घरट्यासाठी पाखरांना कुणी घर देता का घर?

File photo
File photo
Updated on

गडचिरोली : पक्षी आणि मानवाचा सहसंबंध अनादी काळापासून चालत आला आहे. पूर्वी रानात जसे पक्षी राहायचे, तसेच मानवी वस्तीत, परसबागेतही त्यांचा राबता होता. मात्र, बदलत्या काळात पाखरांना घरट्यायोग्य जागाच मिळेनाशा झाल्या आहेत. तरीही कठीण परिस्थितीशी झुंजत काही पक्षी माणसांच्या घरात घरटी करताना दिसत आहेत. मात्र, ही घरटी जपली जातील का, त्यांच्या जगण्याची धडपड माणुसकीच्या सावलीत यशस्वी होईल का, ही भीती कायम आहे. माणसांच्या घरात त्यांनाही घरट्यासाठी इवली जागा मिळेल का, असे प्रश्‍नच जणू हे पक्षीजगत विचारत आहे.
आताची घरे पूर्णत: बंद असतात. खिडक्‍यांनाही जाळ्या लावलेल्या असतात. जिथे डास शिरू शकत नाही तिथे पाखरांना कसे जाता येईल? त्यामुळे त्यांचा प्रवेशच बंद झाला आहे. अलीकडच्या शहरी फ्लॅट संस्कृतीत अंगणातही झाडं राखली जात नाहीत. त्यामुळे पाखरांची संख्या कमी होत आहे. दुसरीकडे जगण्यासाठी संघर्षशील काही जिद्दी पक्षी थेट माणसांच्या घरात घुसून तेथे घरटी बांधण्याचा प्रयत्न करतात. मग घरातील पंख्याच्या वरच्या भागात, जिन्याखाली, सज्जात, वीजमीटरच्या आडोशाने ही घरटी आणि पाखरांचे संसार फुलतात. अकोला जिल्ह्यातील कवी-साहित्यिक अरविंद पोहरकर यांच्या अकोला येथील निवासस्थानी मागील पाच वर्षांत लालबुड्या बुलबुलाचे, होल्यांचे संसार बहरले. त्यांनी मुलीसाठी बांधलेल्या पाळण्यावरच हक्‍क सांगत बुलबुल पक्ष्यांनी घरटं बांधलं. घरट्यात अंडी घातल्यावर सुरुवातीला ही पाखरं पोहरकर कुटुंबालाच हद्दपार करण्याच्या तयारीत होती. त्यांच्या घरट्याजवळ जाताच ही इवली पाखरं जिवाच्या आकांताने झडप घालायची. पण, हे सारं ते पिल्लांसाठी करत आहेत, हे समजून घेत पोहरकर कुटुंबानेच नमती भूमिका घेतली. काही दिवसांनी या पक्ष्यांची भीती गेली आणि त्यांनी पोहरकर कुटुंबाला आपलसं करून घेतलं.
पोहरकर यांच्या लुब्धा आणि निर्मिका या दोन्ही मुलींची या पाखरांशी चांगलीच गट्टी जमली. आपल्या आई-बाबांसोबत त्या या बुलबुल परिवाराची काळजी घेऊ लागल्या. पिल्लं मोठी होताच बुलबुल परिवाराने घरटं सोडलं. पिल्लांना निरोप देताना या कुटुंबाचा ऊर भरून आला. पण, काही दिवसांतच बुलबुलच्या रिकाम्या घरट्यावर होला किंवा कवडा (लॉफिंग डव्ह) या छोट्या कबुतराने कब्जा केला. मग, पोहरकर परिवार या नवीन परिवाराच्या संसार सुरक्षेत रमला. हा सिलसिला तब्बल पाच वर्षे सुरू होता. मात्र, दीड वर्षापूर्वी पोहरकर कुटुंब हे भाड्याचे घर सोडून स्वतःच्या फ्लॅटमध्ये गेले. त्यांनी हे घर सोडताच घरमालकाने सारी घरटी काढून पाखरांना हुसकून लावले. त्याची खंत आजही मनात सलत असल्याचे अरविंद पोहरकर यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.
पोहरकर यांनी नवीन फ्लॅटमध्येही पाखरांशी असलेले त्यांचं मित्रत्व जपलं आहे. येथे आता अनेक चिमण्या आणि एका पाकोळीने (कॉमन स्वॉलोव्ह) घरटं बांधलं असून हा परिवार या नव्या पाहुण्यांची काळजी घेत आहे. इतरांनीही घरात घरटी करायला येणाऱ्या पाखरांची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

मानवी वस्तीत आढळणारे पक्षी...
चिमणी, कावळा, कोकीळ यांच्यासह भारद्वाज, मैना, मुनिया, बुलबुल, कवडे, शिंपी, वटवट्या, सूर्यपक्षी, दयाळ, हळद्या, पिंगळे, घुबड, तांबट, सातभाई असे अनेक पक्षी मानवी वस्तीत आढळतात. यातील काही पक्षी माणसांच्या घरातच घरटी करण्याचा प्रयत्न करतात. पण, अनेकदा त्यांच्याकडे लक्ष देण्यात येत नाही किंवा लक्ष गेले, तर हुसकावून लावण्यात येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com