सावधान... समोर पिवळा झेंडा आहे! 

yellow flag
yellow flag

गडचिरोली : एरवी रस्त्यावरील दिवे, रेल्वे स्टेशन किंवा अनेक ठिकाणी धोका असल्याचे सुचविण्यासाठी लाल रंग वापरतात. पण, गडचिरोली जिल्ह्यातील जंगलात फिरताना तुम्हाला लाल नव्हे, तर पिवळ्या रंगाचा झेंडा दिसला तर धोका आहे, असे समजून लगेच तेथून काढता पाय घ्या. कारण जिथे वाघ, बिबट फिरत आहेत, अशाच ठिकाणी वनविभागाकडून पिवळ्या रंगाचा झेंडा लावण्यात येतो. वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षावर प्रभावी उपाय म्हणून देसाईगंजचे उपवनसंरक्षक निरंजन विवरेकर यांनी ही अनोखी शक्कल लढवली आहे. हा "सस्ते मे मस्त' उपाय निसर्ग संरक्षण क्षेत्रात कौतुकाचा विषय ठरत आहे. 

हिंस्त्र प्राण्यांसोबत होतो माणसांचा सामना

दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या, वाढते बांधकाम, शहरीकरण आणि आक्रसत चाललेली जंगले यामुळे वाघ, बिबट, अस्वलासह अनेक वन्यजीवांना जंगलात राहणे कठीण झाले आहे. शिवाय कधी सरपणासाठी, कधी वनोजप गोळा करण्यासाठी, कधी वनौषधींसाठी, तर कधी एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी ग्रामस्थांना जंगलातून जावे लागते. त्यामुळे माणसांचा अनेकदा जंगलातील वाघ, बिबट, अस्वलसारख्या हिंस्त्र प्राण्यांसोबत सामना होतो. एखाद्या प्रसंगी वाघ, बिबट माणसावर हल्ला करून त्याला ठारही करतात. त्यामुळे या वन्यजीवांबद्दल नागरिकांमध्ये रोष निर्माण होऊन माणसाला मारणाऱ्या वाघ, बिबट्यांच्या "शूट ऍट साइट'चे ऑर्डर निघतात. सध्या मानव-वन्यजीव संघर्ष विकोपाला जात असून तो थांबवायचा कसा, हा प्रश्‍न वनविभाग व वन्यजीव तज्ज्ञांना भेडसावत आहे. 

उपवनसंरक्षक विवरेकर यांनी शोधून काढला प्रभावी उपाय

यावर वनविभागाच्या देसाईगंज उपविभागाचे उपवनसंरक्षक निरंजन विवरेकर यांनी एक स्वस्त पण, प्रभावी उपाय शोधून काढला आहे. मागील काही वर्षांत त्यांच्या उपविभागात वाघ व बिबट्यांची संख्या वाढली. जंगलात जाणारी गाय, म्हशीसारखी जनावरे या प्राण्यांकडून नेहमी मारली जातात. पण, त्यासाठी शासन नुकसानभरपाई बऱ्यापैकी देत असल्याने ग्रामस्थ फार संतापत नाहीत. मात्र, जर चुकून माणसाला काही इजा झाल्यास या प्राण्यांनाही धोका पोहोचू शकतो. ही बाब हेरून उपवनसंरक्षक विवरेकर यांनी पिवळ्या रंगाचे काही झेंडे तयार केले. जिथे वाघ, बिबट्यांच्या पाऊलखुणा, त्यांची विष्ठा, केस, त्यांनी मारलेले जनावर दिसेल किंवा त्यांचेच दर्शन होईल त्या भागात हा पिवळा झेंडा दूरपर्यंत दिसेल अशा ठिकाणी लावण्यास सांगितला.

जंगलात धोक्‍याच्या ठिकाणी लावले पिवळे झेंडे 

त्याचवेळेस अशा संवेदनशील गावांमध्ये जनजागृती करून जंगलात जिथे पिवळा झेंडा दिसेल तिथे हमखास वाघ, बिबट, अस्वलासारखे प्राणी आहेत असे समजून अशा ठिकाणी जाण्याचे टाळावे किंवा सुरक्षात्मक उपायांचा अवलंब करावा, असे आवाहन केले. त्यामुळे आता ग्रामस्थ जंगलात गेले आणि असा झेंडा दिसला की, ते सावध होतात आणि त्या परिसरात फिरण्याचे टाळतात. या उपायामुळे येथे मानव-वन्यजीव संघर्ष बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे. या उपक्रमासाठी त्यांच्या उपविभागातील वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल शिंदे, सुनील सोनटक्‍के, डोंगरवार तसेच वनपाल नंदेश्‍वर, वनरक्षक सलीम सय्यद, गहाणे व संपूर्ण चमू प्रभावीपणे कार्य करीत आहेत. 


तसे वाघ, बिबट, अस्वल इत्यादी वन्यजीव असलेल्या ठिकाणी पिवळ्या रंगाचा झेंडा लावून ठेवणे ही किरकोळ बाब वाटते. पण, या एका उपायाने आम्ही अनेकांचे प्राण वाचविण्यात यशस्वी झालो आहेत. "गोष्ट छोटी पण, डोंगराएवढी' या म्हणीचा प्रत्यय या छोट्याशा उपायातून अनेकांना आला आहे. पण, आम्ही इथवरच थांबणार नाही, मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी आणखी असेच प्रभावी उपाय शोधत राहू. 
- निरंजन विवरेकर, उपवनसंरक्षक, देसाईगंज, जि. गडचिरोली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com