काय आहे पितृ पंधरवड्याचे महत्त्व? श्राद्धपक्ष म्हणजे नेमके काय? घ्या जाणून

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 17 September 2020

प्राचीन काळात आश्विन शुक्ल प्रतिपदेला नवीन वर्ष सुरू होत असे. त्यामुळे सरत्या वर्षाचे शेवटचे पंधरा दिवस दिवंगत पूर्वजांच्या स्मरणासाठी राखून ठेवले जात असत. सातवाहन राजांनी शालिवाहन शक सुरू केले. ते चैत्र शुक्ल प्रतिपदेला सुरू होते. त्यामुळे हिंदू नववर्ष चैत्र पाडव्याला सुरू केले जाते, मात्र महालय काळ बदलला गेला नाही. तो भाद्रपदाचा दुसरा आठवडाच राहिला. ती प्रथा शतकानुशतके जोपासली गेली आहे.
 

उद्या पितृमोक्ष अमावस्या. म्हणजे पितृ पंधरवड्याचा शेवटचा दिवस. एरवी भाद्रपद अमावस्येनंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे अश्विन शुद्ध प्रतिपदेला देवीचे नवरात्र बसते. घटस्थापना होते. यंदा मात्र नवरात्र एक महिना लांबले आहे. कारण अधिक महिना आहे. दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक महिन्यामागे तिथींची गणित आहेत.

आज आपण जाणून घेऊया पितृ पंधरवड्याबद्दल. आणि या काळात केल्या जाणाऱ्या पितरांच्या श्राद्धाबद्दल. भाद्रपद महिन्याचा कृष्णपक्ष म्हणजे प्रतिपदा ते अमावास्या हा काळ. हिंदू धर्म-परंपरेत पितृ पंधरवडा म्हणून ओळखला जातो.

पितृपक्ष म्हणजे पूर्वज- पितर या काळात पितृलोकातून पृथ्वीवर येतात असा समज आहे. म्हणून त्यांची पूजा त्या दिवसांत केली जाते, म्हणूनच तो काल शुभ मानला जात नाही. त्या काळात सर्वसामान्यपणे शुभकार्य करीत नाहीत; त्याविषयी बोलणी करीत नाहीत आणि मोठी खरेदीही करीत नाहीत. मध्य प्रदेश आदी हिंदी भाषी प्रदेशांत पौर्णिमान्त महिने पाळले जातात. तो तेथील आश्विन महिन्यातील पहिला पंधररवडा असतो.

प्राचीन काळात आश्विन शुक्ल प्रतिपदेला नवीन वर्ष सुरू होत असे. त्यामुळे सरत्या वर्षाचे शेवटचे पंधरा दिवस दिवंगत पूर्वजांच्या स्मरणासाठी राखून ठेवले जात असत. सातवाहन राजांनी शालिवाहन शक सुरू केले. ते चैत्र शुक्ल प्रतिपदेला सुरू होते. त्यामुळे हिंदू नववर्ष चैत्र पाडव्याला सुरू केले जाते, मात्र महालय काळ बदलला गेला नाही. तो भाद्रपदाचा दुसरा आठवडाच राहिला. ती प्रथा शतकानुशतके जोपासली गेली आहे.

हिंदू माणूस त्याच्या नातेवाईकाचे श्राद्ध नातेवाईकाचा मृत्यू ज्या तिथीस झाला असेल, पितृपक्षातील त्याच तिथीस करतो. श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केले जाणारे दिवंगत व्यक्तींचे स्मरण. त्या निमित्ताने दिवंगत पूर्वजांचे स्मरण केले जाते. श्राद्धविधीत अन्य गोत्रातील ज्ञात-अज्ञात अशा सर्वांचे पिंडरूपाने पूजन केले जाते. त्या पंधरवड्यात यमलोकातून पितर (मृत पूर्वज) कुटुंबीयांच्या घरी वास्तव्यासाठी येतात अशी समजूत आहे. म्हणून, तो पक्ष (पंधरवडा) तशा पितृकार्याला योग्य समजला जातो.

जसे गणपती, गौरी यानिमित्ताने सर्व घर एकत्र येते त्याचप्रमाणे श्राद्धविधीच्या निमित्ताने सर्व कुटुंबीय एकत्र येतात. त्यांच्या कुटुंबातील दिवंगत व्यक्तींच्या एकत्र स्मरणाने वंशवृक्ष समजतो. त्यानिमित्ताने कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांची माहिती होते. त्यांनी केलेली विशेष कामे, समाज व कुटुंब यांसाठीचे त्यांचे योगदान याबद्दल माहिती संबंधितांना मिळते. त्यांच्या अभिमानास्पद कामगिरीने उर्वरितांचा आत्मविश्वास वाढतो व पूर्वजांनी केलेल्या चांगल्या कामातून प्रेरणा मिळत राहते.

सोन्याची खरेदी, घराची खरेदी या गोष्टी करणे पितृपक्षात टाळले जाते. खरे म्हणजे, दिवंगत पूर्वज त्या काळात पृथ्वीलोकात येऊन सर्व गोष्टींचे अवलोकन करत असतील तर चालू कार्याला त्यांचे आशीर्वाद लाभले आहेत असा विचार का करू नये? माणसाचे अस्तित्व ज्यांच्यामुळे निर्माण झाले आहे त्या पूर्वजांचे आशीर्वाद त्यांच्या वंशजांसाठी असावेत असा सकारात्मक विचार केला जायला हवा.

 

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What is a pitru Pandharvada?