गृहमंत्री महोदय, कर्तव्य बजावून सैनिक थकले तर कोरोनाविरुद्ध लढणार कसे?

washim
washim

वाशीम ः रात्री जेव्हा सारे शहर निद्रेच्या आधिन होते, त्यावेळेस ह्यांचा घरात प्रवेश होतो. साथ देण्यासाठी जीवनभर सोबत राहणारी ती त्यांच्यासाठी जेवन तयार करते. थकलेले शरीर आणि थीजलेले मन दोन घास पोटात घेतात. त्यानंतर तो केव्हा निद्राधीन होतो हे त्यालाच कळत नाही. पुन्हा एकदा पहाटे त्याची चिमुकले उठायच्या आत तो आपल्या कर्तव्यावर हजर होतो.

जेव्हा घरी पोहोचतो तेव्हाही चिल्या-पिल्यांची भेट नाही. आणि जेव्हा निघतो तेव्हाही नाही. जनतेचे रक्षण हेच त्याचे कर्तव्य बनते. पण हे कुठवर... गेल्या अडीच महिन्यांपासून ही त्याची परवड सारखी सुरू आहे. आता तेही मानवी शरीरच आहे. केव्हानाकेव्हा थकणारच.

यामध्येच आता जिल्ह्यातील एकाचा मृत्यू झाला. तर एक पोलिस निरीक्षक कर्तव्यावर असताना मुर्च्छीत झाले. गृहमंत्री महोदय आपण आमच्या जिल्ह्यात येत आहात. पोलिसाच्या संदर्भात, त्यांच्या समस्यांच्या संदर्भात आपला अभ्यास दांडगा आहे. तरीपण सुद्धा ही सर्व परिस्थिती पाहून आम्हाला एवढेच म्हणावेसे वाटते... गृहमंत्री महोदय आता पोलिस थकत चालले आहेत. थकलेला सैनिक लढाई कशी लढणार? हा आज सर्वसामान्य प्रश्‍न आहे. 

संपूर्ण जगात कोरोनाने हैदोस घातला असताना राज्यामध्येही दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ग्रीन झोनमध्ये असलेले जिल्हे रेडझोनमध्ये परावर्तीत होत आहेत. वाशीम जिल्ह्यात मात्र जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्या अचूक मार्गदर्शनात जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या काटेकोर नियोजनातून जिल्हा ग्रीनझोनमध्येच राहिला आहे. 15 ते 16 तास कधी रानावणांत, कधी रस्त्यावर अहोरात्र कर्तव्य बजावून जिल्हा पोलिस दलातील शिलेदारांनी कोरोनाला जिल्ह्याच्या सिमेवरच रोखले आहे. मात्र, जे आघाडीवरचे बिनीचे शिलेदार आहेत. त्या पोलिसांचे काय? असा प्रश्‍न आता निर्माण झाला आहे.

महिनाभरापूर्वी कोरोनाविरोधात कर्तव्य बजावत असताना वाशीम ग्रामीण पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस जमादार सुभाष बोरकर यांना अतिताणातून हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यूमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली होती. यानंतर आज (ता.27) वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय पाटकर हे कर्तव्यावर असताना अचानक मुर्च्छा येऊन पडले. या दोन्हीही घटना पोलिस दलावर वाढत असलेल्या अतिरिक्त ताणाचे उदाहरण आहेत. 

ना झोप; ना रजा!
जिल्हा पोलिस दलातील वरिष्ठ अधिकार्‍यांपासून शिपायांपर्यंत संपूर्ण पोलिस दल कोरोनाशी झुंज देत आहे. मात्र, दुसर्‍याचे प्राण जाऊ नये, या भावनेतून सुरू असलेली ही झुंज खाकीचे आरोग्य बिघडविण्यास कारणीभूत ठरत आहे. पोलिस दलातील कर्मचार्‍यांना गेल्या दोन महिन्यांपासून हक्काची साप्ताहिक रजाही घेता आली नाही. सतत कर्तव्य, त्यात कोरोनाची दहशत. परिणामी, पोलिसांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे. 50 वर्षांच्या वरील अनेक कर्मचार्‍यांना मधुमेह, रक्तदाब, हृदयविकाराचे आजार आहेत. या परिस्थितीत शारीरिक व मानसिक आराम मिळाला नाही तर, ही बाब धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. 

...तर लढणार कसे? 
गेल्या अडीच महिन्यांपासून जिल्हा पोलिस दल रस्त्यावर आहे. जिल्ह्याच्या सीमा राखण्याबरोबरच जिल्ह्यांतर्गत नागरिकांच्या अनाठायी उत्साहालाही आवरण्याचे काम त्यांना करावे लागत आहे. लॉकडाऊनच्या शिथील काळात खुद्द जिल्हा पोलिस अधीक्षकांनाच रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे. या कठीण काळात जे बिनीचे शिलेदार आहेत, तेच जर थकले तर भावी काळामध्ये प्रकोप वाढला तर कोरोनाशी मुकाबला कसा करावा? याचे उत्तर गृहमंत्र्यांकडून अपेक्षीत आहे. 

दारी आबाळ; घरात त्रयस्त!
सकाळी आठ वाजता कर्तव्यावर हजर होणार्‍या पोलिस शिपायाचा दिवस सकाळी पाचलाच सुरू होतो. दिवसभर कडक उन्हात लोकांना आवरात आवरता रात्रीचे नऊ वाजतात. घरी गेल्यानंतर घराबाहेर कपडे, बूट, मोजे काढून आंघोळ करूनच घरात प्रवेश करावा लागतो. तोपर्यंत दाराआड उभे राहून वडिलांची वाट पाहणारे चिमुकले डोळे झोपून जातात. दिवसभर आई व वडिलांचे कर्तव्य बजावणारी या शिलेदाराची गृहिनी चार घास त्याच्या पुढ्यात वाढते. कधीकधी दुरूनच जेवन घ्यावे लागते. ही कुचंबना सहन करत दुसरा दिवसही तसाच उगवतो. जे पती-पत्नी पोलिस दलात कर्तव्यावर आहेत त्यांच्या कुटुंबाचे हाल तर बघवत नाहीत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com