बापरे! पीक निंदणाची मजुरी तासाला ५० रुपये...कोरोनाच्या काळात पावसानेही मोडले शेतकऱ्यांचे कंबरडे

मनोज रायपुरे
Monday, 24 August 2020

सोयाबीन आणि कपाशीचे पीक बहरले असताच पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. गत पंधरवड्यापासून सतत पाऊस सुरू आहे. जमीन ओली असल्याने पिकात तणाचे प्रमाण वाढले आहे. शेतकऱ्यांना एका तासाची ५० रुपये मजुरी शेतमजुरांना द्यावी लागत आहे. पावसामुळे एकाच वेळी निंदणाचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे मजुरीचे दर वाढले आहेत.

वर्धा : गत पंधरवड्यापासून सतत पाऊस सुरू असल्याने पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात तणाची वाढ झाली आहे. तणनाशकाची फवारणी करूनही त्याचे निर्मूलन होत नसल्याने शेतकऱ्यांना मजुरांकडून तण काढून घ्यावे लागत आहे. मजुरीचे दर वाढल्याने शेतकऱ्यांनी एकरी दोन ते तीन हजार रुपये निंदणाचा खर्च येत आहे. काही शेतात पीक आणि तण सारखेच वाढले आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास उत्पादनात घट होणार असल्याचे शेतकरी बोलत आहेत.

यंदा सुरुवातीपासूनच समाधानकारक पाऊस पडला आहे. सोयाबीन, कपाशी आणि तूर आदी पिकांची वाढ जोमात झाली आहे. मध्यंतरी पावसाने खंड दिल्याने शेतकऱ्यांनी बैलजोडीच्या साहाय्याने आंतरमशागतींची कामे करून घेतली. त्यामुळे शेतकऱ्यांना निंदणाचा पहिल्या फेराचा तेवढा खर्च आला नाही. यानंतर शेतकऱ्यांनी पिकांना खताची दुसरी मात्रा दिली.

तासा तासाने वाढतेय मजुरी

सोयाबीन आणि कपाशीचे पीक बहरले असताच पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. गत पंधरवड्यापासून सतत पाऊस सुरू आहे. जमीन ओली असल्याने पिकात तणाचे प्रमाण वाढले आहे. सकाळी सात ते नऊ या दोन तासांचा मजुरीचा दर १०० रुपये आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना एका तासाची ५० रुपये मजुरी शेतमजुरांना द्यावी लागत आहे. सततच्या पावसामुळे कपाशीसह सोयाबीन पिकात तण वाढले आहे. सोयाबीनमध्ये गाजर गवत अधिक आहे. सोयाबीन फुलोरा आणि चलपावर आला आहे. पावसाने उसंत न दिल्यास सोयाबीनमध्ये आणखी गवत वाढणार आहे. त्यामुळे सोयाबीन सवंगणीच्या वेळी शेतकऱ्यांना त्रास होणार आहे.

लागवडखर्चसुद्धा निघाला नाही

पिकात तण वाढल्याने अनेक शेतकऱ्यांनी महागड्या तणनाशकाची फवारणी केली, परंतु सतत पाऊस सुरू असल्याने तणनाशकाचा उपयोग झाला नाही. त्यामुळे त्यांचा खर्च व्यर्थच गेला आहे. गत वर्षी कापूस विक्रीच्या वेळी शेतकऱ्यांची धूळदाण झाली आहे. शेतकऱ्यांना कवडीमोल भावानेच कापूस विक्री करावा लागला. अनेक शेतकऱ्यांचा लागवडखर्चसुद्धा निघाला नाही. कोरोनाचा काला आणि पावसाचे आगमनामुळे आता शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. परिणामी, शेतकऱ्यांना व्याजाने पैसे काढून शेतीची कामे करावी लागत आहेत.

हेही वाचा : विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंची कौतुकास्पद संकल्पना.. करणार हे अभिमानास्पद काम..  वाचा सविस्तर

गावातील मजुरांचाच आधार

दरवर्षी शेतकरी मजुरांची टंचाई भासल्यास बाहेरगावाहून अथवा शहराच्या ठिकाणाहून मजूर आणतात; परंतु यंदा कोरोनामुळे तेही शक्‍य नाही. जवळपासच्या गावातून मजूर बोलावतो म्हटले तर एका मजुरासाठी १०० रुपये प्रवासाचा खर्च आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना यंदा गावातील मजुरांचाच आधार घ्यावा लागतो आहे. पावसामुळे एकाच वेळी निंदणाचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे मजुरीचे दर वाढले आहेत. वाढत्या मजुरीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे.

आंतरमशागत ठप्प

पिकात बारीक तण असल्यास शेतकरी बैलाच्या साहाय्याने पिकात डवरणी करून मशागत करतात. यात तणाचा नायनाट होतो, पण सतत पाऊस सुरू असल्याने शेतात डवरणीसुद्धा चालत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना महिला मजुरांकडूनच तण काढून घ्यावे लागत आहे.

जाणून घ्या : ना प्लास्टिक ना दारू, अखेर करून दाखवलंच!  या गावानं प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर तयार केलं विकासाचं मॉडेल..

गाजरगवतामुळे त्वचा विकार

सोयाबीनच्या पिकात मोठ्या प्रमाणात गाजरगवत वाढले आहे. हे गवत मोठे झाल्याने मुळासकट काढण्यासाठी हाताने उपटून घ्यावे लागते. या गवतामुळे अंगाला खाज सुटत असून त्वचा विकार होत असल्याचे मजुरांनी सांगितले.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The wage for crop weeding is Rs. 50 per hour