ना बॅंड ना बाजा...पैदलही चले दुल्हेराजा...एका लग्नाची गोष्ट

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 4 July 2020

तेलंगणा राज्यातील वर आपल्या मोजक्‍याच नातेवाइकांसह लग्न सोहळ्याकरिता महाराष्ट्रात दाखल झाला. लग्न आटोपून नवरदेव आपली नववधू व सोबत आलेल्या नातेवाइकांसह पायीच वरात काढून निघाला. सोबत ना बॅंड होता ना बाजा..पैदलही चले दुल्हेराजा. अतिशय शांतपणे पण नव्या संसाराची स्वप्ने सजवत जमेल तसे नाचत, गात ही वरात तेलंगणाकडे निघाली.

अहेरी (जि. गडचिरोली) : भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात सध्या कोरोना या संसर्गजन्य रोगाने थैमान घातले आहे. या रोगाचा जास्त प्रादुर्भाव होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यात लॉकडाउन केला असल्याने याचा फटका लहान मोठ्या व्यापाऱ्यांसह नववधूवरांनाही बसताना दिसत आहे.

जवळच्या तेलंगणा राज्यातील एका युवकाचा विवाह महाराष्ट्रातील एका युवतीशी ठरला होता. वर आपल्या मोजक्‍याच नातेवाइकांसह लग्न सोहळ्याकरिता महाराष्ट्रात दाखल झाला. लग्न आटोपून नवरदेव आपली नववधू व सोबत आलेल्या नातेवाइकांसह पायीच वरात काढून निघाला. सोबत ना बॅंड होता ना बाजा. अतिशय शांतपणे पण नव्या संसाराची स्वप्ने सजवत जमेल तसे नाचत, गात ही वरात निघाली. जेव्हा या जोडप्याची वरात प्राणहिता नदीच्या पुलावर पोहोचली तेव्हा ती नागरिकांच्या कुतूहलाचा विषय ठरली.

वरात निघाली 30 किमी पायी

सायंकाळच्या वेळी नव्यानेच तयार झालेल्या या नदीच्या पुलावर तेलंगणा व महाराष्ट्रातील लोकांची चिक्‍कार गर्दी असते. हे नवीन जोडपे नाचत, गात मोठ्या आनंदाने जात असल्याचे बघून सर्वांना आनंदाचा धक्काच बसला. विशेष म्हणजे ही नववर-वधूची वरात तब्बल 30 किलोमीटर पायी जाण्यासाठी निघाली होती; तरीसुद्धा लग्न झाल्याचा एक वेगळाच आनंद या नवपरिणीत जोडप्याच्या चेहऱ्यावर दिसत होता.

वाट तरी किती बघायची?

या नवविवाहित जोडप्याशी चर्चा केली असता वराने सांगितले की, आमचे लग्न फेब्रुवारी महिन्यात ठरले होते. पण अचानक मार्च महिन्यात लॉकडाउन सुरू झाल्याने आम्ही दोन महिने वाट बघितली. पण लॉकडाउन पे लॉकडाउन सुरूच होते. त्यामुळे आता वाट तरी किती बघायची, असा प्रश्‍न मनात येत होता. म्हणून शासनाच्या नियमांचे पालन करीत लग्न आटोपायचे असा दोन्हीकडील मंडळींनी निर्णय घेतला.

जाणून घ्या : मोठी बातमी : पोलिस-नक्षल चकमकीत एक नक्षली ठार

पाच महिन्यांनी आलो एकत्र

आमचा विवाह सोहळा मोजक्‍या नातेवाइकांमध्ये आनंदात संपन्न झाला. तीस किलोमीटर पायी चालण्यासाठी जरी थोडा त्रास होत असेल तरीही याचा आम्हा सर्वांना आनंदच आहे. कारण तब्बल चार ते पाच महिन्यांनी आम्ही दोघे एकत्र आलोत, असेही ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The wedding ceremony started on foot from the river Pranhita