Weather Update : विदर्भात अतिवृष्टीची शक्यता; आंतरराष्ट्रीय हवामान संकेतस्थळाने वर्तविला अंदाज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

weather update rain forecast heavy rain in Vidarbha

Weather Update : विदर्भात अतिवृष्टीची शक्यता; आंतरराष्ट्रीय हवामान संकेतस्थळाने वर्तविला अंदाज

नागपूर : बंगालच्या उपसागरात लवकरच तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्यामुळे येत्या मंगळवारपासून संपूर्ण विदर्भात अतिवृष्टीची दाट शक्यता आहे. तसा इशारा हवामानाविषयीचे भाकीत वर्तविणाऱ्या काही आंतरराष्ट्रीय संकेतस्थळांनी दिला आहे. प्राप्त माहितीनुसार, विंडी डॉट कॉमसह स्कायमेट व ॲक्युवेदर या आंतरराष्ट्रीय हवामान संकेतस्थळांनी येत्या ९ ते १३ जुलैदरम्यान नागपूरसह संपूर्ण विदर्भात अतिवृष्टीची शक्यता वर्तविली आहे. यासंदर्भात सोनेगाव येथील प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, त्यांनी याविषयी सध्या तरी निश्चितपणे सांगता येणार नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, आम्ही केवळ ‘मिडियम रेंज फोरकास्ट’ अर्थात पाच दिवसांचा अंदाज व्यक्त करीत असतो.

त्यामुळे पुढील पाच दिवसांत पाऊस येईल की नाही, एवढेच सांगू शकतो. सध्या आम्ही सात जुलैपर्यंत अंदाज व्यक्त केला आहे. त्यानंतर नेमकी काय स्थिती राहील, हे सध्यातरी सांगणे अवघड आहे. यासंदर्भात दोन ते तीन दिवसांनंतरच ठामपणे भाकीत वर्तविता येईल. मात्र बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याचे त्यांनी अवश्य सांगितले. अतिवृष्टीचा हा इशारा शेतकऱ्यांची निश्चितच डोकेदुखी ठरणार आहे. जुलै महिन्यात विक्रमी पाऊस पडल्याने बळीराजा तसाही चिंतीत आहे. काही दिवसांचा अपवाद वगळता जवळपास संपूर्ण महिनाभर वरुणराजा ‘जम के’ बरसला.

मागील तीन-चार दिवसांपासून उघडीप दिल्याने पीक परिस्थिती सुधारत चालली आहे. शिवाय डवरणी, निंदन, खुरपणीसह खोळंबलेल्या अन्य कामांनाही वेग आला आहे. जुलैतील पावसामुळे जमीनीत अजूनही पाणी साचलेले असून, शेतमालांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे अतिवृष्टीच्या निमित्ताने त्यांच्यासमोर आणखी एक अस्मानी संकट उभे ठाकणार आहे. अतिवृष्टीची दाट शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी सतर्क राहून, कामाचे नियोजन करणे आवश्यक आहे.

अतिवृष्टीचा नवा इशारा विदर्भातील शेतकऱ्यांसाठी निश्चितच धोक्याची घंटी आहे. जुलैमध्ये झालेल्या प्रचंड पावसामुळे आधीच शेतकरी हवालदिल झाला आहे. बहुसंख्य शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यातून पूर्णपणे सावरत नाही तोच हे नवे संकट उभे ठाकले आहे.

-अमिताभ पावडे, शेती अभ्यासक

Web Title: Weather Update Rain Forecast Heavy Rain In Vidarbha

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..