हलबा युवकांचा जलसमाधीचा प्रयत्न, दहा ताब्यात

File photo
File photo

नागपूर : आरक्षणाचा अधिकार सरकारने हिरावून घेतल्याचा आरोप करीत हलबा समाजातील संतप्त युवकांनी रविवारी तांडापेठ येथील नाईक तलावात जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. सतर्क पोलिसांनी वेळीच दहा युवकांना ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला.
हलबा क्रांती सेनेतर्फे जल समाधी आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती. खबरदारीचा उपाय म्हणून पाचपावली पोलिसांनी परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवली होती. तलावाच्या प्रत्येक भागात पोलिस कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांसह आठ पट्टीचे पोहणारेही सज्ज होते. तलावाकडे जाणारे रस्ते बॅरिगेट्‌स लावून अडविण्यात आले होते. सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास हलबा समाजातील युवक अचानक घोषणा देत परिसरात दाखल झाले. त्यांच्यामागोमाग शेकडोंच्या संख्येने समजाबांधवही गोळा झाले. युवकांच्या मागोमाग समाजबांधव चालत असल्याने आंदोलनाला मोर्चाचे स्वरूप प्राप्त झाले. त्यांना अडविताच परिस्थिती चिघळली. "आरक्षण नाकारून सरकार आम्हाला रोज मारत आहे, आता शांततेने मरू देण्याचे आवाहन करीत युवकांनी तलावात उडी घेण्याचा प्रयत्न केला. सज्ज पोलिसांनी प्रसंगावधान राखत दहा जणांना ताब्यात घेतले. यावेळी आंदोलक आणि पोलिसांदरम्यान चांगलीच झोंबाझोंबी झाली. यानंतर समर्थकांनाही पोलिसांनी पिटाळून लावले.
हलबा क्रांती सेनेचे संस्थापक जगदिश खापेकर, उपाध्यक्ष कमलेश भगतकर यांच्या नेतृत्वातील या आंदोलनात दीपक उमरेडकर, अश्‍विन अंजिकर, दीपक उमरेडकर, प्रदीप पौणिकर, शुभम पौणिकर, संदीप चिचघरे, सचीन काटले, राज भुरडे, जितेंद्र वेडेकर, शिवशंकर रणदिवे, दुर्गेश हिंगणेकर, पंकेश निमजे, प्रमोद गडीकर आदींचा समावेश होता.

अपयशी सरकार नापास
निवडून येताच महिनाभरात हलबा समाजाचे प्रश्‍न सोडविण्याची ग्वाही सत्ताधाऱ्यांनी दिली होती. पण, सहा वर्षात त्यांना काहीच करता आले नाही. अपयशी सरकारचे हे नापास राज्य आहे. दहा वर्षे मजा मारणाऱ्या स्थानिक आमदाराने एकदाही समाजाचा प्रश्‍न सभागृहात मांडला नाही. येणाऱ्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशारा आंदोलकांनी दिला. सरकारी सेवेतील हलबा बांधवांना कमी केले जात आहे. एकाच्याही नोकरीवर गदा आली तरी हिंसक आंदोलनाची पुनरावृत्ती सरकार टाळू शकणार नाही, या शब्दात आंदोलकांनी थेट सरकारलाच दम दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com