कधी होणार नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन संकुलाचा विकास

file photo
file photo

नवेगावबांध (गोंदिया) : केंद्र व राज्य शासनाच्या वतीने पर्यटनातून रोजगार निर्मिती हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कोट्यवधी रुपयांच्या अनेक योजना राबविल्या जात आहेत. मात्र, अशा योजनांपासून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयस्तरावर प्रसिद्ध असलेल्या नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानातील पर्यटनस्थळ कोसो दूर आहे. गेल्या दोन-तीन वर्षापासून हे पर्यटन संकुल स्थानिक वनव्यवस्थापन समितीला देण्यात यावे, अशी मागणी अनेकदा समितीच्या वतीने करण्यात आली. परंतु, वन विभाग, वन्य वन्यजीव संरक्षण विभागाचे अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षामुळे समितीच्या या मागणीकडे शासनाने लक्ष वेधले नाही. त्यामुळे गेल्या 22 वर्षांपासून राष्ट्रीय उद्यानाचे पर्यटन संकुल आपल्या गतवैभवाकरिता अश्रू ढाळत आहे.
पर्यटन संकुलाच्या विकासासाठी सात कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. याला दोन वर्षे लोटूनही अद्याप कुठल्याही विकासकामाला सुरुवात झाली नाही. पर्यटन संकुलाच्या विकासाबाबत तत्कालीन पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या उपस्थितीत गोंदिया, नागपूर, मुंबई या ठिकाणी शासनस्तरावर अनेक बैठका झाल्या. पर्यटन संकुल संयुक्त वन व्यवस्थापन समितीला हस्तांतरित करण्याचा निर्णयही झाला. मात्र, पर्यटन संकुलाच्या विकासाची गाडी पुढे सरकलीच नाही. शासनाच्या पर्यटन धोरणानुसार या पर्यटन संकुलात विश्रामगृहे, बालोद्यान, उपहारगृह, संजय कुटी परिसर व विश्रामगृह, हिल टॉप गार्डन, हॉलिडे होम गार्डन, पुनरुज्जीवनाच्या प्रतीक्षेत असलेला व अद्यापही लोकार्पण न झालेला राक गार्डन, सभागृह, मनोहर उद्यान, तंबू निवास, नौकानयन, मनाला भुरळ घालणारा व नैसर्गिक सौंदर्याची उधळण करणारा ऐतिहासिक नवेगावबांध जलाशय, काही अंतरावर असलेल्या नवेगाव नागझिरा व्याघ्र संरक्षण प्रकल्प, अशी अनेक स्थळे पर्यटकांना खुणावताहेत. ऍडव्हेंचर स्पोर्टससाठी अनेक संधी या ठिकाणी उपलब्ध आहेत. अशा सर्व गोष्टी अनुकूल असताना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यास भरपूर वाव आहे. बेरोजगार युवक युवती रोजगाराची वाट पाहात आहेत.

19 जुलै 2018 ला तत्कालीन पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या दालनात झालेल्या बैठकीत 31 जुलै 2018 पर्यंत पर्यटन संकुल संयुक्त वनव्यवस्थापन समितीला हस्तांतरित करण्याचा निर्णय झाला. महसूल व वन विभागाने 28 ऑगस्ट 2018 ला तसा आदेश काढला. तो वनविभागाकडे अडकला आहे. त्याला त्वरित मंजुरी देण्यात यावी.
- रामदास बोरकर,
अध्यक्ष नवेगावबांध फाउंडेशन.

शासनाने वन्यजीव संरक्षण विभागाकडून पर्यटन संकुल संयुक्त वनव्यवस्थापन समितीला ताबडतोब हस्तांतरित करावे. पर्यटन संकुलाचा विकास म्हणजे परिसरातील बेरोजगार हातांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे होय.
- अनिरुद्ध शहारे,
सरपंच, नवेगावबांध.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com