गोंदियातील स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेला नागरिकांचा हरताळ !

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

शहराला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी पालिका सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. याच आशेने महत्वाकांक्षी असलेली स्वच्छ सर्वेक्षण 2020 मोहिम हाती घेण्यात आली. मात्र, या मोहिमेला नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. परिणामी, स्वच्छता व जनजागृतीसाठी महत्वाकांक्षी असलेली मोहिम नागरिकांच्या अभिप्रायाच्या अडथळ्यात अडकल्याचे चित्र आहे. त्यामुळे, शहर स्वच्छतेचा प्रश्‍न सुटता सुटेना अशी स्थिती आहे.

गोंदिया : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला स्वच्छतेचा मंत्र दिला आणि देशाभरातील गावागावात स्वच्छता अभियान राबविणे सुरू झाले. शासकीय यंत्रणा आणि काही स्वयंसेवी संस्थाही यामध्ये हिरिरीने सहभागी झाल्या. नागरिकांमध्ये जनजागृतीची मोहिम राबविण्यात आली. गोंदिया शहरही याला अपवाद नाही.

शहराला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी पालिका सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. याच आशेने महत्वाकांक्षी असलेली स्वच्छ सर्वेक्षण 2020 मोहिम हाती घेण्यात आली. मात्र, या मोहिमेला नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. परिणामी, स्वच्छता व जनजागृतीसाठी महत्वाकांक्षी असलेली मोहिम नागरिकांच्या अभिप्रायाच्या अडथळ्यात अडकल्याचे चित्र आहे. त्यामुळे, शहर स्वच्छतेचा प्रश्‍न सुटता सुटेना अशी स्थिती आहे.

केंद्र शासन देशात स्वच्छता मोहिम राबवित आहे. त्यावरील नागरिकांच्या अभिप्रायासाठी स्वच्छ सर्वेक्षण-2020 अंतर्गत "स्वच्छता ऍप' तयार करण्यात आले आहे. त्यामुळे, स्वच्छता मोहिमेत लोकसहभाग वाढल्याचे बोलले जाते. स्वच्छ सर्वेक्षणात नागरिकांनी सुद्धा जबाबदारी घ्यावी. या आशेने पालिकेने स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सहभाग घेतला. शहरातील मुख्य मार्ग, चौकांत बॅनर, होर्डिंग, पत्रके वाटून जनजागृतीला सुरुवात केली. परंतु, शहर स्वच्छतेचा विचार केल्यास शहरातील अंतर्गत गटार व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे दिसते आहे.

शहरातील 42 वॉर्डातील अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे, तुटलेल्या नाल्यांची स्थिती दशकापासून जैसे-थे आहे. परिसरात गटार व दुर्गंधी कायम असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. परिणामी, दुर्गंधी व डासांच्या उद्रेकामुळे नागरिक हैराण झाले आहेत. असे, असताना याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. यात अनेक भागात रस्ते, नाल्यांची कामे करण्यात आली असली तरी, बहुतांश भागातील जुन्या समस्यांकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. यामुळे अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

शहरातील मरारटोली, वसंतनगर, रामनगर, विजयनगर, लक्ष्मीनगर, सूर्याटोला, टिबीटोली, रेलटोली, सिंगलटोली, सावराटोली, कुंभारटोली या सारख्या अनेक भागात सांडपाणी साचून मोठे गटारच निर्माण झाले आहे. परिणामी, रस्त्याने ये-जा करताना नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अशी स्थिती आजघडीला अनेक भागात दिसून येते. सद्यःस्थितीत पावसाळा सुरू असून, रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेले खड्डे स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेला अडथळा ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, पालिका प्रशासनाकडून स्वच्छता अभियान राबविण्यात आले; पण गटाराकडे लक्ष देण्यात आले नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देत नाल्यांची निर्मिती करून सांडपाणी वाहते करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

सविस्तर वाचा - इस चम्पी मे बडे बडे गुन

पालिकेची वाढली डोकेदुखी
स्वच्छ र्स्वेक्षणासाठी सकारात्मक प्रतिसाद वाढविण्यासाठी पालिकांमधील विविध विभागातील कर्मचाऱ्यांना उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामुळे, मागील काही महिन्यांपासून स्वच्छ सर्वेक्षणासाठी धावाधाव सुरू असल्याचे दिसून येते. मात्र, स्वच्छ सर्वेक्षण-2020 मधील सिटीझन फिडबॅक (नागरिकांचा अभिप्राय) या घटकांतर्गत मोहिमेला नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याने पालिकेसाठी डोकेदुखी ठरत आहे.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What about Swachha Bharat mission in Gondia?