पाहिलेत का कधी प्रेमाचे गाव?

संदीप रायपुरे
Monday, 21 September 2020

राष्ट्रसंताच्या पदस्पर्शाने पावन, तंटामुक्त गाव मोहिमेचा विशेष शांतता पुरस्कार प्राप्त करंजी गावची ओळख "न्यारीच" आहे. प्रेमविवाहाने तर गावचे नाव सातासमुद्रापलीकडे गेले.

गोंडपिपरी : कोणत्या गावाचे काय वैशिष्ट्य असेल, हे सांगणे कठीणच. एखादे गाव पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असते, तर एखादे गाव स्मारक म्हणून प्रसिद्ध असते. एखादे गाव तिथे पिकणाऱ्या किंवा विकल्या जाणाऱ्या वस्तुसाठी प्रसिद्ध असते. मात्र प्रेमाचे गाव अशी ओळख असणारे गाव विरळाच. का मिळाली करंजी गावाला प्रेमाचे गाव अशी ओळख, हे जाणून घेणेही मजेशीर ठरेल.

राष्ट्रसंताच्या पदस्पर्शाने पावन, तंटामुक्त गाव मोहिमेचा विशेष शांतता पुरस्कार प्राप्त करंजी गावची ओळख "न्यारीच" आहे. प्रेमविवाहाने तर गावचे नाव सातासमुद्रापलीकडे गेले. या गावात शंभरावर प्रेमविवाह झाले आहेत. राज्याचे मदत, पुनर्वसन,आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवारांची जन्मभूमी करंजी आहे. या गावाची लोकसंख्या चार हजार आहे. मात्र, गावच्या मुख्य प्रवेशद्वारावर मात्र केवळ चार घरांच्या गुड्याचे फलक लावण्यात आले आहे. यामुळे या मार्गाने ये-जा करणारे प्रवासी बुचकाळ्यात पडले आहेत. गावकऱ्यांनीही यावर नाराजी व्यक्त केली. करंजी गावचा फलकच मुख्य मार्गावर दिसेनासा झाला. यामुळे चक्क मंत्र्यांचे गाव दिसेना, असे म्हणायची पाळी आली आहे.

गोंडपिपरी तालुक्‍यातील करंजी हे सामाजिक, राजकीयदृष्ट्या पुढारलेले गाव. तालुक्‍यातील ९८ गावांत हे गाव सदैव मुख्य प्रवाहात असते. चार हजार लोकसंख्येच्या करंजी गावालगत महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाने ३५ एकरांचा भूखंड १९८० च्या दशकात अधिग्रहीत केला. राष्ट्रसंताच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गावाने तंटामुक्त गाव मोहिमेत उल्लेखनीय कार्य करीत विशेष शांतता पुरस्कार मिळविला.

एवढेच नाही तर राज्याचे मदत, पुनर्वसन,आपत्ती व्यवस्थापन मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची जन्मभूमी करंजी आहे. वडेट्टीवारांचे वडील नामदेवराव वडेट्टीवार करंजीचे सरपंच होते. याचदरम्यान वडेट्टीवारांचे बालपण करंजीत गेले. गावाच्या मातीशी त्यांची नाळ जुळली आहे. हा ऋणानुबंध वडेट्टीवारांनी कायम ठेवला. जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा येताच त्यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घेतला आहे.

करंजी गावच्या प्रवेशद्वारावर मात्र "करंजी" ऐवजी "डुबगोडा" नावाचा फलक लावण्यात आला. डुबगोडा हा केवळ चार घरांचा गुडा आहे. जंगलालगत वसलेल्या या पाड्यावर जाण्यासाठी करंजी गावामधून ३ किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. बामनी ते नवेगाव (वा.) पर्यंतच्या रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनीने काही दिवसांपूर्वी हा बोर्ड करंजीच्या प्रवेशद्वारावर लावला आणि एकच गोंधळ उडाला. गावकरीही बुचकाळ्यात पडले. एकंदरीत करंजी गावचा फलकच मुख्य मार्गावरून दिसेनासा झाला आहे.

अनावधाने हा प्रकार
या मार्गाचे काम करणारी मंडळी स्थानिक नाहीत. यामुळे अनावधाने हा प्रकार झाला असावा. यात दुरुस्ती करण्यात येईल.
विवेक मिश्रा, अभियंता, राष्ट्रीय महामार्ग.

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Village of love in Chandrapur district