तीन दिवसांपासून ‘त्याची‘ या गावात दहशत…नागरिकांत धास्ती... मग पुढे घडले असे

बिपिन पांडे
रविवार, 2 ऑगस्ट 2020

गेल्या तीन दिवसांपासून त्याने मासोद येथे बस्तान मांडले आहे. त्यामुळे गावकरीही भयभित झाले आहेत. त्ने अनेक गाईंचा फडशा पाडला आहे. मात्र वनविभागाने कोणतीच दखल घेतली नाही. त्यामुळे जनावर मालकांचे नुकसान होत आहे. त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मासोद (जि. वर्धा) : जंगलव्याप्त असलेल्या या भागात वाघ, बिबट्याचे हल्ले नित्याचेच झाले आहेत. आता मात्र या जनावरांनी थेट गावात येत शिकार केल्याचा प्रकार झाल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लगतच्या वानरकुंड शिवारात चरण्यासाठी गेलेल्या गायीवर वाघाने हल्ला करून तिचा फडशा पाडला. यामुळे येथील पशुपालकांसह सर्वसामान्य नागरिकांत चांगलीच भीती निर्माण झाली आहे.

या वाघाच्या हल्ल्याची आणि गावात दिसलेल्या त्याच्या पायांच्या ठशाची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे. त्यांच्याकडून पायाच्या ठशांबाबत संभ्रमावस्था असल्याचे सांगण्यात आले आहे. हे ठसे वाघाच्या पायाचे की बिबट्याच्या पायाचे, याचा शोध घेण्याचे काम वनविभागाकडून सुरू आहे.

२५ हजारांची गवळाऊ गाय ठार

वाघाचा शोध घेण्याची कार्यवाही सुरू असताना पुन्हा त्याने वानरकुंड परिसरात रानातून चरून येत असलेल्या गायींच्या कळपावर हल्ला चढविला. यात देविदास बावणे यांच्या मालकीची एक गाय ठार झाली. ही शिकार वाघाने केल्याची माहिती येथील गुराखी शालिक सिराम याने दिली. या शिकारीची माहिती वनविभागाला देण्यात आली. त्यामुळे क्षेत्र सहायक देहनकर व वनरक्षक भगत यांनी वाघाचा शोध घेतला. ही गाय गवळाऊ प्रजातीची असून तिची किंमत 25 हजार रुपये असल्याचे गायमालकाकडून सांगण्यात आले.

तीन दिवसांपासून गावात बस्तान

गत तीन दिवसांपासून गावात वाघाची दहशत असून वाघ गावात शिरल्याने अनेकांची भंबेरी उडाली आहे. यामुळे वनविभागाने गावातील निवासी वसाहतीत मुक्‍काम करून या वाघापासून गावकऱ्यांचे रक्षण करावे, अशी मागणी सरपंच करणाके, माजी सरपंच तेजू चारोडे, सदस्य नरेश घोडे, हरीश चारोडे, माजी सरपंच गोरे यांच्यासह गावकऱ्यांनी केली आहे.

जाणून घ्या : वर्धेच्या शिरपेचात मानाचा तुरा! मिळाला राष्ट्रीय पातळीचा हा पुरस्कार.. कारण वाचून वाटेल अभिमान...

वनविभागाने बंदोबस्ताकरिता गस्त वाढवावी

जिल्ह्यातील जंगलव्याप्त गावात वाघाने बस्तान मांडले आहे. त्यामुळे जंगलव्याप्त असलेल्या या गावात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गस्त वाढवून या वाघाला परिसरातून हाकलून गावकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. वनविभाग मात्र या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे.

(संपादन : दुलिराम रहांगडाले) वर्धा वर्धा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Villagers frightened by tiger entry