प्रेमात अडसर ठरणाऱ्या युवकाला दुचाकीसह गड्ड्यात पुरले

Pankaj Murder
Pankaj Murder

नागपूर  : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या युवकाचा पत्नीच्या प्रियकराने हातोड्याने वार करून खून केला. त्यानंतर मृतदेह हॉटेलच्या बाजूला मोठा खड्‌डा खोदून त्यात गाढला. एवढेच नव्हे, तर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच खड्ड्यात मृत युवकाची दुचाकीसुद्धा गाढली. कौर्याची सीमा गाठणारी ही थरारक घटना रविवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास कापसी खुर्द परिसरात उघडकीस आली. पंकज गिरमकर असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. 

भारतीची झाली अमरसिंहशी ओळख 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज गिरमकर (वय 34, रा. समता कॉलनी, वर्धा) हा गुमथळ्यातील हल्दीराम फुड्‌स कंपनीत इलेक्‍ट्रिशियन म्हणून कार्यरत होता. तो 22 वर्षीय पत्नी भारती (बदललेले नाव) आणि मुलगा कैवल्य यांच्यासह कापसी येथे किरायाने राहत होता. त्याच्या घराजवळ अमरसिंह ठाकूर याच्या मित्राचे घर आणि किराणा दुकान होते. तो नेहमी मित्राकडे येत होता. एकदा किराणा दुकानात भारती आली. त्यावेळी तिथे असलेल्या अमरसिंह ठाकूरसोबत तिची ओळख झाली. ओळखीनंतर अमरसिंह भारतीच्या घरी यायला लागला. त्यामुळे भारतीने पती पंकजसोबत त्याची ओळख करून दिली. पंकज कामावर गेल्यानंतर अमरसिंह वारंवार भारतीच्या घरी यायला लागला. याची पंकजला कुणकुण लागली. त्याने भारतीला अमरसिंहसोबतची मैत्री न वाढविण्याचा सल्ला दिला. तेव्हापासून अमरसिंहचे भारतीकडे येणे कमी झाले. परंतु, भारती वारंवार फोनवरून अमरसिंहशी बोलत असल्याने पंकजला खटकत होते. त्यामुळे दोघांच्या प्रेमसंबंधाला कंटाळून पंकजने कापसीतील घर खाली केले आणि थेट मूळ गाव वर्धा गाठले. 

अमरसिंहने केला पंकजचा गेम 

दोन महिन्यांपर्यंत सर्वकाही सुरळीत सुरू होते. मात्र, भारती आणि अमरसिंहचे चॅटिंग आणि फोनवरून बोलणे काही संपत नव्हते. त्यामुळे पंकज थेट अमरसिंहच्या कापसी रोडवर असलेल्या ए.जे. जोगिंदरसिंह ढाब्यावर आला. त्याने अमरसिंहची समजूत घातली आणि पत्नीशी असलेले अनैतिक संबंध तोडण्याबाबत दमदाटी करून निघून गेला. 

अवश्‍य वाचा- मामीने नेला भाचा पळवून! 

वॉट्‌सऍप चॅटने झाली गडबड 

भारती आणि अमरसिंह नेहमी वॉट्‌सऍपवर चॅटिंग करीत होते. भारती केलेली चॅट लगेच डिलीट करीत होती. मात्र, 27 डिसेंबरला तिने चॅट डिलीट केली नाही. ती सर्व चॅट पंकजने वाचली. त्यामुळे दोघांत वाद झाला. 28 डिसेंबरला पुन्हा पत्नी भारती अमरसिंहसोबत फोनवर बोलताना दिसली. त्यामुळे त्याने पत्नीला मारहाण केली तसेच तो अमरसिंहच्या ढाब्यावर गेला. रात्री अकरा वाजताच्या सुमारास अमरसिंह आणि पंकज यांच्यात भांडण झाले. त्यावेळी ढाब्यावर कूक मुन्ना तिवारी, मित्र शुभम डोंगरे, बाबा खान हे उपस्थित होते. अमरने हातोडा घेतला आणि पंकजच्या डोक्‍यावर मारला. मुन्ना तिवारीने पंकजच्या छातीत सब्बल खुपसली तसेच शुभमनेही रॉडने पंकजवर हल्ला केला. या हल्ल्यात पंकज रक्‍ताच्या थारोळ्यात पडला. 

