Buldana : वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प प्रशासनाच्या दारात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Buldhana

Buldhana : वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प प्रशासनाच्या दारात

नांदुरा : वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पासाठी नवरात्र सण लाभदायी ठरला असून, विदर्भवासियांच्या मनामध्ये विकासाची अखंड ज्योत लावत हा प्रकल्प पुढे पुढे सरकत असल्याची जाणीव दसऱ्याच्या पूर्व संध्येला देऊन गेली. जल अभ्यासक डॉ. प्रवीण महाजन यांच्या मागणीनुसार सुरू झालेला, पश्चिम विदर्भातील जनतेला समृद्ध करणारा वैनगंगा - नळगंगा नदीजोड प्रकल्प आज पाणी उपलब्धता बाबतच्या सर्व अडचणी दूर करीत प्रशासकीय मान्यतेच्या दारापर्यंत पोहचला आहे.

पाच वर्षापूवी डीपीआर मंजूर होवूनही आज मान्यता मिळेल, उद्या मान्यता मिळेल या एका आशेवर वैनगंगा-नळगंगा नदीजोडनी अनेक अडचणीवर मात करीत, अनेक घडामोडीतून जात दसऱ्याच्या पूर्वसंध्येला मुखमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मेघा प्रकल्पाला हिरवी झेंडी देत. यातील पाणी उपलब्धता या नाजूक विषयाची विन विनत, हा प्रकल्प त्वरित पूर्ण करण्याच्या दृष्टीने जलसंपदा विभागाने या प्रकल्पातील सर्व अडसर दूर करीत पुढील कार्यवाहीस्तव मान्यता दिली आहे.

विदर्भातील जनता ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होती, तो क्षण म्हणजेच वैनगंगा - नळगंगा नदीजोड प्रकल्पासाठीच्या पाणी मान्यतेची. नवरात्रीच्या पावन पर्वावर पाणी उपलब्धता मान्य झाली असून, आता या प्रकल्पातील जवळपास सर्वच अडथळे दूर झालेले आहे.

मान्य केलेल्या प्रकल्प अहवालानुसार (डीपीआर) प्रशासकीय मान्यतेचा शिक्का लागल्यास नागपूर अधिवेशपूर्व ही घोषणा होवू शकेल अशी परिस्थिती सद्या तरी दिसत आहे.

पश्चिम विदर्भातील अनुशेष जरी या नदीजोड प्रकल्पातून पूर्ण भरून काढता आला नाही. तरी या प्रकल्पामुळे बराचसा अनुशेष भरून काढला जाईल. शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून ओळखला जाणारा हा भाग आणि लागलेला हा डाग, या प्रकल्पामुळे पुसून काढल्या जाईल. पश्चिम विदर्भातील नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला व बुलढाणा जिल्ह्यासाठी कामधेनू प्रकल्प म्हणून भविष्यात या प्रकल्पाची गणना झाल्याशिवाय राहणार नाही. हा प्रकल्प येत्या पाच-सहा वर्षात साकार झाल्यास प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष चार ते पाच लाख हेक्टर सिंचन, हजारो गावांना पिण्याचे पाण्याची व्यवस्था, पाच ते सात लाख तरुणांच्या हातांना काम, वीज निर्मिती, उद्योग धंद्याची निर्मिती अशाप्रकारे या जिल्ह्यांचा कायापालट होऊ शकतो. सोबतच आजूबाजूच्या सर्वच जिल्ह्यांना या प्रकल्पाचा अप्रत्यक्ष लाभ मिळणार आहे तो वेगळाच.