इथे गवसली वाकाटकांची राजमुद्रा; इतिहास अभ्यासकांसाठी पर्वणी

संदीप रायपूरे
Sunday, 9 August 2020

वाकाटक वंशातील शेवटचा राजा व्दितीय पृथ्वीषेण यांची राजमुद्रा गोजोली येथील उराडे परिवाराकडे सापडली. ही ऐतिहासिक राजमुद्रा सर्वांना बघता यावी यासाठी उराडे परिवाराने नागपूर मध्यवर्ती संग्रहालयाला दिली आहे. लवकरच ही राजमुद्रा नागपूर मध्यवर्ती संग्रहालयात ठेवली जाणार आहे.

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : विदर्भ राज्याला समृद्ध पौराणिक आणि ऐतिहासिक वारसा आहे. अनेक राजवंशांनी या प्रदेशावर राज्य केले आहे. त्यामुळे अनेक पुरातन वास्तू आणि वस्तू त्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देत आजही इथे दिमाखाने उभ्या आहेत. इथल्या नागरिकांनीही त्या पुरातन वस्तू अभिमानाने जपल्या आहेत.

वाकाटक वंशातील शेवटचा राजा व्दितीय पृथ्वीषेण यांची राजमुद्रा गोजोली येथील उराडे परिवाराकडे सापडली. ही ऐतिहासिक राजमुद्रा सर्वांना बघता यावी यासाठी उराडे परिवाराने नागपूर मध्यवर्ती संग्रहालयाला दिली आहे. लवकरच ही राजमुद्रा नागपूर मध्यवर्ती संग्रहालयात ठेवली जाणार आहे.

गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या गोजोली येथील प्रकाश उराडे यांनी राजमुद्रा जतन करून ठेवली होती. प्रकाश उराडे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा रंजित उराडे याने वडिलांची संदूक उघडली असता त्यात ही राजमुद्रा आढळून आली. या राजमुद्रेवर बोधीसत्व तारा यांचे चित्र अंकित असून ब्राह्मी लिपीतील चार ओळींचा लेख कोरलेला आहे.

राजमुद्रेचे वजन ६० ग्राम असून ती ७ से. मि.लांब ३ से. मि.रूंदीची आहे. रंजित उराडे याने ही राजमुद्रा इतिहास अभ्यासक निलेश झाडे यांना दाखविली. झाडे यांनी राजमुद्रेचा इतिहास समोर आणला. राजमुद्रा सापडल्याचे वृत्त माध्यमातून प्रकाशित झाले. नागपूरच्या संग्रहालयाच्या सहाय्यक संचालक जया वाहने यांनी भ्रमणध्वनीव्दारे उराडे परिवारांशी संपर्क साधला.त्यांना पत्र आले.

सविस्तर वाचा - भाजपच्या खासदाराने केली नियमांची ऐशीतैशी, नंतर काढावा लागला पळ, पण का?

इतिहासाच्या दृष्टीने ही राजमुद्रा फार अनमोल असल्याचे समजावून सांगितले. जया वाहने यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे उराडे परिवार संग्रहालयाला राजमुद्रा देण्यासाठी तयार झाला.संग्रहालयाची चमू शुक्रवारी गावात आली. उराडे परिवाराने हा अनमोल ठेवा त्यांच्या हवाली केला. आता राजमुद्रा नागपूरच्या संग्रहालयात ठेवली जाणार आहे. यावेळी संग्रहालयाचे सहाय्यक अभिरक्षक विनायक निटूरकर,ऐतिहासिक वारसा संवर्धन समितीचे अरूण झगडकर, इतिहास अभ्यासक निलेश झाडे, समीर निमगडे, सुरज माडूरवार,दीपक वांढरे उपस्थित होते.  

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wakatak Rajmudra found in Chandrapur district