ड्रममध्ये ठेवला मृतदेह

चौघांनीही पंकजचा मृतदेह एका ड्रममध्ये ठेवला. शौचालयासाठी खड्‌डा खोदायचा आहे असे सांगून दुपारी एका जेसीबीला ढाब्यावर बोलावले आणि खड्डा खोदला. दिवसभर ग्राहकी केल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी पंकजचा मृतदेह खड्ड्यात गाढला. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी त्याची दुचाकीसुद्धा त्याच खड्ड्यात टाकली. दुसऱ्या दिवशी पुन्हा जेसीबी बोलावून खड्‌डा बुजवून टाकला. 


वडिलांची पोलिसात तक्रार 

महिनाभरापासून पंकज गिरमकर बेपत्ता होता. त्यामुळे त्याच्या वडिलाने धंतोली पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र, महिना उलटून गेल्यानंतरही पंकजचा पत्ता नसल्यामुळे कुटुंबियांनी पोलिसांकडे संशय व्यक्‍त केला. कोणत्याही प्रकारचा सुगावा नसताना पोलिसांनी केवळ सूतावरून स्वर्ग गाठून पंकज गिरमकर हत्याकांडाचा पर्दाफाश केला. त्यासाठी गुन्हे शाखेच्या युनिट दोनला अतिशय मेहनत घ्यावी लागली. नानाविध युक्‍त्यांचा वापर करून अशक्‍य असलेले हत्याकांड गुन्हे शाखेने उघडकीस आणले. त्यामुळे पोलिस आयुक्‍त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी 50 हजार रुपयांचे बक्षीस पथकाला घोषित केले. 

असा लागला हत्याकांडाचा छडा

गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल ताकसांडे यांना खबऱ्यांनी पंकजचा खून झाल्याची माहिती दिली. त्यामुळे त्यांनी संतोष मदनकर, लक्ष्मीछाया तांबूसकर यांच्यासह स्वतः कापसी रोडवरील ढाब्यावर पाळत ठेवली. पोलिस निरीक्षक ताकसांडे संशय असलेल्या अमरसिंग ठाकूरच्या ढाब्यावर ट्रकचालक म्हणून चारदा जाऊन आले. एक रात्र त्यांनी ढाब्याच्या बाहेरील जागेवर झोपून काढली. तसेच त्यांच्या पथकातील संतोष मदनकर नावाच्या हवालदाराने फाटके कपडे घालून दारुड्याचे सोंग घेतले आणि ढाब्यावर तीन ते चार दिवस काढले. ढाब्यावरील प्रत्येक कामगाराच्या हालचालींवर लक्ष ठेवले. तपासाचा धागा मिळताच ताकसांडे यांनी लगेच अमरसिंहच्या मुसक्‍या आवळल्या. अमरसिंह अजितसिंह ठाकूर (वय 35), शुभम डोंगरे (रा. इमामवाडा) आणि मुन्ना उर्फ मनोज तिवारी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. बाबा खान हा आरोपी फरार आहे. 

ट्रकमध्ये टाकला मोबाईल

पंकजचा खून केल्यानंतर त्याचा मोबाईल राजस्थानकडे जाणाऱ्या ट्रकमध्ये फेकला. त्यामुळे पंकजचे शेवटचे लोकेशन राजस्थानमध्ये दिसत होते. त्यामुळे पोलिस गोंधळले. पंकज पत्नीशी भांडण करून राजस्थानला निघून गेला असावा. तसेच राग शांत झाल्यावर तो परत येईल, अशी आशा कुटुंबियांना होती. परंतु, महिना उलटल्यानंतर पंकज न परतल्यामुळे कुटुंबियांनी संशय व्यक्‍त केला होता. 

पत्नीची भूमिका संशयास्पद 

अमरसिंह आणि भारतीचे प्रेमसंबंध होते. त्यामुळे अमरसिंहने केलेले कृत्य भारतीला माहीत असावे, असा दावा पोलिसांनी केला आहे. प्रेमसंबंधात पती अडसर ठरत असल्यामुळे दोघांनीही कट रचला किंवा पंकजचा खून केल्यानंतर भारतीला हत्याकांडाबाबत माहिती देण्यात आली असावी, असा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे तिचीसुद्धा चौकशी पोलिस करणार आहेत. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com