
मजुरीच्या कामासाठी जाताना पत्नीने जेवणाचा डबा दिला नाही. दिवसभर उपाशीपोटी राबराब राबून रात्री पती घरी परतला. मात्र, रात्रीचाही स्वयंपाक पत्नीने केला नव्हता. त्यामुळे पतीने स्वयंपाक न करण्याचे कारण पत्नीला विचारले.
चंद्रपूर : नवरा-बायको आणि वाद हे समीकरणच आहे. या वादातून नवर्याने बायकोला मारण्याच्या घटनाही आपण ऐकतो. मात्र बायकोने नवर्याला बदडल्याची घटना नुकतीच घडली.
मजुरीच्या कामासाठी जाताना पत्नीने जेवणाचा डबा दिला नाही. दिवसभर उपाशीपोटी राबराब राबून रात्री पती घरी परतला. मात्र, रात्रीचाही स्वयंपाक पत्नीने केला नव्हता. त्यामुळे पतीने स्वयंपाक न करण्याचे कारण पत्नीला विचारले. यामुळे संतापलेल्या पत्नीने फावड्याच्या लाकडी दांड्याने पतीला मारहाण केली.
यात गंभीररीत्या जखमी झालेल्या पतीने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेवणाचा वाद पत्नीने दिलेल्या मारहाणीच्या प्रसादाने मिटल्याची घटना येथील बागला चौकातील महावीरनगरात घडली.
येथील भिवापूर वॉर्डातील बागला चौक परिसरातील महावीरनगरात सुरेश शिवाजी अंकुशे (वय २९) हे पत्नी शारदा हिच्यासोबत राहतात. मोलमजुरी करून ते स्वत:चा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. ५ ऑगस्टला नेहमीप्रमाणे सकाळी सुरेशने मजुरीच्या कामाला जाण्यासाठी तयारी केली. मात्र, पत्नी शारदाने दुपारच्या जेवणाचा डबा तयार करून दिला नाही. त्यामुळे ते डबा न घेताच कामावर गेले. दिवसभर उपाशीपोटी काम करून ते रात्री ८ वाजताच्या सुमारास घरी परतले. परंतु, पत्नीने रात्रीचासुद्धा स्वयंपाक केलेला नव्हता. यामुळे सुरेशने पत्नी शारदाला स्वयंपाक न करण्याचे कारण विचारले. यातून दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.
सविस्तर वाचा - क्या बात है ! -वर्ध्याच्या ऑरगॅनिक मास्कला इंग्लंडमध्ये पसंती
संतापलेल्या शारदाने फावड्याच्या लाकडी दांड्याने सुरेशला मारहाण करणे सुरू केले. या मारहाणीत सुरेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्याने शहर पोलिस ठाणे गाठून पत्नी शारदा हिच्याविरुद्ध तोंडी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि पत्नीविरुद्ध भांदवी ३२४, ५०४ कलमान्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.
संपादन - स्वाती हुद्दार