esakal | विजय जावंधिया म्हणाले, तंत्रज्ञानाच्या अतिरेकी वापरामुळेच शेतकरी देशोधडीला
sakal

बोलून बातमी शोधा

विजय जावंधिया

विजय जावंधिया म्हणाले, तंत्रज्ञानाच्या अतिरेकी वापरामुळेच शेतकरी देशोधडीला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : "संकरित बियाण्यांचा करा पेरा लक्ष्मी येईल घरा' असा नारा हरितक्रांतीच्यावेळी दिला गेला. परंतु, आज घरच्या लक्ष्मीच्या अंगावरील मंगळसूत्रही गहाण ठेवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. तंत्रज्ञानाचा अविवेकी व अविचारी स्वीकार हेच यामागील मूळ असल्याचा आरोप शेतीप्रश्‍नाचे ज्येष्ठ अभ्यासक विजय जावंधिया यांनी केला.
कस्तुरबा भवन येथे सेफ्टी फूड या विषयावरील बीजोत्सवअंतर्गत आयोजित परिषदेत ते बोलत होते. यावेळी अफसर जाफरी, नाना आखरे, अमिताभ पावडे, वसंत फुटाणे, सुधीर पालीवाल, उमेंद्र दत्त, दिनावाज वारिया, कविता कुरुंगट्टी, डॉ. बालासुब्रमणी, डॉ. शरद पवार, ललित बहाळे यांची उपस्थित होती.
विजय जावंधिया म्हणाले, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कै. शरद जोशी यांनी पीटीआय (प्राईज, टेक्‍नॉलॉजी आणि इन्फ्रास्ट्रक्‍चर) असा मंत्र दिला होता. तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना ते शेतकऱ्यांसाठी फायद्याचे कसे आणि या तंत्रज्ञानासाठी संसाधनाची उपलब्धता हा विचार जोशी यांनी मांडला. परंतु, आज केवळ तंत्रज्ञानाचाच विचार होताना दिसत आहे. उत्पन्न हा घटकच का? दुर्लक्षित केला आहे हे कुणास ठाऊक. त्यामुळे अन्न सुरक्षेचा विचार करताना शेतकरी सुरक्षेला प्राधान्य द्यावेच लागणार आहे. त्यामुळेच एच.टी.बिटी समर्थक तणनाशक उत्पादक कंपन्यांचे एजंट भासत आहेत. नुसत्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतकरी समृद्ध होतो तर तो यापूर्वी का होऊ शकला नाही. तो आर्थिकदृष्ट्या समृद्ध नसल्यानेच साधी मजुरांची मजुरी देणेही शक्‍य होत नाही. त्याला आणखी गाळात घालण्यासाठी हे षड्‌यंत्र रचले गेले आहे. सरकारनेदेखील विषमुक्‍त अन्नाला वेगळे निकष लावत वेगळी किंमत ठरवावी. तेव्हाच ही चळवळ उभी राहील.

loading image
go to top