esakal | आधी गोदामे रिकामे करा, नंतरच धानखरेदी केंद्रांना मंजुरी द्या; शेतकऱ्यांची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

हलक्या धानाची मळणी सुरू झाली आहे. त्यानंतर आता भारी धानाचीही कापणी केली जाणार आहे. शासनस्तरावर धान खरेदी केंद्रांना मंजुरी देण्याच्या हालचालींना गती आली आहे. यंदाच्या खरीप हंगामात धान खरेदी केंद्राना मंजुरी मिळणार असली; तरी धानाच्या पोत्यांनी भरलेली गोदामे रिकामे करणे आवश्‍यक आहे. तेव्हाच रिकाम्या गोदामात धान साठवून ठेवणे सोयीचे जाणार आहे.

आधी गोदामे रिकामे करा, नंतरच धानखरेदी केंद्रांना मंजुरी द्या; शेतकऱ्यांची मागणी

sakal_logo
By
सहादेव बोरकर

सिहोरा (जि. भंडारा) : खरीप हंगामातील धान खरेदी केंद्रांना मंजुरी देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र, परिसरातील गोदाम अद्यापही रिकामे झाली नाहीत. त्यामुळे यंदा केंद्रांवर धानखरेदी प्रक्रिया प्रभावित होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. गेल्या वर्षात सिहोरा परिसरात धानाचे विक्रमी उत्पादन झाल्यानंतर खरेदीची प्रक्रिया केंद्र संचालकांमार्फत राबविण्यात आली होती.

गावात असणारे खासगी घर व ग्रामपंचायतीच्या ताब्यात असणारी सभामंडपे गोदाम म्हणून उपयोगात आणले जात होते. परंतु याचा फटका अनेक केंद्रांना बसला होता. नदीच्या काठावरील गावात पुराचे पाणी शिरल्याने धान ओलेचिंब झाले होते. यात अनेक शेतकऱ्यांचेसुद्धा नुकसान झाले आहे. अधिक नुकसान टाळण्यासाठी गोदामातील मालाची उचल केली होती. परंतु सुरक्षित असलेले गोदाम अद्यापही रिकामे केले नाही.

आधी गोदामे रिकामे व्हावी

खरीप हंगामातील हलक्‍या प्रतीच्या धानाची मळणी आता सुरू झाली आहे. दिवाळी समोर असल्याने शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. यामुळे शासनस्तरावर धान खरेदी केंद्रांना मंजुरी देण्याच्या हालचालींना गती आली आहे. परंतु, या भागातील सहकारी राइसमिलमधील गोदामातील 15 हजार पोत्यांची उचल करण्यात आली नाही. त्यामुळे गोंदेखारी गावातील नारायण पटले वेअर हाउसमधील 25 हजार पोती उचलली नाही. धानखरेदी केंद्राला मंजुरी देण्याआधी गोदाम रिकामे करण्यासाठी मिलचे उपाध्यक्ष सुभाष बोरकर आणि विनोद पटले यांनी पत्रव्यवहार सुरू केला आहे.

अवश्य वाचा : हवामान विभागाने दिला गंभीर इशारा; मंगळवारी विदर्भाला शेवटचा दणका बसण्याची दाट शक्यता

गोदामाअभावी खरेदीचा प्रश्‍न

धानखरेदी केंद्र सुरू झाल्यानंतर धानाची पोती सुरक्षित ठेवताना अडचणी येणार आहेत. यामुळे खरेदी प्रक्रिया वारंवार बंद करावी लागल्याने शेतकऱ्यांच्या रोषाला केंद्राच्या संचालकांना बळी पडावे लागते. गावातील खासगी घरांतही धानाची पोती ठेवलेली आहेत. परंतु, ते रिकामे करण्यात आले नाही. जिल्हा मार्केटिंग विभागाला या सर्व स्थितीची जाण आहे. परंतु, कुणीही गांभीर्याने घेत नाही. गोदामे फुल्ल असताना धानखरेदी केंद्र सुरू करण्याची घाई केल्यामुळे परिसरात दरवर्षी केंद्र संचालक व शेतकऱ्यांत भांडणे होतात. तेव्हा खरेदी केलेल्या मालाच्या सुरक्षेसाठी आधी उपाययोजना करण्याची गरज आहे.

जाणून घ्या : सेंद्रिय शेतीच्या प्रयोगातून फुलविली मोसंबीची बाग, दोन एकरात वर्षाला तीन लाख उत्पन्न

जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचा हलगर्जीपणा
सिहोरा केंद्राअंतर्गत सर्वाधिक पोती साठवणूक करण्यास गोदाम रिकामे केले नाही. यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचा हलगर्जीपणा दिसून येत आहे.
- सुभाष बोरकर
तालुकाध्यक्ष भाजप किसान आघाडी

गोदामे आता रिकामे करा
सिहोरा परिसरातील संपूर्ण गोदामे आधी रिकामे करावे. त्यानंतर केंद्रांना मंजुरी दिल्यावर संचालक व शेतकऱ्यांतील संघर्ष टाळता येईल.
- मोतीलाल ठवकर
जिल्हाध्यक्ष भारतीय किसान संघ

(संपादन : दुलिराम रहांगडाले) 

loading image