दोन कोटी रोजगार, 15 लाख कुठे गेले?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपने काश्‍मीरमधील 370 कलम हटवण्याचे आश्‍वासन दिले होते. ते आता हटवले. सोबतच दोन कोटी युवकांना रोजगार आणि प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख जमा करू असेही दावे केले होते. त्याचे काय झाले असा सवाल करून छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी याचे उत्तर द्यावे अशी मागणी केली. 

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपने काश्‍मीरमधील 370 कलम हटवण्याचे आश्‍वासन दिले होते. ते आता हटवले. सोबतच दोन कोटी युवकांना रोजगार आणि प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख जमा करू असेही दावे केले होते. त्याचे काय झाले असा सवाल करून छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी याचे उत्तर द्यावे अशी मागणी केली. 
बघेल यांनी दक्षिण-पश्‍चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. आशीष देशमुख यांच्या प्रचारार्थ सोमवारी खामलारोडवरील दंतेश्‍वरी झोपडपट्टी येथे सभा घेतली. यावेळी त्यांनी ही लाढाई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरुद्ध आशीष देशमुख अशी नव्हे तर दोन विचारांची असल्याचे सांगून महाराष्ट्राच्या भल्यासाठी कॉंग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले. 
देशात मंदी असल्याचे सरकार कबूल करते. मात्र, त्यावर उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे आज नवे रोजगार तर सोडा, आहेत तेही रोजगार युवकांच्या हातून गेले आहेत. छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसची सत्ता येताच शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आले. अडीच हजार रुपये क्विंटलने धान खरेदी आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकले आहे. शेतकऱ्यांच्या हातात पैसा आल्यामुळे छत्तीसगडमध्ये मंदीचे कुठलेच पडसाद जाणवत नाही. बाजारपेठा सजल्या आहेत. मोठ्या प्रमाणात व्यवहार होत आहेत. दुसरीकडे भाजपच्या हातात असलेल्या राज्यांना मंदीची झळ सोसावी लागत असेही बघेल यावेळी म्हणाले. 
भाजपला शेतकऱ्यांपेक्षा कॉर्पोरेट सेक्‍टरची चिंता 
भाजपला शेतकऱ्यांपेक्षा कॉर्पोरेट सेक्‍टरची जास्त चिंता आहे. त्याकरिता आरबीआयकडून एक लाख 74 हजार कोटी रुपये घेऊन कॉर्पोरेट सेक्‍टरला दिले. उद्योगपतींचे कोट्यवधींचे कर्ज माफ केले. सध्या देशातील अस्थिर परिस्थिती बघता ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. कोण विकास करू शकतो, शेतकऱ्यांचे कर्ज कोण माफ करू शकते याचा विचार करून जनतेने मतदान करावे, असे आवाहन भूपेश बघेल यांनी केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: where did Two crore jobs and 15 lakhs go?