esakal | "प्रॅक्‍टिस'ला जायचे कुठे?
sakal

बोलून बातमी शोधा

रेशीमबाग : जवळपास पंधरा दिवस चालणाऱ्या आनंद मेळाव्यासाठी रेशीमबाग मैदानावर सुरू असलेले खोदकाम.

"प्रॅक्‍टिस'ला जायचे कुठे?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : उपराजधानीत खेळांडूना सराव करण्यासाठी केवळ बोटावर मोजण्याइतकी मैदाने आहेत. जी काही मैदाने शिल्लक आहेत; त्यांची अतिशय वाईट अवस्था आहे किंवा त्यावर जत्रा, प्रदर्शन, मेळावे, सर्कशीचे खेळ चालतात. आता रेशीमबाग मैदानावरही आनंद मेळावा येऊ घातला आहे. प्रशासनाने पैशाच्या हव्यासापोटी मेळाव्याला परवानगी दिल्याने स्थानिक खेळाडूंसह क्रीडा प्रेमींमध्येही प्रचंड नाराजी व रोष आहे.
सद्यस्थितीत पूर्व व मध्य नागपुरातील खेळाडूंना सराव करण्यासाठी हक्‍काचे एकमेव रेशीमबाग मैदान उपलब्ध आहे. ऍथलिट्‌सह फुटबॉल आणि असंख्य युवा क्रिकेटपटू दररोज सकाळ-सायंकाळ या मैदानावर सराव करतात. याशिवाय "मॉर्निंग वॉक' करणाऱ्या पुरुष व महिलांचीही संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या मैदानावर मेहनत करून अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करून शहराला नावलौकिक मिळवून दिला आहे. या खेळाडूंना चांगल्या सोयीसुविधा पुरविण्याऐवजी स्थानिक प्रशासन त्यांच्याच मुळावर उठले आहे.
प्रशासनाने येथे आनंद मेळाव्याला परवानगी देऊन अनेकांची नाराजी ओढवून घेतली आहे. मेळाव्याच्या आयोजनाच्या निमित्ताने सध्या मैदानावर खोदकाम सुरू असून, जागोजागी खड्डे खोदले जात आहेत. खोदकामामुळे मैदान खराब होऊन खेळाडूंना फटका बसण्याची दाट शक्‍यता आहे. मेळाव्याला स्थानिक खेळाडूंचा विरोध आहेच, शिवाय महापालिकेच्या क्रीडा समितीचे माजी सभापती नागेश सहारे यांनीही तीव्र नाराजी व्यक्‍त केली आहे.
क्रीडाप्रेमींनी आपल्या भावना सहारे यांच्याकडे बोलून दाखविल्या आहेत. क्रीडाप्रेमींच्या आक्षेपानंतर सहारे यांनी यासंदर्भात सक्रिय पुढाकार घेतला आहे. त्यांनी मनपा आयुक्त अभिजित बांगर, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके तसेच नासुप्रच्या अधिकाऱ्यांसोबत या विषयावर चर्चा करून खोदकामामुळे मैदानाचे नुकसान होणार असल्याचे लक्षात आणून दिले. जनक्षोभ भडकण्यापूर्वी मेळाव्याला दिलेली परवानगी रद्द करावी, अशी विनंतीही त्यांनी केल्याची माहिती आहे.

loading image
go to top