जेव्हा पोलिसच करतो अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

पीडितेने सांगितलेल्या आरोपीच्या वर्णनावरून तपासाची दिशा ठरवून स्थानिक गुन्हे शाखा भंडारा आणि लाखनी पोलिसांची वेगवेगळी पथके तयार करून तपास सुरू केला. पोलिसांकडे या गुन्ह्यासंदर्भात अपूर्ण माहिती उपलब्ध होती. यात पोलिसांनी प्रत्येक बाबीचा सखोल तपास केला. यात गोंदिया जिल्ह्यातील चिचगड पोलिस ठाण्याअंतर्गत बोंडे दूरक्षेत्र येथील पोलिस कर्मचारी नीलेश योगेश्‍वर हेडाऊ रा. भंडारा हा आरोपी असल्याचे निदर्शनास आले.

लाखनी : लाखनी पोलिस ठाण्याअंतर्गत गडेगाव येथे अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न करताना विनयभंग करणाऱ्या आरोपीला 48 तासांत जेरबंद करण्यात आले. यातील आरोपी हा चिचगड पोलिस ठाण्यातील बोंडेदूर केंद्रातील पोलिस कर्मचारी आहे.

पीडित मुलगी रविवारी सकाळी भंडारा येथून गडेगाव येथे महाविद्यालयात आली होती. काम आटोपल्यानंतर दुपारी ती भंडाऱ्याला जाण्याकरिता राष्ट्रीय महामार्गावरील बसस्थानकावर बसची प्रतीक्षा करत होती. दरम्यान एक पांढऱ्या रंगाचे चारचाकी वाहन तिच्याजवळ येऊन थांबले. वाहन चालकाने अल्पवयीन पीडितेला भंडारा किती लांब आहे? हा रस्ता भंडाऱ्याकडे जातो का? असे प्रश्‍न विचारले. एवढ्यावर न थांबता त्याने तुला सोडून देतो असे म्हणून तिचा हात धरून बळजबरीने गाडीच्या समोरील सीटवर बसवून पळवून नेले.

तिने घाबरून आरडाओरडा केली असता आरोपीने परत गडेगाव येथे जाऊन तिला ढकलून दिले. पीडीतेच्या तक्रारीवरून लाखनी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची माहिती पोलिस निरीक्षकांनी जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांना दिली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक साळवे यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी काटे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र मानकर यांना आरोपीला तत्काळ अटक करण्याचे निर्देश दिले.

पोलिस अधिकाऱ्यांनी अल्पवयीन पीडितेला विश्‍वासात घेऊन अज्ञात आरोपीबाबत सखोल विचारपूस केली. पीडितेने सांगितलेल्या आरोपीच्या वर्णनावरून तपासाची दिशा ठरवून स्थानिक गुन्हे शाखा भंडारा आणि लाखनी पोलिसांची वेगवेगळी पथके तयार करून तपास सुरू केला. पोलिसांकडे या गुन्ह्यासंदर्भात अपूर्ण माहिती उपलब्ध होती. यात पोलिसांनी प्रत्येक बाबीचा सखोल तपास केला. यात गोंदिया जिल्ह्यातील चिचगड पोलिस ठाण्याअंतर्गत बोंडे दूरक्षेत्र येथील पोलिस कर्मचारी नीलेश योगेश्‍वर हेडाऊ रा. भंडारा हा आरोपी असल्याचे निदर्शनास आले.

आरोपीला लाखनीला आणून तपासणी केली असता त्यानेच हे कृत्य केल्याचे स्पष्ट झाले. आरोपीला तपास अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्याचा तपास पवनीच्या उपविभागीय पोलिस अधिकारी अश्‍विनी शेंडगे करीत आहेत. ही कार्यवाही पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी साकोली श्री काटे,अश्विनी शेंडगे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र मानकर,दामदेव मंडलवार, सहायक पोलिस निरीक्षक श्रीराम लांबाडे, राजेंद्र गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखा आणि लाखनी पोलिस ठाणे येथील पोलिस अधिकारी-कर्मचारी यांनी केली आहे.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When police kidnapped one girl