भामरागड : दिव्यांग मतदाराने नाल्यातून पोहून केले मतदान

अविनाश नारनवरे
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

- दोन्ही पायांनी दिव्यांग
- अनेकांनी केले कौतुक

भामरागड (जि. गडचिरोली)  : एकीकडे शहरी भागात सर्व सुविधा असतानाही अनेक नागरिक मतदानास जात नाही, तर दुसरीकडे भामरागडच्या अतिदुर्गम गावात कोणत्याही सुविधा नसताना दोन्ही पायांनी दिव्यांग असलेल्या एका मतदाराने वाटेत आलेल्या तुडुंब नाल्यातून पोहून येत मतदान करीत आपला घटनादत्त अधिकार बजावला. प्राजून लिंगू गावडे नामक या लोकशाहीप्रेमी व जिद्दी मतदाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रविवारी (ता. 20) मध्यरात्री आलेल्या मुसळधार पावसाने भामरागड तालुक्‍यातील अनेक गावांना नदी-नाल्यांनी वेढले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. नदी-नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आहे. मात्र, अशाही परिस्थितीत सोमवारी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मदतानात काही जिद्दी मतदार सहभागी झाले. अशाच एका जिद्दी मतदाराला सलामच ठोकावा लागेल. दोन्ही पायांनी दिव्यांग असताना चक्क नाला पोहत पार करून त्याने मतदान केंद्र गाठले व मतदानाचा हक्क बजावला आहे. भामरागड तालुक्‍यातील तुमरकोठी येथील प्राजून लिंगू गावडे असे या दिव्यांग मतदाराचे नाव आहे. प्राजून यांचे वय 43 वर्ष आहे. तरीही त्यांनी पाण्यातून पोहत येऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. महसूल प्रशासनाने त्यांना नाला पार करून देण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्यांनी कोणतीही मदत न घेता स्वतः नाला पार करून मतदानासाठी येणार असल्याचे ठामपणे सांगितले. महसूल विभागाने तालुक्‍यातील मरकनार, तुमरकोटी, मुरूमभुशी, कोरपर्शी, फुलनार, पोयरकोटी येथील मतदारांना डोंग्याच्या साहाय्याने तसेच हातात हात पकडून नाला पार करून मतदान केंद्रावर आणले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Voting by a swiming disabled voter