वर्धा : समुद्रपूर तालुक्‍यातील शेतात बहरणार जवस

बादल वानकर
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

- जवसाच्या पेऱ्यात वाढ
- लागवड ते प्रक्रियेला चालना
- तेलघाण्यांना नवसंजीवनीची शक्‍यता
- शेतकऱ्यांना पुरविण्यात आले जवस बियाणे

 

समुद्रपूर (जि. वर्धा) : विदर्भात उत्पादित होणाऱ्या तेलबीयांचे खाद्यात वेगळेच महत्त्व आहे. शिवाय जवस तेलाच्या गुणधर्माचे दाखले आयुर्वेदात अबाधित आहेत. मात्र, बदलत्या आधुनिक तेलधोरणाच्या पद्धतीत जवस पीक कायमच हद्दपार होण्याच्या स्थितीत आहे.

गावातल्या पारंपरिक तेलघाण्या बंद पडल्या आहेत. मात्र जुने ते सोने अशीच ख्याती असलेल्या जवसाच्या संवर्धनाला आणि प्रक्रियेला चालना देण्यात येत आहे. यावर्षी शेतकऱ्यांना पेरणीसाठी जवस बियाणे पुरविण्यात आल्याने समुद्रपूर तालुक्‍यातील गिरड भागातील शेकडो एकरमध्ये जवसाचे पीक बहरणार आहे.

जवस प्रात्यक्षिक कार्यशाळेच्या प्रसंगी नागपूरच्या कृषी महाविद्यालयाचे डॉ. जीवन कतोरे यांनी जवस लागवड, जवस पिकास लागणारे अन्नद्रव्य व्यवस्थापन, कीड रोग नियंत्रण, उत्पादन काढणी, प्रक्रिया आदी विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

गत दशकापर्यंत या भागात मोठ्या प्रमाणात जवस उत्पादित व्हायचे. मात्र, कालांतराने एकल पीक पद्धतीमुळे जवस नामशेष होण्याच्या मार्गावर होते. मागील पाच वर्षापासून जवस पीक पुनर्जीवित करण्याच्या अनुषंगाने तेल स्वराज्य अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत तेलबिया लागवड, मार्गदर्शन, तेलबिया प्रक्रिया आणि विक्री व्यवस्थापनाचे धडे शेतकऱ्यांना शिकविले जात आहेत.

महात्मा गांधींना अभिप्रेत असलेली ग्रामीण तेलघाणी पुनर्जीवित करीत गिरड येथील केंद्रात सुरू करण्यात आली आहे. या केंद्रात शेतकरी जवस प्रक्रिया करून घेत असल्याने शेतकऱ्यांच्या घरच्या आहारात स्वदेशी आणि भेसळमुक्त तेल सहज वापर सुरू झाला आहे. नैसर्गिक शेती विकास केंद्राच्या माध्यमातून स्वदेशी तेलाचा प्रचार प्रसारातून ग्राहकांना स्वदेशी तेलाचे महत्त्व पटवून दिले जात आहे.

येथील उत्पादित जवस तेलाला ग्राहकांची पसंती आहे. शिवाय आयुर्वेदिक महत्त्व जाणणारे जाणकार औषधी म्हणून वापर करीत आहेत, अशी माहिती तेल स्वराज अभियानचे समन्वयक सुरेश सेलोरे यांनी दिली. यावेळी अखिल भारतीय समन्वयीत तेलबिया संशोधन प्रकल्पातर्गत राबविण्यात येणाऱ्या जवस प्रात्यक्षिक कार्यक्रमाच्या अंमलबजावणी संदर्भात कृषी सहायक गोपाल कवडकर, कृषी सहायक रूपाली दामधर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

मगन संग्रहालय समितीच्या नैसर्गिक शेती विकास केंद्राचे प्रमुख गजानन गारघाटे यांनी तेल स्वराज अभियानातर्गत गत पाच वर्षांतील जवस बीजसंवर्धन व प्रक्रिया याविषयी माहिती दिली. यावेळी शेतकऱ्यांनी जवस उत्पादनाविषयी येणाऱ्या विविध समस्या आणि अडचणी चर्चेतून विचारपूस केली.

दहा गावातील 50 शेतकऱ्यांना प्रशिक्षण
मागील पाच वर्षापासून गिरड भागातील शेतकऱ्यांना जवस लागवडीसाठी मगन संग्रहालय समितीकडून प्रोत्साहन देण्यात येत आहे. मागील पाच वर्षांत शेकडो शेतकऱ्यांना जवसाच्या पेरणीसाठी बियाणे पुरविले आहेत. यामुळे जवसाच्या उत्पादन क्षेत्रात वाढ झाली आहे.

यावर्षी अखिल भारतीय समन्वयित तेलबिया संशोधन प्रकल्प आणि मगन संग्रहालयाच्या संयुक्त प्रयत्नातून 10 गावांतील पन्नास शेतकऱ्यांना जवसाचे प्रात्यक्षिक देण्यात आले. यात जवस बियाण्यांसह निविष्ठांचा वाटप करण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wardha: javas to grow in the fields of Samudrapur taluka