काय? माजी कुलसचिवांकडून होणार 22 लाखांची वसुली 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. पुरणचंद्र मेश्राम यांना प्राध्यापक पदाचे वेतन विद्यापीठाने दिले. मात्र, त्याला सहसंचालकांनी अमान्य करीत 22 लाखांची वसुली काढली होती. आता ही रक्कम लवकरच विद्यापीठाकडून वसूल करण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. पुरणचंद्र मेश्राम यांना प्राध्यापक पदाचे वेतन विद्यापीठाने दिले. मात्र, त्याला सहसंचालकांनी अमान्य करीत 22 लाखांची वसुली काढली होती. आता ही रक्कम लवकरच विद्यापीठाकडून वसूल करण्यात येणार असल्याची माहिती आहे. 
डॉ. पुरणचंद्र मेश्राम 2009 साली विद्यापीठात वित्त अधिकारी असताना प्राध्यापक पदाची वेतनश्रेणी मिळावी अशी मागणी केली होती. मात्र, विद्यापीठाने ती अमान्य केली. या प्रकरणात उच्च न्यायालयाने त्यांच्या बाजूने निर्णय दिला. मात्र, विद्यापीठाने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केली. यानंतर डॉ. मेश्राम कुलसचिव झाल्यावर त्यांच्या वेतन निश्‍चितीचा प्रस्ताव सहसंचालक कार्यालयात गेला. यावर तत्कालीन सहसंचालक डॉ. अंजली रहाटगावकर यांनी आक्षेप घेत त्यांना प्राध्यापक पदाची वेतनश्रेणी देता येणे शक्‍य नसल्याचे स्पष्ट केले. 
याविरोधात डॉ. मेश्राम यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, विद्यापीठाने त्यांना सर्वसाधारण निधीतून प्राध्यापक पदाच्या वेतनश्रेणीनुसार पगार सुरूच ठेवला. यादरम्यान सर्वोच्च न्यायालयात डॉ. पुरण मेश्राम यांच्या हाती निराशा आली. त्यानंतर दीड वर्षाआधी डॉ. मेश्राम हे विद्यापीठातून निवृत्त झाले. मात्र, कधीही प्राध्यापक म्हणून कार्यरत नसणाऱ्या अधिकाऱ्याला प्राध्यापक पदाची वेतनवाढ दिल्याने सहसंचालक डॉ. अर्चना नेरकर यांनी 22 लाखांच्या वसुलीचे पत्र विद्यापीठाला आठ महिन्यांआधी पाठविले होते. त्यामुळे येत्या काळात विद्यापीठ मेश्राम यांच्या निवृत्तीनंतर मिळणाऱ्या लाभातून 22 लाखांची थकबाकी करणार असल्याची माहिती आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What? 22 lakh to be recovered from former registrar