पाणीपुरवठा योजनांचा `गोलमाल'

सुधीर भारती
Saturday, 24 October 2020

पाणीपुरवठा योजना अधिकाऱ्यांना पैसे खाण्यासाठी टाकता का? असा गंभीर आरोप जिल्हापरिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांनी जलव्यवस्थापन समितीच्या सभेत केला.

अमरावती : बारा ते पंधरा वर्षांपासून सुरू असलेली पाणीपुरवठा योजनेची कामे अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. संपूर्ण जिल्ह्यात अशा प्रकारची स्थिती असून पाणीपुरवठा योजना अधिकाऱ्यांना पैसे खाण्यासाठी टाकता का? असा गंभीर आरोप जिल्हापरिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांनी जलव्यवस्थापन समितीच्या सभेत केला.

खुद्द जिल्हापरिषद अध्यक्षांनी अधिकाऱ्यांवर थेट आरोप केल्याने जिल्हापरिषद वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. अचलपूर तालुक्‍यातील बडेगाव येथील पाणीपुरवठा योजनेची कामे १२ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली. त्यावेळी पाण्याची टाकी बांधण्यात आली. मात्र, पाइपलाइनचा पत्ताच नाही. त्यामुळे आजही गावकऱ्यांना या योजनांचा लाभ मिळालेला नाही, असा मुद्दा अध्यक्षांनी सभेत मांडला. विशेष म्हणजे धामणगाव रेल्वे तालुक्‍यातील तळेगाव दशासर येथील पाणीपुरवठा योजनेची कामे सुद्धा २०१२ पासून सुरू आहे. ती कामे अद्यापही सुरूच असल्याचा मुद्दा अनिता मेश्राम यांनी उपस्थित केला. स्थानिक नागरिकांना अद्यापही जलयोजनाचा लाभ मिळाला नसल्याचा आरोप त्यांनी केला. याशिवाय अन्य सदस्यांनी सुद्धा सर्कलमधील पाणी पुरवठा योजनेची कामे १०-१० वर्षे रखडल्याचा आरोप केल्याने सभागृहात चांगलाच गदारोळ झाला.

वाचा - चौकीदारच निघाला `चोर'; मालकाचा परस्पर विकला प्लॉट

अधिकारी केवळ पैसे खाण्यासाठी योजना लांबवित आहेत काय असा? प्रश्‍न बबलू देशमुख यांनी उपस्थित केला. यावेळी सभापती प्रियंका दगडकर, बाळासाहेब हिंगणीकर, उपाध्यक्ष श्री. चव्हाण, सदस्य पार्वती काठोळे, अनिता मेश्राम उपस्थित होते. पाणीटंचाईच्या काळात धारणी तसेच चिखलदरा तालुक्‍यातील अनेक गावांना टॅंकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात आला. मात्र अद्यापही स्थानिक टॅंकरवाल्यांची देयके देण्यात आलेली नाहीत. टॅंकरच्या मुख्य कंत्राटदाराने २८ लाखांची उचल केली असून अद्यापही स्थानिक आदिवासी टॅंकर मालकांना पैसे देण्यात आले नाहीत, असा आरोप सभापती दयाराम काळे यांनी केला. त्यावर त्वरित चौकशी करण्याचे आदेश अध्यक्षांनी दिले.

संपादन - नरेश शेळके


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water supply project almost fail