
घटनेला पाच दिवस उलटल्यानंतर या प्रकरणाला कलाटणी मिळाली.
मानोरा (जि.वाशीम) : तालुक्यातील गोंडेगाव येथील विशाल रमेश ससाने या युवकाची सोमवारी (ता.4) मध्यरात्री हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी मंगळवारी (ता.5) त्याचा मित्र रतन गोबरा राठोड याला अटक करण्यात आली होती. मात्र, या हत्येला कलाटणी मिळाल्याने प्रकरणातील फिर्यादी युवकाचा जन्मदाताच हत्यारा निघाल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. त्यामुळे पोलिसांनी रमेश उकंडा ससाने याला रविवारी (ता.10) अटक केली आहे.
यासंदर्भात पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, तालुक्यातील गोंडेगाव येथील युवक विशाल रमेश ससाने (वय38) या युवकाची डोक्यावर प्रहार करून हत्या करण्यात आली होती. मुलाला दारूचे व्यसन नडल्यामुळे दारूचे पैसे देण्यावरून त्याची हत्या मित्र रतन गोबरा राठोड याने केली असावी, असे फिर्यादीत मुलाचे वडील यांनी म्हटले होते.
अशा तक्रारीवरून मानोरा पोलिसांनी संशयीतास ताब्यात घेऊन दोन दिवसाची पोलिस कोठडी घेतली होती. मात्र, घटनेला पाच दिवस उलटल्यानंतर या प्रकरणाला कलाटणी मिळाली. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक शिशिर मानकर यांनी स्वःता आपल्याकडे घेतला होता. पोलिस तपासात फिर्यादी विशालचे वडील रमेश ससाने यांनी हत्या करून शेतात झोपायला निघून गेले होते. विशालला दारूचे व्यसन नडल्यामुळेच व शेतीच्या वादावरून हत्या केली असावी या दिशेने पोलिस तपास करीत आहेत.