याप्ती स्पष्ट होते. इच्छुकांनी प्रचारातच आपले मनसुबे, भूमिका व तयारी दाखवत लढती कशा असतील, हेही दाखवून दिले आहे.

नेत्यांच्या संभाषणांच्या कथित क्‍लिपने लोकसभेच्या प्रचाराआडून सुरू असलेल्या विधानसभेच्या मोर्चेबांधणीचे स्वरूप आणि व्याप्ती स्पष्ट होते. इच्छुकांनी प्रचारातच आपले मनसुबे, भूमिका व तयारी दाखवत लढती कशा असतील, हेही दाखवून दिले आहे.

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्याच्या मार्गावर असतानाच भाजप आणि काँग्रेस या पक्षांच्या नेत्यांच्या संभाषणाच्या कथित क्‍लिपने सध्या जिल्ह्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्‍वभूमीवर लोकसभेत दोन्हीही पक्षाच्या नेत्यांनी घेतलेल्या मेहनतीवर पाणी फेरले गेल्याचे चित्र आहे. विधानसभेत त्याची ठिणगी पडण्याचे संकेत आहेत. 

तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांना पराभूत करण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी आणि अमरावतीचे माजी आमदार रावसाहेब शेखावत यांच्यात  झालेले संभाषण विधानसभा निवडणुकीत आपले पाय रोवण्याची तयारी मानले जाते. अर्थातच सूर्यवंशी यांनी तिवस्यात त्यांची फिल्डिंग लावली आहे. तेथे भाजपच्या निवेदिता चौधरी तयारीत आहेत. त्यामुळे भाजपमधील दोन इच्छुकांतील वाद समोर येण्याचे संकेत आहेत, तर आपल्याच पक्षाच्या शेखावतांच्या कथित संभाषणाने आमदार यशोमती ठाकूर भडकल्या आहेत. 

रावसाहेब शेखावत हे अमरावती विधानसभा मतदारसंघातून परत एकदा रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत त्यांचा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारात सर्वत्र वावर होता. दुसरीकडे आमदार डॉ. सुनील देशमुखही युतीच्या उमेदवाराच्या प्रचारात व्यग्र होते. त्यामुळे अमरावतीत परत एकदा रावसाहेब शेखावत विरुद्ध सुनील देशमुख असा सामना रंगण्याचे संकेत आहेत. 
बडनेरात युवा स्वाभिमानचे रवी राणा गेल्या दोन पंचवार्षिकपासून आमदार आहेत. त्यांच्या पत्नी नवनीत राणा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असल्याने, त्यांचा बडनेरा मतदारसंघातील संपर्क लक्षवेधी होता. या मतदारसंघात भाजपतर्फे तुषार भारतीय, शिवराय कुळकर्णी, शिवसेनेचे सुनील खराटे शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. आजवर युतीत हा मतदारसंघ शिवसेनेसाठी तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत तो राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेला आहे.  

लोकसभा निवडणुकीत सर्वांत जास्त चर्चेत राहिलेला मतदारसंघ म्हणजे मेळघाट. माजी आमदार राजकुमार पटेल यांनी नवनीत राणा यांना साथ देण्याची घोषणा करून विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचे आपले मनसुबे स्पष्ट केले आहेत. दर्यापूर मतदारसंघात माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ पुन्हा एकदा रिंगणात उतरतील काय याची उत्सुकता ताणली गेली आहे. लोकसभा निवडणुकीनिमित्ताने ते पूर्णवेळ प्रचारात होते. लोकसभा निवडणुकीत अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी तटस्थ भूमिका घेतली होती. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनेच त्यांची ही रणनीती होती. दुसरीकडे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी या मतदारसंघात चांगलाच जोर लावला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha Election 2019 Amravati Constituency Politics