काय? राजकीय चर्चेचा स्तर घसरण्यासाठी जनता दोषी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

नागपूर : माध्यमांमधून होणाऱ्या राजकीय चर्चांचा स्तर घसरला आहे. मनोरंजन म्हणून का होईना, पण त्याचा आनंद घेणारी जनताच या परिस्थितीसाठी दोषी असल्याचा सूर प्रमुख राजकीय पक्ष प्रवक्‍त्यांच्या चर्चेत उमटला. माध्यमांवरील चर्चा पूर्णत: "बिझनेस गेम' असल्याचा दावासुद्धा प्रवक्‍त्यांनी केला. 

नागपूर : माध्यमांमधून होणाऱ्या राजकीय चर्चांचा स्तर घसरला आहे. मनोरंजन म्हणून का होईना, पण त्याचा आनंद घेणारी जनताच या परिस्थितीसाठी दोषी असल्याचा सूर प्रमुख राजकीय पक्ष प्रवक्‍त्यांच्या चर्चेत उमटला. माध्यमांवरील चर्चा पूर्णत: "बिझनेस गेम' असल्याचा दावासुद्धा प्रवक्‍त्यांनी केला. 
रविवारी सायंटिफिक सभागृहात "राजकीय चर्चेचा स्तर' विषयावर आयोजित चर्चात्मक कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्‍त्या मीनाक्षी लेखी, कॉंग्रेसचे प्रवक्‍ते गौरव वल्लभ, शिवसेनेच्या प्रवक्‍त्या प्रियांका चतुर्वेदी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महेश तपासे सहभागी झाले होते. ज्येष्ठ पत्रकार प्रकाश दुबे व्यासपीठावर होते. एरवी एकमेकांवर थेट टीका करताना दिसणारे प्रवक्‍ते कार्यक्रमात शांतपणे विचार मांडताना दिसले. चर्चेत वैचारिक विरोध असला तरी वैयक्तिक विरोध कधीच करीत नसल्याचे ते म्हणाले. टीव्हीवरील चर्चा निरर्थक किंवा खालच्या पातळीवर जात असेल तर चॅनल बदलण्याचा सल्ला सर्वांनीच दिला. सोबतच चुकीचे बोलून जाणाऱ्या नेत्यांची बाजू प्रवक्‍त्यांना उचलून धरावी लागत असल्याचेही त्यांनी मान्य केले. 
गौरव वल्लभ यांनी कुठेही चर्चाच होत नसल्याचे मत व्यक्त केले. प्रश्‍न उपस्थित करणे विरोधकांचा अधिकार आहे. मात्र, प्रश्‍न उपस्थित करणाऱ्यांना राष्ट्रद्रोही ठरविले जात आहे. प्रश्‍नांपासून पळू नका असा खोचक सल्ला त्यांनी सत्ताधारी पक्षांचे नाव न घेता दिला. नागपूर ही देशाची वैचारिक राजधानी असून, अशाप्रकारची चर्चा सकारात्मक पाऊल असल्याचे ते म्हणाले. "कुतर्क' करणाऱ्या राजकारण्यांमुळे चर्चेचा स्तर पडत असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले. 
महेश तपासे यांनी टीआरपीपेक्षा देश महत्त्वाचा असल्याचे सांगितले. आज विरोधकांचा आवाज थांबविला जात आहे. माध्यमांची मानसिकतासुद्धा ठरलेली आहे. लक्ष्यनिश्‍चिती करून संवाद साधणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या, रस्त्यावर येणे हे विरोधकांचे काम आहे. परंतु, आता विरोधक रस्त्यावर येताना दिसत नाही. विरोधक मुद्यांपासून पळ काढत आहेत. तरीही चर्चेचा स्तर पडण्याची जबाबदारी दोन्ही पक्षांची असल्याचे त्या म्हणाल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What? The public blames the decline of political discussions