Weather Update : विदर्भात अतिवृष्टीचा धोका; इशारा कायम

गडचिरोली,भंडारा जिल्ह्यांसह विदर्भात अनेक ठिकाणी संततधार पाऊस सुरुच आहे. तर काही जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा कायम
weather update rain forecast nagpur red alert in bhandara gadchiroli vidarbha
weather update rain forecast nagpur red alert in bhandara gadchiroli vidarbhaesakal
Updated on

नागपुर : गडचिरोली,भंडारा जिल्ह्यांसह विदर्भात अनेक ठिकाणी संततधार पाऊस सुरुच आहे. तर काही जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा कायम आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शाळांना बुधवार सुट्टी जाहीर केली आहे. गडचिरोलीत अनेक रस्ते बंद असून बुलडाण्यात अतिवृष्टीमुळे ६ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.यवतमाळात गेल्या २४ तासांत पुरात वाहून आठ जणांचा मृत्यू झाला आहे. यंदाच्या वर्षी विदर्भात अपेक्षेपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. बहुतांश जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे.

नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे कळंब, पुसद, वणी, घाटंजी या तालुक्यांतील एकूण १३ गावांचा संपर्क तुटला आहे. अतिवृष्टीने २१४ घरांचे नुकसान झाले आहे. गेल्या २४ तासांत पुरात वाहून आठ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात यवतमाळ तालुक्यातील एक, बाभूळगाव दोन, पुसद एक व राळेगाव तालुक्यातील तीन व पुसद तालुक्यातील माळपठारावरील अडगाव येथील एका नागरिकाचा समावेश आहे. याशिवाय जिल्हाभरातील तब्बल १४ मार्ग बंद झालेले आहेत. बोरी अरब येथील अडाण नदीवर असलेल्या पुलावर पाणी असल्याने दोन दिवसांपासून दारव्हा-यवतमाळ मार्ग वाहतुकीसाठी बंद झालेला आहे. तर गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा संततधार पाऊस पडत असून पावसामुळे अनेक रस्ते बंद झाले आहेत. सिरोंचा- कालेश्वरम- वारंगल- हैदराबाद रस्ता,अहेरी- बेजुरपल्ली -परसेवाडा- लंकाचेन रस्ता बंद आहे. तसेज गडचिरोली- चामोर्शी मार्ग बंद असून शिवणी येथील पोटफोडी नदीचे पाणी पुलावरून वाहत आहे. गोंदियात सडक अर्जुनी तालुक्यातील राका-सौंदड मार्गावरील कोल्हापुरी बंध्याऱ्यावरून पाणी वाहत असून, या मार्गावरील संपूर्ण वाहतूक बंद करण्यात आली आहे. बंधाऱ्याशेजारी असलेली शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे मोठ्या नुकसानाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागणार आहे. जिल्हा प्रशासनाने १२ आॅगस्टपर्यंत रेड अलर्ट दिला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात वर्धा, इरई नदीचे दरवाजे उघडण्यात आल्याने नदी, नाले दुथडी भरून वाहत आहे. अनेक गावात आपत्ती व्यवस्थापनाची चमू दाखल झाली आहे. पुराच्या भीतीने नागरिक स्वतःहून सुरक्षितस्थळी जात आहे. सध्या बल्लारपूर-राजुरा मार्ग बंद आहे.बुलडाण्यात जुलै महिन्यात अनेक ठिकाणी झालेल्या अतिवृष्टी व पुराचा फटका हजारो शेतकरी व खरीप पिकांना बसला आहे. ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसानीचा अहवाल सादर करण्यात आला आहे. ५,८०२ हेक्टरवरील जिरायत पिकांचे नुकसान झाले असून १० हजार ६५२ शेतकऱ्यांना फटका बसला आहे.अकोल्यात पाटबंधारे प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवस चांगला पाऊस झाल्याने प्रकल्पातील जलसाठा वाढत आहे. त्यामुळे अकोला जिल्‍ह्यातील काटेपूर्णा, वाण, दगडपारवा आदी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. पावसाने शेतात साचलेल्या पाण्यामुळे खरिपाची पिके पिवळी पडू लागली आहेत.वर्धा जिल्ह्यात २६ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

गत तीन आठवड्याभरापूर्वी झालेल्या अतिवृष्टीतून सावरत नाही तोच ३६ तासापासून सुरू असलेल्या पावसाने जिल्ह्यातील २६ मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. तर नदीच्या पुराचे पाणी गावात शिरल्याने हिंगणघाट तालुक्यातील कोन्होली गावातील नागरिकांना सुरक्षीत स्थळी हलविण्यात आले.अमरावती जिल्ह्याला अतिवृष्टीचा जबर फटका बसला असून वरुड, तिवसा व नांदगाव खंडेश्वर तालुक्यास या अतिवृष्टीचा तडाखा सर्वांत जास्त बसला आहे.जिल्ह्यात सहा जणांचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. दुसरीकडे नांदगावखंडेश्वर तालुक्यातील बेंबळा नदीत वाहून गेलेल्या दोन व्यक्तींचा शोध व बचाव पथकाच्या मदतीने शोध सुरू आहे.

भंडारा जिल्ह्यात शाळांना सुट्टी, शेकडो गावांचा संपर्क तुटलेलाच

यवतमाळात गेल्या २४ तासांत आठ जणांचा पुरात वाहून मृत्यू

भंडाऱ्यात रेड अलर्ट

भंडारा जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट घोषित केल्याने जिल्ह्यात मुसळधार पावसासह अतिवृष्टी होण्याची शक्यता लक्षात घेता संभाव्य अपघात टाळण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय शाळा, अंगणवाडी, शिकवणी वर्ग यांना जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवार १०ऑगस्ट सुट्टी जाहीर केली आहे.

वेरूळा नदीत दोघे वाहून गेले

बाभूळगाव तालुक्यातील सावर व टाकळगाव या गावावरून वाहणाऱ्या वेरूळानदीला महापूर आला. पुराचा अंदाज न आल्याने दोघेजण वाहून गेल्याची घटना सोमवारी (ता.८) सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. सावर येथील घटनेत यवतमाळ पोलिस मुख्यालयात कार्यरत पोलिस कर्मचारी संतोष लक्ष्मण मेंडे (रा.सावर) तर दुसऱ्या घटनेत टाकळगाव येथील ६५ वर्षीय डोमाजी उकंडराव टेकाम या दोघांचा समावेश आहे. दोघांची शोध मोहीम सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com