esakal | पहा कोरोनामुळे लग्नाळूंची कशी झाली फसगत; पुढील वर्षीच निघणार मुहूर्त
sakal

बोलून बातमी शोधा

marriage nandura.jpg

दळणवळण बंद झाल्याने पाहुण्यांची वर्दळ थांबली आहे. मुलगी पाहण्याचेच काय तर लग्न जुडण्याच्या कार्यालाही ब्रेक मिळाला आहे.

पहा कोरोनामुळे लग्नाळूंची कशी झाली फसगत; पुढील वर्षीच निघणार मुहूर्त

sakal_logo
By
विरेंद्रसिंह राजपूत

नांदुरा (जि.बुलडाणा) : सद्या कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे संपूर्ण देशात लॉकडाउन व संचारबंदी असल्याने अनेक भावी नवरदेवांच्या लग्नावर संक्रात आली आहे. काहींच्या लग्नाच्या तारखा पुढे ढकलल्या जात आहेत तर काही शॉर्टकटमध्ये लग्न उरकवतांना दिसत असून, इच्छुक वरांचे मात्र लॉकडाऊनमुळे संबंध जुडण्यास अडचणी येत असल्याने वधू-वर पक्षाची चांगलीच पंचाईत झाल्याचे दिसत आहे. तसेच नवरदेवांना पुढच्या वर्षीचीच प्रतीक्षा कायम राहणार आहे.

सध्या कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर सर्व लॉकडाऊन झाले असून, दळणवळण बंद झाल्याने पाहुण्यांची वर्दळ थांबली आहे. मुलगी पाहण्याचेच काय तर लग्न जुडण्याच्या कार्यालाही ब्रेक मिळाला आहे. ज्यांची लग्नाची तारीख पक्की झाली, त्यांनाही या काळात लग्नावर बंदी आल्याने लग्न पुढे ढकलले आहे. असे असताना काहींनी यातून मार्ग काढत रजिस्टर लग्नाला पसंती दिली आहे. 

मात्र, खरी पंचाईत झाली ती भावी लग्नालायक तरुणांची, कारण त्यांना मुलगी पाहायलाही जाता येणार नसल्याने नवीन होण्याऱ्या संबंधावर खरे सावट पसरले आहे. अगोदरच मुलीचे प्रमाण कमी झाल्याने अनेकांच्या लग्नांना बाधा पोहोचली आहे. त्यातच कोरोना रोगाच्या संक्रमनाचे सावट आल्याने ‘दुष्काळात तेरावा महिना’ म्हणण्याची पाळी या भावी नवरदेवांवर आली. काहीही असो परंतु ऐन लग्नसराईत कोरोनाने संपूर्ण लग्नसराईच अडचणीत टाकली हे सद्याच्या परिस्थितीवरून तरी नक्कीच दिसून येत आहे.

पुण्या-मुंबईचा नवरा नको गं बाई
गेल्या काही वर्षांपासून शेतकरी नवरा नको विदेशातील, पुण्या-मुंबईचा नवरा हवा असे काहीसे लोण ग्रामीण भागातील मुलीपर्यंत पोहोचले होते. कंपनीत काम करून दोन वेळेसची भाकर मिळाली तरी चालेल, परंतु गावाकडील शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी देण्यास कुणीही धजावत नव्हते. परंतु आज कोरोनाच्या संक्रमणाने परिस्थिती एकदम बदलते की, काय अशी अवस्था झाली आहे. या रोगाच्या संक्रमणाच्या भीतीने घरचेही मंडळी पुण्या-मुंबईच्या युवकांना घरात घेण्यास मागेपुढे पाहत असल्याने भावी काळात असा विदेशी पुण्या-मुंबईचा नवरा नको असे काहीशे चित्र सद्याच्या काळात तरी नक्कीच निर्माण झाले आहे.