नागपूरमध्ये 50 टक्के पाणीकपातीचे संकेत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

नागपूर - नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पेंच जलाशयाची स्थिती बघता 50 टक्के पाणीकपातीचे संकेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. नागपूर महापालिकेला या संकटाची वारंवार माहिती देत गळती रोखणे, विहिरी, बोअरवेल स्वच्छतेच्या सूचना दिल्या. परंतु, अशी कुठलीही तयारी नसल्याचे नमूद करीत त्यांनी महापालिकेचे कान टोचले. पेंच जलाशयात केवळ 21 टक्के पाणी असून, पुढील काही दिवसांत पाऊस न आल्यास नागपूर शहरात पाणीकपात करावी लागेल. महापालिकेने खासगी कंपनीला पाणी वितरणाचे काम दिले. मात्र, गळती रोखण्यात ही कंपनी अपयशी ठरली, असे बावनकुळे यांनी सांगितले.

"सकाळ'ने वर्तविले होते भाकित
पेंच जलाशयातील पाण्याच्या पातळीत घट झाली असून, शहरावर मोठे जलसंकट उभे राहण्याबाबत "सकाळ'ने 14 मार्च रोजी "शहरावर भीषण जलसंकट' असे वृत्त ठळकपणे प्रसिद्ध केले होते. या वृत्तांतून पाणीबचतीबाबत करावयाच्या उपाययोजनाही स्पष्ट केल्या होत्या.

Web Title: water shortage in nagpur