चंद्रपूर - उद्योगांचे दूषित पाणी आणि शहरातील सांडपाणी प्रक्रिया न करताच थेट सोडले जात असल्याने चंद्रपूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या वर्धा आणि वैनगंगा नद्या प्रदूषित झाल्या आहेत. शहरालगतच्या इरई आणि झरपट या नद्यांचीही अशीच अवस्था आहे.
या नद्यांतील प्रदूषण कमी करण्यासाठी कृती आराखडे तयार करण्यात आले. मात्र, निधीची चणचण असल्याने कृती आराखडे कागदावरच राहिला. परिणामी आजही या नद्यांचा प्रदूषणाचा विळखा कायम आहे.
सन २०१० पासून देशात आणि राज्यात वायू, जल प्रदूषणासाठी चंद्रपूर शहर ओळखले जाते. विदर्भातील वर्धा आणि वैनगंगा या नद्या प्रदूषित श्रेणीत येतात. सन २०१९-२० च्या निर्देशांकानुसार वर्धा आणि वैनगंगा प्रायॉरिटी -तीनमध्ये येतात. चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा आणि वैनगंगा या प्रमुख नद्या आहेत.
शहरालगत वाहणाऱ्या इरई आणि झरपट या अतिशय प्रदूषित नद्या वर्धेच्या उपनद्या आहेत. वरोरा, भद्रावती, राजुरा, बल्लारपूर आणि चंद्रपूर शहरातील सर्व सांडपाणी आणि परिसरातील उद्योगांचे पाणी सरतेशेवटी वर्धा नदीला मिळते.
त्यामुळे जवळपास ४५ कि.मी.पर्यंत ही नदी पूर्णतः प्रदूषित झाली आहे. चंद्रपूर शहरात आजही पूर्णपणे सांडपाणी प्रक्रिया व्यवस्था नाही. वरोरा, भद्रावती, राजुरा आणि बल्लापुरात तर सांडपाणी प्रक्रिया संयंत्रच नाही.
तसेच वैनगंगा नदीजवळील भंडारा, पवनी, गडचिरोली आणि देसाईगंज शहरातसुद्धा हीच स्थिती आहे. बहुतेक उद्योगांचे पाणी सयंत्रे बंद असल्याने नियमबाह्यरीत्या नदी-नाल्यात सोडले जाते. पालिका प्रशासनाने सांडपाणी प्रक्रिया सयंत्र लावणे मागील पाच वर्षांपासून बंधनकारक आहे. एक लिटर प्रदूषित पाण्यासाठी पालिका आणि उद्योगांना दोन रुपये दंड आकारला जातो.
मात्र, अपवाद वगळता ही कारवाई झाली नाही. राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार सन २०१८ मध्ये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने देशातील प्रदूषित नद्यांची अग्रक्रमानुसार यादी घोषित केली. नदी पुनर्जीवित समिती घोषित केली.
जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि न्यायाधीश यांचे टास्क फोर्स तयार केले. त्यानंतर प्रदूषित नद्यांचे भाग्य उजळले नाही. प्रदूषण फक्त कागदावरच कमी झाले.
कृती आराखडा कागदावरच
सन २०१८-१९२० मध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाने वर्धा नदीतील पाण्याचे नमुने गोळा केले. त्यात जिल्ह्यातील राजुरा पुलाजवळ, विसापूर आणि दुर्गापूर येथील नमुने सर्वाधिक प्रदूषित असल्याचे आढळून आले. २०१९ च्या निर्देशांकानुसार वर्धा, वैनगंगा नदी अग्रकम-३ मध्ये समाविष्ट आहे. सन २०२० पर्यंत या नद्यांचे पाणी किमान आंघोळीसाठी वापरता येईल एवढे शुद्ध करायचे होते.
वर्धा- वैनगंगा नदी कृती आराखड्यासाठी जलसंधारण विभाग, महानगर पालिका, वनविभाग, कृषी विभाग आणि ग्रामीण विकास विभागाला जबाबदारी सोपविण्यात आली. मात्र, कोविडचे कारण पुढे आल्याने या आराखड्यांची अंमलबजावणी होऊ शकली नाही. निधीचा हेही प्रमुख कारण ठरले.
सांडपाणी प्रक्रियाच नाही
नदी-नाल्याच्या आणि भूजलाच्या प्रदूषणाला परिसरातील ३९ उद्योग, महानगरपालिका प्रामुख्याने कारणीभूत आहेत. उद्योगांकडून ५९४ दशलक्ष घन मीटर पाण्याची उचल केली जाते. उद्योगातील पाण्याचे शुद्धीकरण करून २९० द.ल.घ.मी.पाणी पुन्हा नदी सोडले जाते. चंद्रपूर महानगरपालिका इरई धरणातून ५५ (सीएमडी) पाणी वापरते.
चंद्रपूर महापालिका ३६, बल्लारपूर ८.४ तर राजुरा २.१ द.ल.घ.मी. एवढे पाणी नदीत सोडते. चंद्रपुरात ७५ द.ल.घ.मी. क्षमतेचे तीन सांडपाणी प्रकिया संयंत्र आहेत. त्यात केवळ ३६ टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया होते. अजूनही शहरातील भूमिगत गटार योजना कार्यान्वित झाली नाही. ते पाणी थेट नदीत जाते.
कृती आराखडे कागदावरच असतात. प्रदूषण कमी करण्यासाठी आवश्यक कायद्याची अंमलबजावणी होत नाही. उद्योगांवर बंधन नाही. त्यामुळे नद्या आणखी प्रदूषित होत आहे.
- प्रा. सुरेश चोपणे, अध्यक्ष, ग्रीन प्लॅनेट सोसायटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.