ही सूट नव्हे तर, कोरोनाचे उत्स्फूर्त स्वागत!, जिल्ह्याच्या डोक्यावर सामूहिक संसर्गाची टांगती तलवार

Washim Not this discount, but Corona's spontaneous welcome :
Washim Not this discount, but Corona's spontaneous welcome :

वाशीम : कोरोना महामारीमुळे गेल्या महिनाभरापासून सुरू असलेले लॉकडाऊन ग्रिनझोनचा निकष लागल्याने आज (ता.4) शिथील झाले. मात्र, या शिथिलतेचा फायदा नव्हे तर, गैरफायदा घेत संपूर्ण शहरच रस्त्यावर उतरले की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रत्येक दुकानासमोर सार्वजनिक दुराव्याच्या नियमाचा फज्जा उडवत नागरिक वावरत असल्याने आता जिल्ह्यात सामूहिक संसर्गाची लागण होते की काय? अशी गंभीर चित्र समोर येत आहे.

वाशीम जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत कोरोना बाधित रुग्णाची संख्या केवळ दोन नोंदविल्या गेली. त्यामुळे वाशीम जिल्ह्याचा समावेश ग्रीनझोनमध्ये करण्यात आला. जिल्हा प्रशासनाने ग्रीनझोनच्या निकषानुसार दुपारी दोन वाजेपर्यंत व्यापारी प्रतिष्ठाणे उघडण्यास परवानगी दिली. मात्र, सकाळी सात वाजतापासून शहरातील रस्ते नागरिकांच्या गर्दीने ओसंडून वाहण्यास सुरुवात झाली. कापड दुकाने, किराणा दुकाने व इतरही व्यापारी प्रतिष्ठाणांमध्ये प्रचंड गर्दी झाली. अनेकांनी तर मास्कचा नियमही तोडून टाकला. तर सामाजिक दुराव्याचा नियम कोठेच दिसला नाही. या प्रकारामुळे जिल्हा ग्रीनझोनमध्ये असला तरी, सामूहिक संसर्गाचा धोका जास्त असल्याने जिल्हा प्रशासनाने शेजारील जिल्ह्यांची परिस्थिती पाहता तसेच, परजिल्ह्यातून थेट वाशीम जिल्ह्यात येणार्‍या नागरिकांची संख्या पाहता याबाबींवर कडक निकष लावणे गरजेचे आहे.

अन जिल्हा पोलिस अधीक्षक अडकले
लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर परिस्थितीची पाहणी करण्याकरिता जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी येथील पाटणी चौकात आले. मात्र, चारचाकी व दुचाकी वाहनांची प्रचंड गर्दी झाल्याने त्यांनाही 20 मिनीटांपर्यंत या गर्दीत अडकून पडावे लागले. जिल्हा पोलिस अधीक्षकांना झालेली गंभीर परिस्थिती अनुभवल्याने याबाबत पोलिस दलाकडूनही जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार कडक उपाययोजना करण्याची गरज आहे.

हे तर कोरोनाला आवतन
जिल्ह्यामध्ये ता. 30 मे पर्यंत एकाच कोरोना रुग्णाची नोंद होती. मात्र, उत्तर प्रदेशातील ट्रक वाहकाचा मृत्यू होऊन त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ही संख्या दोनवर गेली आहे. ट्रक वाहकाचा पेट्रोलपंप व कुकसा फाट्यावर पोलिसांशी व आरोग्य कर्मचार्‍यांशी आलेला संपर्क पाहता खबरदारी घेण्याची गरज आहे. मात्र, ज्या पद्धतीने नागरिकांनी आपल्या बेजबाबदारपणाचे प्रदर्शन केले. दुकान चालकांनीही आपला व्यवसाय पाहिला. ही परिस्थिती चार दिवस अशीच राहिली तर, जिल्हा ग्रीनझोनमधून रेडझोनमध्ये जाण्यास वेळ लागणार नाही.

नियमांच्या पालनाकडे दुर्लक्ष
शिरपूर : येथे आज (ता.4) सकाळी दुकाने उघडताच नागरिकांनी खरेदीसाठी एकच गर्दी केली. तसेच गेल्या दीड महिन्यांपासून घरात असलेले नागरिक पुन्हा एकदा घराबाहेर पडले. मात्र, साहित्य खरेदी करताना बाजारपेठेत कोठेही शासन-प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन झाल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे ही बाब भविष्यासाठी गंभीर ठरू शकते.

परिस्थिती बिघडण्यास वेळ लागणार नाही
रिसोड: शहरात आज (ता.4) परवानगी दिलेली दुकाने, अस्थापना सुरू होताच नागरिकांनी एकच गर्दी केली. हे चित्र शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात देखील बघायला मिळाले. शहरासह ग्रामीण भागात प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन होताना दिसले नाही. हे असेच सुरू राहिले तर परिस्थिती बिघडण्यास वेळ लागणार नाही.

गर्दीमुळे पायदळ चालणेही कठीण
मालेगाव : शहरात आज (ता.4) दुकाने उघडण्यास सवलत दिली. मात्र, यावेळात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दिलेल्या सूचना, नियमांचे पालन होताना कोठेच दिसून आले नाही. बाजारपेठेत एवढी गर्दी झाली होती की, रस्त्याने चालणेही कठीण झाले होते. त्यामुळे हीबाब गंभीर आहे.

नियमांचे पालन करावे : डॉ. चव्हाण
मानोरा : शहरात आज (ता.4) जीवनावश्यक वस्तूंसह परवानगी दिलेली इतरही दुकाने उघडली. मात्र, ही दुकाने सुरू होताच नागरिकांनी बाजारपेठेत एकच गर्दी केली. शहरातील दिग्रस चौकात गर्दीमुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. हेच चित्र शहरासह ग्रामीण भागातही बघायला मिळाले. कोठेही प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन होताना दिसून आले नाही. त्यामुळे नागरिकांनी शासन-प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन तहसीलदार डॉ. सुनील चव्हाण यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com