esakal | लाडक्‍या बाप्पांचे जल्लोषात स्वागत
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

लाडक्‍या बाप्पांचे जल्लोषात स्वागत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : ढोल ताशांचा गजर, फटाक्‍यांची आतषबाजी, गुलाल उधळत डोक्‍यावर बाप्पांची भगवी टोपी परिधान केलेले भाविक, सकाळीच पारंपरिक वेशभूषेत तयार झालेली बच्चे कंपनी असे चित्र सोमवारी (2) शहरात सर्वत्र दिसून आले. लाडक्‍या बाप्पांचे गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर जल्लोषात स्वागत करण्यात आले.
शहरातील नेहरू मैदान, राजापेठ, रुक्‍मिणीनगर, सायन्सकोर मैदान, पंचवटी चौक, फ्रेजरपुरा, कंवरनगर आदी भागांत गणेशमूर्ती खरेदीसाठी सकाळपासूनच भाविकांची गर्दी उसळली होती. बच्चे कंपनीनेसुद्धा आपल्या लाडक्‍या बाप्पाच्या स्वागतासाठी मोदकांची आरास केली होती. दुपारनंतर शहरातील प्रमुख सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुकांनी संपूर्ण शहर दणाणून गेले होते. ढोलताशे, लेझिम पथक, संदल, ढोल पथक तसेच जोडीला फटाक्‍यांची आतषबाजीने आसमंत निनादून गेला होता. सकाळपासूनच घरोघरी गणेश स्थापनेचा विधी सुरू झाला होता. दुपारपर्यंत बहुतांश घरगुती मूर्तींची स्थापना करण्यात आली होती. विशेष म्हणजे मागील तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने सोमवारी विश्रांती घेतल्याने उघाडीच्या वातावरणात गणरायाचे स्वागत झाले.

शोभायात्रा ठरल्या आकर्षण
शहरातील गेटच्या आतील नीळकंठ, आझाद हिंद मंडळ, राजापेठ स्पोर्टिंग क्‍लब, हमालपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या शोभायात्रा आकर्षणाचा विषय ठरल्या. ढोल ताशे, गुलालाची उधळण, लेझिम पथक आणि बाप्पांचा जागर असे चित्र शोभायात्रेत दिसून आले.

loading image
go to top