कोरोना संक्रमण थांबविण्यासाठी डॉ. बंग यांनी दिला सल्ला!

मिलिंद उमरे
Saturday, 19 September 2020

कोरोना विषाणूची साथ आता गडचिरोली जिल्ह्यातही वेगाने पसरत आहे. थुंकीमधून हा अतिलागट विषाणू पसरत असल्याने एकाचे थुंकणे सर्वांना घातक ठरते आहे. खर्रा, तंबाखू खाणारे स्वत:ला कॅन्सर व इतरांना कोरोना देतात.

गडचिरोली : सर्चच्या माध्यमातून आदिवासी क्षेत्रात मोठे सेवाकार्य उभे करणाऱ्या बंग दाम्पत्याने समाजासमोर मोठा आदर्श उभा केला आहे. डॉक्टर अभय बंग यांनी समाज व्यसनमुक्त व्हावा यासाठीही खूप प्रयत्न केलेत. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि जिल्हा दारू मुक्त झाला.

आताही कोरोनाच्या पार्श्वभुमीवर बंग दामप्त्याने पानठेले बंद ठेवण्याचा सल्ला दिला आहे. कोरोना विषाणूची साथ आता गडचिरोली जिल्ह्यातही वेगाने पसरत आहे. थुंकीमधून हा अतिलागट विषाणू पसरत असल्याने एकाचे थुंकणे सर्वांना घातक ठरते आहे. खर्रा, तंबाखू खाणारे स्वत:ला कॅन्सर व इतरांना कोरोना देतात. त्यामुळे कोरोनापासून रक्षणासाठी खर्राविक्री व पानठेले बंद करावे, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांनी केले आहे.

यासंदर्भात सर्च संस्थेच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात डॉ. बंग यांनी म्हटले आहे की, कोरोनाचा वाढता धोका ओळखून भारत सरकार व महाराष्ट्र शासन दोघांनी साथ नियंत्रण कायद्याअंतर्गत तंबाखू, खर्रा साठवणे व विकणे हा गंभीर गुन्हा जाहीर केला आहे. गडचिरोली जिल्हा प्रशासन, पोलिस व मुक्तिपथ हे जनहितासाठी या कायद्याची अंमलबजावणी करीत आहेत.

शेकडो गावांनी आपल्या गावातील खर्रा, तंबाखूविक्री बंद करून गावाला सुरक्षित केले आहे. अनेक शहरांच्या व्यापारी संघटनांनी सामूहिक निर्णय घेऊन खर्रा-तंबाखू साठवणूक व विक्री न करण्याचा संकल्प केला आहे. आम्ही डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग व सर्च संस्था सर्वांचे या अभूतपूर्व कृतींसाठी अभिनंदन करतो. आम्ही जिल्ह्यातील लोकांना, ग्रामपंचायतींना, मुक्तिपथ गाव संघटनांना, पानठेला व किराणा दुकानदारांना व प्रशासनाला आवाहन करतो की कोरोना व कॅन्सरपासून रक्षणासाठी खर्रा-तंबाखू सोडा व कोरोना प्रसार थांबवावा, असे आवाहन डॉ. बंग दाम्पत्याने केले आहे.

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What is a suggetion of Dr. Bang to prevent corona