बाजार समित्यांमध्ये आता गव्हाची खरेदी टोकन पद्धतीने

wheat.jpg
wheat.jpg

अकोला : राज्याचे पणन संचालक व सहकारी संस्थेचे अमरावती विभागीय सहनिबंधक यांच्या निर्देशांचे अनुषंगाने कोरोना विषाणू प्रतीबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करुन, जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सुरळीत चालू ठेवल्याबाबत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांचे स्तरावरून नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आता टोकन पद्धतीने गव्हाची खरेदी केली जाणार आहे.

कोरोना विषाणू प्रतीबंधात्मक उपाययोजनांनुसार देशभर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे शेतकरी बांधवांच्या शेतमालाची जिल्ह्यातील बाजार समित्यामधील आवक बंद झाली होती. लॉकडाऊनच्या काळामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व सेवा सुरू राहण्याच्या दृष्टीने पुरवठा साखळी व वाहतूक सुरू राहील याची जबाबदारी संबंधित तालुका उपनिबंधक/ सहाय्यक निबंधक यांची आहे. त्यानुसार सोमवारी (ता.6) जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या दालनात झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आढावा बैठककीत सर्व बाजार नियंत्रित स्वरुपात सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस सहाय्यक निबंधक, बाजार समित्यांचे सचिव, काही संचालक व्यापारी, अडते, हमाल उपस्थित होते. बैठकीत बाजार समित्यांनी कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा तसेच बाजार पूर्ववत सुरू करण्याबाबत आढावा घेण्यात आला व सर्व बाजार समित्या टप्प्याटप्याने पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ.प्रवीण लोखंडे यांनी कळविले आहे. तसेच शेतकऱ्यांनी बाजार आवारात कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक ती सर्व दक्षता घ्यावी आणि अनावश्यक गर्दी टाळण्याच्या उपाययोजना सर्व संचालक व सचिवांनी करण्याच्या सूचना सुद्धा त्यांनी दिल्या आहेत.

या बाजार समित्यांमध्ये अंमलबजावणी
बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार अकोला, मूर्तिजापूर, तेल्हारा व बार्शीटाकळी या बाजार समित्यांमध्ये टोकन पद्धतीने मालाची आवक घेण्यात येणार आहे. मंगळवारपासून (ता.7) ज्या शेतकऱ्यांना त्यांचा फक्त गहू बाजार समितीमध्ये विकायचा आहे, त्यांनी खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर सकाळी 11 ते दुपारी 4 यावेळेत फोन करुन, त्यांची माहिती देवून, टोकन क्रमांक तसेच बाजार समितीत कोणत्या दिवशी माल आणावयाचा आहे ती माहिती प्राप्त करुन घ्यायची आहे.

प्रत्यक्ष खरेदी 9 एप्रिलपासून
बाजार समितीच्या आढावा बैठकीत झालेल्या निर्णयानुसार सुरुवातीला एका दिवशी फक्त 50 शेतकऱ्यांचा गव्हाची आवक घेतली जाईल. प्रत्यक्षात गव्हाच्या खरेदीस सुरुवात 9 एप्रिल पासून करण्यात येणार आहे. मात्र टोकन क्रमांकाशिवाय बाजारात प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचे टोकन क्रमांक प्राप्त करुन, दिलेल्या तारखेस त्यांचा माल सकाळी 9 वाजता बाजार समितीमध्ये आणायचा आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती     टोकन क्रमांक घेण्यासाठी संपर्क क्रमांक
अकोला  0724-2433478
9881008544
9881185342
मूर्तिजापूर   7038622333
9881481711
तेल्हारा 9764621614
9881941042
बार्शीटाकळी   9403872822
8605734143

ठरवून दिलेल्या दिवशीच माल आणावा
संबंधित बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील गहू विकण्यास इच्छुक असलेल्या शेतकरी बांधवांनी दिलेल्या संपर्क क्रमांकावर फोन करुन त्यांचा टोकन क्रमांक प्राप्त करुन घ्यावा व ठरवून दिलेल्या दिवशीच माल विकण्यास आणून बाजार समित्यांना सहकार्य करावे.
- डॉ. प्रवीण लोखंडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अकोला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com