वाघीण मृत्यूप्रकरण : गावकरी धडकले वनकार्यालयात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

धाबा (जि. चंद्रपूर) : गोंडपिंपरी तालुक्‍यात जुना पोडसा इथे चार दिवसांपूर्वी मृतावस्थेत आढळलेल्या वाघिणीच्या प्रकरणात दहा शेतकऱ्यांची चौकशी वनविभागाने केली. चौकशीसाठी रात्री-बेरात्री शेतकऱ्यांना बोलाविले जात आहे. या प्रकाराने गावकरी संतापले आहेत. हे सर्व शेतकरी निर्दोष असल्याचे सांगत गावकऱ्यांनी आज, बुधवारी वनविभागाच्या कार्यालयावर धडक दिली. "त्यांना सोडा, अन्यथा आम्हालाही अटक करा', अशी मागणी गावकऱ्यांनी केली. त्यामुळे काहीकाळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

पोडसा येथे वाघिणीचा झालेला मृत्यू हा विषबाधेने झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शेजारीच रानडुक्कर मृतावस्थेत पडून होते. या रानडुकरावर विष टाकण्यात आले आणि ते मांस वाघिणीने खाल्ले असावे, असा संशय आहे. हे विष येथील शेतकऱ्यांनी टाकले असावे, या संशयावरून वनविभाग दहा शेतकऱ्यांना चौकशीसाठी रात्री-बेरात्री बोलवीत आहे. गुन्हा कबूल करण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. निर्दोष शेतकऱ्यांना छळणे बंद करा, या मागणीसाठी पोडसा येथील नागरिकांनी धाबा येथील वनविभागाच्या कार्यालयावर धडक दिली. त्यामुळे तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. गावकऱ्यांच्या मोर्चामुळे वनविभागाने कार्यालयातील बंदोबस्त वाढवला होता. प्रवेशद्वारही बंद करण्यात आले होते. या घटनेची माहिती मिळाल्यावर आमदार संजय धोटे यांनी धाबा येथे भेट देऊन वनविभागाच्या कारवाईला सहकार्य करण्याचे आवाहन केले. मात्र, तरीही गावकरी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. पोडसा ग्रामपंचायतीच्या सरपंच संगीता रायपुरे, उपसरपंच देवीदास सातपुते, सुरेंद्र रायपुरे, बाबूराव बोमकंटीवार, सुरेश येलमुले, निर्मला येलमुले, रूपा अलगमकार यांनी वनपरिक्षेत्राधिकारी राऊतकर यांना निवेदन दिले. दरम्यान, वाघिणीच्या मृत्यूचे प्रकरण वनविभागाच्या चांगलेच अंगलट आले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The villagers were pushed into the forest office